गज़लच्या ब्रॅण्डची पन्नाशी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhimrao Panchale

मराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गज़लनवाज भीमराव पांचाळे. गेल्या ५० वर्षांपासून उत्साहाने ते गज़ल गात आहेत.

गज़लच्या ब्रॅण्डची पन्नाशी!

मराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गज़लनवाज भीमराव पांचाळे. गेल्या ५० वर्षांपासून उत्साहाने ते गज़ल गात आहेत. वयाची ७२ वर्ष त्यांनी पूर्ण केली; पण गज़लप्रमाणेच त्यांची गायकीही तरुणच आहे, हे त्यांच्या गज़लगायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात अधोरेखित केले. या मैफलीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी गज़लच्या सूरांसोबत गुंफल्या. गज़लचा नाद लागण्यापासून ‘कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी, कितीदा ठार झालो मी’ अशा अनेक गज़ल गात समाधानी जगण्याची भावोत्कट कहाणी त्यांनी पेश केली.

गेली ५० वर्षं मी मराठी गज़लला वाहून घेतलं आहे; मात्र मागे वळून बघताना कधीही ‘रिग्रेट’ वाटलं नाही. नऊ वर्षांचा असताना मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. त्यानंतर उर्दूही शकलो... सुरुवातीला ठुमरी, मुशायराची ओढ होती. नंतर मराठी गजलकडे वळलो. ‘खुळा नाद’, ‘भिकेचे डोहाळे लागलेत’ असं काही जणांकडून ऐकायला मिळायचं; पण मी माझ्या निश्चयापासून दूर गेलो नाही. जे मिळत गेलं ते हसत स्वीकारलं. सर्व जमत गेलं. प्रवासात मोठा मित्रपरिवार भेटला; गुरू लाभले. हळूहळू वातावरणात भरण-पोषण आलं. ‘आपला निर्णय योग्य आहे’ असं वाटायला लागलं. आता अवघं आयुष्य ‘श्वास गज़ल, निःश्वास गज़ल, जगण्याचा विश्वास गज़ल’ बनलं आहे.

मी शब्द देतो, शब्दांचं सोनं तुम्ही करा...

‘जगत मी आलो असा की,

जसा जगलोच नाही,

एकदा तुटलो असा की,

मग पुन्हा जुळलोच नाही,’

मराठीमध्ये गज़ल रुजवणाऱ्या सुरेश भटांच्या या ओळींनी मला गज़लच्या प्रेमात पाडलं. गज़लकार सुरेश भट यांची भेट मी कधीही विसरू शकत नाही. अमरावतीच्या राजकमल चौकात ते नेहमी येत असत. त्या वेळी मी खूपच लहान होतो; पण त्यांच्या मराठी गज़लने माझ्यावर भुरळ घातली. मी त्यानंतर पूर्णच ‘वाया’ गेलो. भटांचा सहवास आणि गज़ल यामध्ये मी असा गुरफटायचो की त्यामुळे कित्येकदा गाड्या चुकवल्या आहेत. ते नेहमी म्हणायचे, ‘‘मी शब्द देतो, शब्दांचं सोनं तुम्ही करा.’’ आम्ही प्रयत्न करत गेलो, भटरूपी परिसाचा स्पर्श आम्हाला होत गेला. मी गज़ल करायचं ठरवलं, पुढे मी काय करावं, हे नंतर गज़लने ठरवलं.

गज़ल गायकीमध्ये आशय महत्त्वाचा...

गज़ल गायकीमध्ये आशय महत्त्वाचा असतो. गज़ल आशयप्रधान करते. त्यामुळे मी आशयप्रधान गायकीवर भर देतो. गज़ल पेश करताना नुसतं कंठातून गाऊन चालत नाही. त्यामुळे हृदयातून निघालेले सूर मी रसिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. ते थेट रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडतात. सुरेश भट नेहमी म्हणायचे, ‘आशय प्रथम, गायकी दुय्यम असायला हवी’, हे मी नित्यनेमाने पाळले. गज़लमध्ये आशयाकडे दुर्लक्ष क्षम्य नाही.

गज़ल हीच माझी ऊर्जा...

