
हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक : कॅपिटॉल बॉम्बस्फोटात जेवणाच्या डब्याचं कनेक्शन माहितीये?
हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक आत्मार्पण दिन ३१ जाने १९४३ पुण्याच्या कॅपिटॉल बॉम्बस्फोट कटाचे मुख्य सूत्रधार हुतात्मा भास्कर कर्णिक यांचा आज स्मृतीदिन. आज त्यांच्याविषयी जाणून घेऊ. रत्नागिरी जिल्ह्यात( सद्याचा सिंधुदुर्ग) करूळ या गावी भास्कर पांडुरंग कर्णिक यांचा जन्म ७ डिसेंबर १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ या गावी झाले. वयाच्या १०/१२ व्या वर्षी त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी कर्नाटकातील गुलबर्ग्याला जावे लागले .पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. १९४२ साली ते पुण्याच्या देहूरोड ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरी करू लागले.
तेव्हा ब्रिटीश्यांविरोधात चळवळींनी जोर धरला होता. भूमिगत राहून कारवाया करणारी अनेक मंडळी सक्रिय होती. भास्कर कर्णिक यांचाही गट स्फोटकांच्या शोधात होता. कर्णिक स्वतः ऍम्युनेशन फॅक्टरीमध्ये नोकरीस होते, त्यामुळे त्यांनी दररोज जेवणाच्या डब्यातून बॉम्ब चोरण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे अनेक बॉम्बचा साठा त्यांनी करून ठेवला.
या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहातील स्फोटात वापरण्यात आले. दिनांक २४ जानेवारी १९४३ रोजी रात्री साडेनऊ वाजता पुणे कॅंटोन्मेंट भागातील कॅपिटॉल आणि वेस्ट एण्ड चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविण्यात आले. यात ३ इंग्रज अधिकारी ठार झाले, १४ जण जखमी झाले.
पुणे फरासखाना पोलिस चौकीत भास्कर कर्णिक यांना वीरमरण या स्फोटाच्या तपासात बॉम्बच्या तुकड्यांवरून ते बॉम्ब देहूरोडच्या फॅक्टरीमधील असल्याचे समजले. तेव्हा क्रांतिवीर भास्कर कर्णिक यांना ३१ जानेवारी १९४३ रोजी पकडले. यावेळी बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले अन्य क्रांतिकारक बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये यांनाही पकडून जेलमध्ये टाकले होते. पैकी दत्ता जोशी यांस जेलमध्येच वीरमरण आले.अधिक तपासात पोलिसांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले.
कटाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले पाहून क्रांतिवीर भास्करराव कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली. आणि काही सेकंदात त्यांना वीरमरण आले. कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा अशाप्रकारे नाहीसा झाला. त्यामुळे पोलिसांची निराशा झाली.
कर्णिकांच्या आत्मार्पणामुळे अनेक क्रांतिकारक वाचले. असे होते हे धाडसी करूळ, सिंधुदुर्गचे सुपुत्र हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक! आज पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या अलिकडे मजूर अड्डयाजवळ हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांचा स्मृतीस्तंभ त्यांची वीरगाथा सांगत उभा आहे. करुळ या त्यांच्या जन्मगावीदेखील त्यांच्या नावे हुतात्मा स्मारक उभारलेले आहे. या वीराला शतश: नमन!
लेखक - पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने
Web Title: Bhaskar Pandurang Karnik The Connection Of The Lunch Box The Capitol Bomb Blast
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..