आई होणार आहात? वैद्यकीय सल्ल्याने घ्या आरोग्याची काळजी

डॉ. सुषमा देशमुख
Wednesday, 20 May 2020

गर्भवती मातेची आम्ही वेळोवेळी जी काळजी घेतो, तपासणी करतो, औषधे देतो यालाच Antenatal care किंवा प्रसवपूर्व जतन म्हणतात. आम्ही नऊ महिन्यांच्या गर्भावस्थेची सोयीसाठी तीन भागांत विभागणी करतो.

रम्याला मी लहानपणापासूनच ओळखते. तिच्या लग्नालाही गेले होते. आज आली ती थोडीसी लाजतच. "डॉक्‍टर, प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आलीय.' तिला दीड महिना झाला होता. तिला तपासून औषधे दिली. काही तपासण्या करावयास सांगितल्या व तिला पुढे कशी काळजी घ्यायची याबद्दल माहिती दिली. गर्भवती मातेची आम्ही वेळोवेळी जी काळजी घेतो, तपासणी करतो, औषधे देतो यालाच Antenatal care किंवा प्रसवपूर्व जतन म्हणतात. आम्ही नऊ महिन्यांच्या गर्भावस्थेची सोयीसाठी तीन भागांत विभागणी करतो.
1. पहिले बारा आठवडे (I trimester), 2. मधले सोळा आठवडे (13 to 28, II trimester), 3. शेवटचे बारा आठवडे (29 to 40, III trimester) हे असे विभाग करायचे कारण म्हणजे या तीन टप्प्यातून जाताना गर्भवती स्त्रीला वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक बदलांच्या अवस्थेतून जावे लागते. त्यामुळे होणारे त्रास हे वेगवेगळे असतात.
 पहिले बारा आठवडे
1. पाळी चुकते, हा महत्त्वाचा पाळीमधील बदल.
2. मळमळ, उलटी, अस्वस्थ होणे.
3. वारंवार लघवीला जाणे, शौचास जाणे, व शौचास त्रास होणे.
4. स्तनांमध्ये कळ येणे.
5. जेवण बरोबर होत नसल्यामुळे अशक्तपणा वाटणे.
 मधले सोळा आठवडे
1. बाळाची हालचाल जाणवणे, यालाच आम्ही Quickening असे म्हणतो. हा अतिशय सुखद अनुभव असतो.
2. स्तनांचे व पोटाचे आकारमान वाढण्यास चालू होते.
3. बऱ्याच जणांच्या पोटावर किंवा गालावर काळसरपणा येतो.
C) शेवटचे बारा आठवडे
1. पोटाचे व स्तनाचे आकारमान आणखी वाढणे.
2. लघवी व शौचास वारंवार जावेसे वाटणे.
3. पित्ताचा त्रास वाढणे.
4. बाळाची हालचाल वाढणे.
हे सर्व गर्भवती स्त्रीच्या शरीरात होणारे व तिला जाणवणारे बदल असतात. याशिवाय काही गर्भवती स्त्रियांना थोड्याफार प्रमाणात होणारे काही त्रास असतातच. उदा. पाठदुखी, बद्धकोष्ठता, पायात गोळे येणे व पाय सुजणे, दुखणे, मूळव्याध, varicose veins, योनीमार्गातून पातळ पांढरा खाज नसलेला स्त्राव जाणे. हे सर्व नमूद करण्याचे कारण की या सर्व गोष्टींची माहिती मातेला असणे आवश्‍यक आहे. आमच्या मते गर्भावस्था ही मातेसाठी त्रासदायक न होता आनंददायक असावी व ती स्वत:ची व होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यासाठी सक्षम असावी.
वैद्यकीय तपासणी :- 1. पहिली तपासणी ही पाळी चुकल्याबरोबर लगेच करून घेतली पाहिजे. त्यानंतर दर महिन्याला, 7 महिने पूर्ण होईपर्यंत, आठव्या महिन्यात दर पंधरा दिवसांनी तर नवव्या महिन्यात दर आठवड्याला फेरतपासणी असते. 2. प्रत्येक फेरतपासणीस वजन, रक्तदाब, अशक्तपणा, पंडुरोग, कावीळ, हातापायांवरील सूज, बाळाची वाढ याकडे विशेष लक्ष दिले जाते.
3. टेटनसचे इंजेक्‍शन आवश्‍यक आहे. आजकाल फ्लू साठीपण लसीकरण करतात. 4. मग काही रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या असतात. प्रत्येक गर्भवती स्त्रीला रक्तगट माहीत असणे आवश्‍यक आहे. पेशंटच्या त्रासाप्रमाणे तपासण्यांची संख्या वाढू शकते. 5. गर्भवती स्त्रीमध्ये सोनोग्राफी अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये बाळाची वाढ, गर्भजल, प्लासेंटा तसेच बाळाला मिळणारा रक्तपुरवठा तसेच बाळातील जन्मदोष अशी महत्त्वाची माहिती मिळते. आम्ही तशी सोनोग्राफी कमीतकमी तीनदा करण्यास सांगतोच.
आहार :-
* आहार हा दिवसातून 6 ते 7 वेळा विभागुन थोडा थोडा घेणे.
*आहारामध्ये प्रोटिन्स म्हणजे डाळी, अंडी तसेच कडधान्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असावा.
*लोहयुक्त - हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, गूळ, फळे तसेच बीट यांचा समावेश असावा.
*कॅल्शियमच्या स्रोतासाठी दूध, चीज, नाचणी, मेथी बदाम, तीळ, ब्रोकोली, पत्तागोबी, संत्री, समुद्री मासे यांचा समावेश करावा.
व्यक्तिगत स्वच्छता :- 1. स्नान :- रोज कमीतकमी एकदा तरी स्नान केले पाहिजे. 2. दातांची स्वच्छता व नखे स्वच्छ व कापलेली असावीत. 3. झोप व आराम :- गर्भवती स्त्रीला रात्री कमीतकमी आठ तास व दुपारी दोन तास झोप आवश्‍यक आहे. त्रासदायक कठीण कामे टाळावीत. हलकी व सोपी कामे करावीत. 4. व्यायाम :- डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम करावा. 5. मनोरंजन : या अवस्थेत स्वत:बद्दल व बाळाबद्दल जास्तीतजास्त माहिती मिळवावी. ज्या गोष्टींची आपल्याला आवड आहे त्या गोष्टी कराव्यात. 6. कपडे :- या अवस्थेमध्ये कपडे हे मऊ, सुती व सैलसर असावेत. 7. प्रवास :- तसेही गर्भारपणात प्रवास शक्‍यतो टाळावा. ज्यांना प्रवास करायचाच आहे, त्यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार करावा. 8. स्तनांची देखरेख व काळजी घ्यावी.

