ये बंधन तो... जन्मों का संगम है

ये बंधन तो... जन्मों का संगम है

रक्षाबंधन... नितळ, निखळ, निर्व्याज प्रेमाचं बहीण-भावाचं नातं. सदैव जपावं असं हे त्रिगुणी नातं असतं. ज्यात वडिलांचा धाक आहे, आईची माया आहे, मित्रत्वाचा आधार आहे. बंधन फक्त म्हणण्यापुरतंच. खरंतर ते एक हवंहवंसं वाटणारं रेशमी बंधन. हळवं, अलवार...

लहानपणीचे ते हरवलेले गोड क्षण. त्याच्या सर्व आठवणी या दिवशी मनात दाटून येतात. राखीपौर्णिमेच्या दिवशी बहिणीने हातात बांधलेली राखी पुढे कित्येक दिवस जपणारा तो भाऊराया नजरेसमोरहून हटत नाही. ‘ताई, तुझं प्रेम मनात साठवलंय’ असंच जणू काही तो सांगत असतो. राखीचा हा धागा विश्‍वास असतो. बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ स्वतःचं रक्षण मागत नाही. तर, सर्व स्त्रीजातीच्या संरक्षणाची जबाबदारी, अपेक्षा त्याच्याकडून करते. किती उदात्त विचार, प्रेमभावना त्यामागे असते. मनाचं बंध जोडण्याचं असं कसब केवळ आपल्या भारतीय सणांत पाहायला मिळतं हे मात्र नक्की. 

लहानपणी कोणतंही कारण भांडणासाठी पुरतं. अगदी आई फक्त माझीच आहे, असं म्हणणं असो, की रंगीत खडू, रबर, पुस्तकं, आवडणारा खाऊ. एवढ्या- तेवढ्यावरून सुरू झालेलं भांडण कधी संपेल आणि परत दोघांची गळाभेट होईल काही सांगता येत नाही. लहानपणी रुसून बसलेल्या भावाला आपल्या हिश्‍शातला बेसनाचा लाडू प्रेमानं भरविणारी बहीण आणि बाबांकडून मिळणारा मार चुकविण्यासाठी तिच्या मागे लपणारा भाऊराया. हीच तर पुढील आयुष्यातील शिदोरी. मग मोठेपणी हाच भाऊराया तिच्या संसारातल्या अडचणींच्या वेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि तीदेखील किती सहजतेने त्याला वडिलांच्या जागी नेऊन ठेवते ते कळतही नाही. 

स्त्री वयाच्या कोणत्याही उंबरठ्यावर असली तरी माहेरची ओढ, पर्यायानं भावाचं प्रेम शोधत असते. लग्नानंतर नवीन घरची जबाबदारी तिच्यावर येऊन पडते. तरी मनाच्या हळूवार कोपऱ्यात माहेरची नाती, ऋणानुबंध जपत असते. माझ्यासमोर बसलेली सुनीला सांगत होती. लहानपणी कधीही साधे भाजलेले चिंचोके किंवा उकडलेल्या फणसाच्या आठळ्यांवरूनही आमची भांडणं झाली नाहीत. खूपच समजूतदार होता माझा भाऊ, पण आता असं काय घडलं कोणास ठाऊक. आम्ही जन्माचे वैरी झालोय. काय करणार? राखीपौर्णिमा आणि भाऊबिजेला खूप आठवण येते. तशी तर ती रोजच येत असते. खूप भेटावसं वाटतं. पण, आता आम्ही कोर्टातच भेटतो. कोर्टाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागो, नाती दुभंगतात ती परत जोडली जात नाहीत. 

एका गावातलं मोठं घराणं म्हणून नावलौकिक असलेलं इनामदार घराणं. एकदम मोठं प्रस्थ. वडिलांनी त्यांच्या वाडवडिलांकडून आलेली सगळी संपत्ती जिवापाड जपली. स्वकष्टाने त्यात भर घातली. जमीन-जुमला, मोठा चौपदरी वाडा, पिढीजात दागदागिने, वडिलांच्या मृत्यूनंतर कायद्याप्रमाणे बहिणींनाही त्यांचा हक्क मिळावा. आपल्या आई-वडिलांची आठवण व त्यांचे आशीर्वाद आपल्याकडेदेखील असावेत असं कोणालाही वाटेल. पण, भावाने सगळा व्यवहार परस्पर करून बहिणींच्या तोंडाला पानं पुसली. आता वर्षानुवर्षे कोर्टात फेरे मारून बहीण-भावाच्या नात्यांचा अजब असा न सुटणारा गुंता झालाय. कशी सांधणार ही दुभंगलेली मनं? एकमेकांबद्दल कलुषित झालेली मनं सांधायला सण कायमच कामी येतात. सणांचा महिमा असतोच मोठा की हेवेदावे विसरून माणसांनी एकत्र यावं. 

राखीच्या प्रेमबंधनाचं हेच तर वैशिष्ट्यं आहे. दिसायला तो एक साधा धागा. तरी कधीही न तुटणारं बंधन आहे. त्या रेशमी धाग्यात प्रचंड ताकद आहे. आयुष्यभर पुरेल असं प्रेम आहे, विश्‍वास आहे, माया आहे. बहीण-भावाच्या प्रेमाचा खळखळता झरा असाच वाहत राहू दे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com