भाषा आणि आपण

file photo
file photo
भाषा ही एक जादुई गोष्ट आहे. भाषेबरोबर आपली नाळ अगदी जन्मापासून जुळलेली असते. जन्म झाल्यानंतर जसजसे आपण वाढत जातो, अगदी तसतशीच भाषा आपल्याबरोबर वाढत जाते. आपल्या आईवडिलांचे, कुटुंबातील इतर सदस्यांचे आणि आपल्या भोवताल असलेल्या लोकांचे बोलणे ऐकत आपण अगदी नैसर्गिकरीत्या भाषा शिकायला सुरुवात करतो. ही प्रक्रिया इतकी सहज असते की आपल्या लक्षातही येत नाही की आपल्या भोवतालच्या विश्वाची आणि आपली स्वतःची ओळखदेखील आपण बोलतो त्या भाषेमुळे बनत जाते. आपण आपल्या भाषेबरोबर इतके एकरूप होतो की आपण बोलतो त्या भाषेव्यतिरिक्त दुसरी कुठली भाषा जगात असेल, याचा विचारदेखील करू शकत नाही. मात्र जगात अनेक भाषा आहेत. अगदी संख्याच सांगायची झाल्यास जगात तब्बल सहा हजार भाषा आहेत आणि त्यातली प्रत्येक भाषा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सर्व भाषा एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. जगात किती विविधता आणि किती गुंतागुंत आहे! भाषेचा उगम नेमका कुठून झाला असेल, याचा विचार मनात आला. खरं म्हणजे आपण हे समजून चालत असतो की की भाषा ही हवेसारखी शाश्वत आहे ती नेहमी आपल्या भोवताली असतेच; मात्र खरेच तसे आहे का? मराठी भाषादेखील स्थित्यंतरातून निर्माण झालेली आहे. एक वेळ होती, जेव्हा मराठी भाषा अस्तित्वातच नव्हती. इतर अनेक भारतीय भाषांप्रमाणे मराठीचा उगमदेखील प्राकृत भाषेतून झाला, विशेषकरून महाराष्ट्री प्राकृत भाषेतून झाला. मराठीच्या अस्तित्वाच्या पहिल्या पाऊलखुणा या सातारा परिसरात आढळलेल्या आठव्या शतकातील ताम्रपटामध्ये सापडतात. थेट आठव्या शतकात- हे खरोखरच विलक्षण नाही का? मराठी किंवा आपल्या स्थानिक भाषांचा इतिहास आपल्याला एका वैभवशाली भाषाविश्वाची सफर घडवून आणतो. त्या काळात भाषेचे हे विश्व खूप वैशिष्ट्यपूर्ण होते. फक्त मराठीच नव्हे, तर मुळात भाषांचाच उगम कसा झाला असेल? भाषा अस्तित्वात कशी आली असेल? या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेक सिद्धांत आणि दंतकथा आहेत, मात्र एकही सिद्धांत किंवा कथा या प्रश्नाचे समर्पक उत्तर देऊ शकलेली नाही. कारण मुळात हा प्रश्नच अतिशय कठीण आहे. या सर्व सिद्धांतांच्या गर्दीत माझ्या बुद्धीला पटलेला असा एक सिद्धांत सांगणार आहे. भाषेच्या उगम आणि विकासाचे उत्तर शोधताना चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत सगळ्यांनीच अभ्यासावा. मानवी उत्क्रांतीमध्ये सध्याचा मानव म्हणजे होमो सेपियन. मानवाची ही प्रजाती काही लक्ष वर्षे जुनी आहे. नेमके मानवाने भाषा बोलायला कधी सुरुवात केली, याची कुठलीही नोंद नसल्यामुळे भाषेच्या उगमाचा नेमका कालखंड सांगणे कठीण आहे. तरीही भाषेचा आविष्कार हा अंदाजे 1 ते 2 लक्ष वर्षे जुना असावा. असे म्हणतात की या कालखंडामध्ये मानवांमध्ये FOXP2 नावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण असे जीन्स विकसित झाले, ज्यामुळे माणसाला बोलण्याची देणगी प्राप्त झाली. याव्यतिरिक्त काही सिद्धांत हे धार्मिक आणि पौराणिक कथांवर आधारित आहेत. बायबल आणि ग्रीक दंतकथा सांगतात की भाषेची देणगी थेट ईश्वराने मानवाला दिली. आणखी एक सिद्धांत आहे जो खरोखरच विस्मयकारक आहे. हा सिद्धांत सांगतो की पृथ्वीवरील मानवजात ही अधिकाधिक सामर्थ्यशाली होत असल्याचे पाहून काही परग्रहवासी पृथ्वीवर आले आणि मानवाला वेगवेगळ्या भाषा दिल्या, जेणेकरून पृथ्वीवरील मानव विभागले जावेत आणि मानवजात कमकुवत व्हावी. काही भाषाशास्त्रज्ञ वेगळाच सिद्धांत मांडतात. त्यांच्या मते, भाषा विकासातला पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे माणसाने चार पायांवर चालणे सोडून दोन पायांवर चालणे सुरू केले तो क्षण. कारण दोन पायांवर चालणे सुरू केल्यानंतर माणसाचे दोन हात मोकळे झाले आणि हातवाऱ्याची भाषा बोलायला सुरुवात झाली. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा माणसाने अवजारे आणि हत्यारांचा शोध लावला, तेव्हा हातात अवजारे असल्यामुळे हातवारे करून बोलणे बंद झाले आणि संवादाचे केंद्र हे चेहऱ्यावरील हावभाव आणि तोंडातून येणारे आवाज यावर केंद्रित झाले. तर भाषा नेमकी कशी निर्माण झाली, याचा विचार करताना येणारे हे सिद्धांत, ही उत्तरे, जाणून घेणे हाच एक विलक्षण मनमोहक असा अनुभव आहे. मात्र हे सर्व खरे असले तरीदेखील आता मला तुम्हा सगळ्येंना वर्तमानकाळात परत आणायचे आहे. आज काही लोक राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली संपूर्ण देशावर एक भाषा थोपवण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र एक सत्य आपण समजून घेतले पाहिजे की ज्याप्रमाणे भाषा ही एकमेकांशी संवाद करण्यासाठी बनवली गेली आहे, त्याचप्रमाणे ती काही लोकांना समूहाच्या बाहेर ठेवण्याच्या उद्देशानेदेखील बनवली गेली आहे. अनेकदा लोक इतरांना ते काय बोलत आहेत त्यापासून अनभिज्ञ ठेवता यावे यासाठी त्यांच्या विशेष भाषेत संवाद करतात. अशाप्रकारे वापरली जाते, तेव्हा भाषा ही इतर बाहेरच्या लोकांपासून स्वतःचे संरक्षण करणारी गोष्ट ठरते. वास्तविक पाहता एक कोणती भाषा देशातील सर्व जनतेवर थोपवण्यापेक्षा देशातील सर्व भाषांचा त्यांच्या वैशिष्ट्यांसह योग्य सन्मान राखणे ही काळाची गरज आहे. भाषा आपल्याला नव्या विश्वात प्रवेश देते, नव्या गोष्टी जाणण्याचे सामर्थ्य देते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समजून घेण्याची शक्ती देते. सर्व भाषा या समान महत्त्वाच्या आहेत. त्यांचा योग्य सन्मान व्हायला हवा, तसेच सर्वच भाषांचा प्रसार व्हायला हवा. भाषा अगदी आपल्या नकळत आपल्या जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com