
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘युअर फ्रेंड्स अँड नेबर्स’ ही मालिका समकालीन नागरी जीवनाच्या आत्मकेंद्री, तणावग्रस्त आणि भावनिकदृष्ट्या विच्छिन्न स्थितीचे वास्तवदर्शी चित्रण करते. मालिकेची मांडणी ही रचनेच्या दृष्टीने वर्तुळाकार आहे. विविध भागांमधून एकेका प्रसंगाची अनेक दृष्टिकोनांतून उकल घडवली जाते. परिणामी, प्रेक्षकाला केवळ ‘घटना’ समजत नाही, तर त्या घटनांच्या मागील मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरील अर्थछटा उलगडतात.