मी वयाची ७२ वर्षं पूर्ण केली. ५० वर्षं मराठी गज़लचे काम करतोय. आजही दौरे, कार्यक्रम करतो; पण कधी थकवा जाणवला नाही. ये सब गज़ल की देन है. गज़लमधून मला ऊर्जा मिळते. वयाच्या साठीनंतर थांबायचं, असं मी ठरवलं होतं. स्वर ढळतोय की काय, अशी भीती वाटायची. शरीर साथ देईल की नाही, असा प्रश्न पडायचा; पण अजून तरी थकावट आली नाही. आता मी सारं मायबाप रसिकांवर सोडलं आहे. रसिक सांगतील तेव्हा थांबायचं. तोपर्यंत गातच राहायचं आहे.

गुरुकुल अब ख्वाब ही रहने दो...

गज़लसाठी समर्पित गुरुकुल सुरू करायचं स्वप्न मी पाहिलं होतं. त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. त्यात काही अडचणी होत्या. शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. शासनाच्या माध्यमातून अडचणी सुटतही होत्या. माहीत नाही का; पण ते पूर्ण झालं नाही. गुरुकुल का ख्वाब अब ख्वाब ही रहने दो; पण त्यासोबतच मी आष्टगाव येथे सुरेश भटांच्या नावाने ग्रंथालय/वाचनालय सुरू केलं. त्या माध्यमातून गज़लच्या १०८ कार्यशाळा घेतल्या. अनेक उमेदीचे गज़लकार, गायक, संगीतकार त्यातून निर्माण झाले आहेत. हीच पिढी पुढे गज़लचे वाहक बनणार आहेत. अजूनही काम सुरूच आहे.

गज़लेत गाण्याचा मोह टाळायला हवा...

गज़ल हे केवळ गाणं म्हणणं नाही. गज़लकाराने लिहिलेले शब्द, त्यातील भाव, व्यथा, दुःख, आनंद, जो भाव असेल तो रसिकांपर्यंत पोचवणं गरजेचं असतं. ते नुसतं गाणं गाऊन होत नाही, हे मी सुरेश भटांकडून शिकलो. गज़लमध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकाने गाण्याचा मोह टाळायला हवा. आपली स्वतःची शैली तयार करायला हवी. स्वतंत्र शैली म्हणजे तुमचा स्वतंत्र चेहरा असतो.

‘रिॲलिटी शो’मध्ये अनुकरण अधिक...

अनेक लोक एखाद्याचं अनुकरण करतात. अनुकरण या चांगल्या कुबड्या आहेत, असं मी मानतो. त्या सुरुवातीला चालण्यासाठी ठीक आहेत; पण चालणं शिकल्यानंतर त्या फेकून दिल्या पाहिजेत. अनुकरणाच्या कुबड्या जितक्या लवकर टाकाल तेवढ्या लवकर तुम्ही उभं राहाल. बरेच लोक कुणाचंतरी अनुकरण करणं, कुणासारखं तरी होण्याचा प्रयत्न करतात. ‘रिअॅलिटी शो’मध्ये हे प्रकर्षानं जाणवतं. ‘कही गये नही, कुछ लाए नही’ अशी रिॲलिटी शोची अवस्था आहे. मी माझ्या मुलीलाही सांगितलं आज; की ‘तू तुझं कर, कुणाचंही अनुकरण करू नकोस.’

वारसा वगैरे काही नसतं...

अनेक जण मला विचारतात, की तुमचा वारसा, गज़लचा वारसा कोण चालवणार?

वारसा वगैरे काही नसतं. आपला वारसा कोण चालवेल, याचा विचार मी कधीच केला नाही. आपला कुणी वारसा चालवतं, यावर माझा विश्वास नाही. एखाद्याला ऐकायचं, त्याच्याकडून शिकायचं, पण आपलं आपण काम करायचं. आपलं काम करत राहा, बस्स.

मुंबईनं ओळख दिली...

मी अमरावतीमधील एका छोट्या खेड्यातून मराठी गज़लच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर साधारणतः १० वर्षांनी मी मुंबईला आलो. मला खरी ओळख मुंबईनं दिली. सर्व जडण-घडण इथंच झाली. आजपर्यंत दोन हजार मैफली केल्या. गज़लच्या निमित्तानं भारतभर हिंडलो. १७-१८ देश फिरलो. ही सर्व मुंबईचीच देण आहे.

हिंदी-मराठी गज़लचे प्रयोग....