गर्भारपणात धोक्‍याच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे.
उदा. गर्भारपणात अचानक रक्तस्त्राव चालू होणे, अचानक पोटात दुखू लागणे, अचानक योनीमार्गातून पाणी जाणे, डोके दुखणे इ.
महत्त्वाचा संदेश / कोरोना परिस्थितीत गर्भवतींना विशेष सल्ला :-
1. घरी राहा, बाहेरील लोकांना घरात बोलवू नका. फेरतपासणी 12, 19, 32 आठवड्यांचीच ठेवा. हॉस्पिटलमध्ये कुठेही विनाकारण स्पर्श करू नका. मास्क वापरा, गर्दी टाळा, वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवा. तपासणीनंतर घरी आल्यावर अंघोळ करून स्वच्छ घरातील कपडे घाला, शिंकताना नाकावर रुमाल ठेवा.
2. आहारात लिंबुवर्गीय फळांचा समावेश करा. उदा. संत्री, मोसंबी, लिंबू तसेच आलं, लसूण, हळद, पालक, ब्रोकोली.
3. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आनंदी व सकारात्मक राहा. सारखे टीव्ही किंवा कोरोनाच्या बातम्या बघू नका. मनाला आनंद देतील असे सिनेमे, नाटक, सिरियल पाहा. सकाळी लवकर उठा, योग, ध्यान, प्राणायाम, श्‍वसनाचे व्यायाम यांचा अंगीकार करा. इतर व्यायाम, तुमच्या डॉक्‍टरांना विचारून करा. छंद जोपासा. बागेत काम करा. पूजा, श्‍लोक, आध्यात्मिक गोष्टींचा स्नानानंतर नियम करावा. घरातील इतर लोकांशी प्रेमाने बोला.
4. डॉक्‍टरांशी संवाद साधा. औषधे नियमित घ्या. काहीही जास्त त्रास असेल उदा. रक्तस्त्राव, पोटात दुखणे तर हॉस्पिटलला जाऊन तब्येत दाखवून घ्या.
आम्हा डॉक्‍टरांना वाटतं की स्त्रिया सर्व बाबतीत सज्ञान झाल्या पाहिजेत. जागरूक असल्या पाहिजेत. तरच आपण निरोगी माता व सुदृढ बालकाचे पर्यायाने वैभवशाली भारताचे स्वप्न बघू शकू.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Being a mother, please take care