‘है अंधेरी रात,

फिर भी रोशनी ही बात कर,

लावण्या तू दीप येथे,

काळजाची वात कर.’

गजल करत असताना मायबाप रसिकांना आवडतील असे अनेक प्रयोग केले. हिंदी-मराठीमिश्रित गजल हादेखील त्यातील एक प्रयोग. अनेकदा मैफलीत ये हमने परोसा है. मायबाप रसिकांना ते आवडलंदेखील. मैफलींमध्येही अनेक प्रयोग सुरूच असतात.

अमेरिकेतील दौरा अविस्मरणीय...

अमेरिकेतील परदेशवारी कायम लक्षात राहण्यायोग्य होती. ती मी कधीच विसरू शकत नाही. भीमराव पांचाळे नाव असलेली व्यक्ती कशी गाऊ शकते, असं काहीजण हिणवायचे. रसिकांचं मराठी गज़लला भरभरून प्रेम मिळाल्यानं, त्याच्या समक्षच मी अनेक दौरे केले. अमेरिकेतील अशाच एका मैफलीत मी गज़ल पेश करत होतो. हॉल खूप मोठा होता. ३००-४०० रसिक होते; पण जसा कार्यक्रम पुढं सरकला, तसे पुढील १० ते १५ मिनिटांमध्ये तीन हजारांहून अधिक रसिक हॉलमध्ये जमले. हॉल खचाखच भरून गेला. कार्यक्रम दीड तासांचा होता; पण साडेतीन तास कधी सरले ते कळलंच नाही.

गज़ल गायकीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे...

वाचलेली ऐकलेली,

माणसे गेली कुठे,

पुस्तकातून वाचलेली

माणसे गेली कुठे

उर्दू-हिंदी गज़ल गायकीमध्ये मेहंदी हसन, गुलाम अली, जगजीत सिंह, भूपिंदर सिंग अशा अनेक गायकांनी आपला ठसा उमटवला. गुलाम अली थकले आहेत, तर अनेक दिग्गज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मेहंदी हसन यांनी गज़लला चेहरा दिला. त्यानंतर गज़ल एक वेगळ्या उंचीवर गेली. अनेक गज़लकारांनी, गायकांनी गज़लला आपलं योगदान दिलं, आपला रसिकवर्ग तयार केला. त्यातील एक एक खांब निखळतोय. त्यामुळे पोकळी निर्माण झाली, हे खरं आहे; पण कला कधी मरत नाही. एवढी स्थित्यंतरं आली; पण कला जिवंत राहिली.

कधीही कुणाची कॉपी केली नाही...

आताचे अनेक गायक इतरांची कॉपी करतात; पण ते योग्य नाही. मीही अनेकांना ऐकतो, शिकतो; पण गेल्या ५० वर्षांत एकदाही कुणाची कॉपी केली नाही. कॉपी केलेलं तत्काळ उभं राहणारं असलं, तरी ते चिरकाल टिकणारं नसतं. नवीन प्रयोग करत राहायचे. त्यातून नक्कीच नवीन कृती जन्म घेते.

समाजमाध्यमांनी सगळं बिघडवलंय...

आज समाजमाध्यमांचा मोठा बोलबाला आहे. काहीजण फेसबुक, व्हाट्सॲपवर अधिक ॲक्टिव्ह असतात; पण त्यावरील यश हे किती काळ टिकेल माहीत नाही. या सर्व बदलामुळे गज़लकारांसमोर आव्हानं उभी राहिली आहेत; पण जे तत्काळ उभं राहतं ते तितक्याच वेगानं रसातळाला जातंदेखील. त्यामुळे सामाजमाध्यमांवर फार विसंबून काम करणं योग्य नाही.

आज कुठलीही खंत नाही...

सुरुवातीचे दिवस खूप खडतर होते. आज गज़लरसिकांच्या प्रेमाने या मुक्कामी पोचलो; पण जुने दिवस आठवले की ‘आपण बरंच भोगलं आहे’ असं कधीच वाटत नाही. उलट ते दिवस आठवले की त्यातून ऊर्जा मिळते. श्रोत्यांचं अमाप प्रेम मिळालं आहे. सरकारकडूनही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शेवटी इतकंच म्हणेन...

सावली मला ना,

पालवीने दिली,

ना फुलांनी दिली,

सावली मला त्या,

सूर्याने दिली...

टॅग्स :marathiSakalsaptarang