जोखीम आणि नफा (भूषण गोडबोले)

bhushan godbole
bhushan godbole

शेअर बाजाराच्या संदर्भात वेगवेगळे व्यवहार होत असतात. "ऑप्शन मार्केट' असाही शब्द नेहमी वापरला जातो. नेमके कसे व्यवहार तिथं होतात, जोखीम किती असते आदी गोष्टींबाबत माहिती.

जीवनाची शाश्वती देता येईल का? अर्थातच नाही! तरीही सकारात्मकतेनं आपण सर्व जण जगत असतोच. प्रत्येक जबाबदार व्यक्ती जीवनातल्या अनिश्‍चततेचा धोका ओळखून आयुर्विमा; तसंच आरोग्य विमा काढते. ज्याप्रमाणं आयुर्विमा अथवा आरोग्य विमा काढता येतो, त्याचप्रमाणं शेअर बाजारातली अनिश्‍चतता आणि धोका ओळखून शेअर बाजारातही आयुर्विम्याप्रमाणं विमा घेता येईल का? टर्म इन्शुरन्स काढल्यास छोट्या प्रीमियममध्ये मोठं कव्हर मिळतं. उदाहरणार्थ, कमी वयात असताना टर्म इन्शुरन्स काढल्यास अगदी पाच ते दहा हजार रुपये भरल्यास पन्नास लाख ते एक कोटी रुपयांचं विमा कवच किंवा कव्हर मिळतं. टर्म इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणं विमा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास विमा नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. मात्र, विमा कालावधीमध्ये विमाधारक जिवंत असल्यास प्रीमियमच्या स्वरूपात भरलेल्या छोट्या रकमेचं नुकसान होतं; मात्र बहुमूल्य असं जीवन जगण्याचा आनंद घेता येत असतो. समजा आपण शंभर रुपये देऊन दहा लाख रुपयांचं लॉटरीचं तिकीट काढल्यास अर्थातच फक्त शंभर रुपयांचा धोका असतो; मात्र फायदा झाल्यास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

शेअर बाजारातदेखील अशा प्रकारे इन्शुरन्स किंवा लॉटरीच्या तिकिटासारखा व्यवहार करता येतो. जोखमीबाबत आधीच विचार करून तशा प्रकारचा व्यवहार करण्याचा हा प्रकार. शेअर मार्केटमध्ये अशा प्रकारचे व्यवहार ऑप्शन मार्केटमधे करता येतात. ऑप्शन मार्केटमध्ये कॉल आणि पूट असे दोन प्रकार आहेत. कॉल ऑप्शन खरेदी करणं म्हणजे प्रीमियम देऊन तेजीचा व्यवहार करणं. समजा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 10,000 अंशांना आहे आणि आगामी कालावधीमध्ये किंवा आगामी महिन्यात निफ्टी 10,400 अंशांपर्यंत जाणं अपेक्षित आहे म्हणजेच महिन्याभरात निफ्टी अंशांची तेजी दर्शवणं अपेक्षित आहे, अशा वेळेस 10,000 या पातळीचा कॉल ऑप्शन 100 रुपये प्रीमियम देऊन आपण खरेदी करू शकतो. ऑप्शन मार्केटमध्ये लॉटनं म्हणजेच गठ्ठ्यानं व्यवहार करावे लागतात. समजा, निफ्टीचा गठ्ठा 75चा आहे. अशा वेळेस 100 गुणिले 75 म्हणजेच या व्यवहारासाठी 7500 रुपयांचा प्रीमियम जमा करावा लागेल. आगामी कालावधीमध्ये निफ्टीनं अपेक्षेप्रमाणं 10,400 अंशांपर्यंत तेजी दर्शवल्यास 10,400 वजा 10,000 म्हणजेच 10,000चा कॉल ऑप्शन 400 अंशांनी इन द मनी किंवा खरा ठरला आहे. या व्यवहारात एका कॉल ऑप्शनसाठी 100 रुपये प्रीमियम भरला होता. यामुळे 400 वजा 100 म्हणजेच 300 रुपयांचा फायदा एका कॉल ऑप्शनसाठी होईल. कॉल ऑप्शनचा गठ्ठा 75 चा असल्यानं 300 गुणिले 75 म्हणजेच 22,500 रुपयांचा एकूण नफा या व्यवहारात मिळेल. मात्र, निफ्टीनं तेजी दर्शवण्याऐवजी कितीही मंदी दर्शवली असती, तरीदेखील लॉटरीच्या तिकिटाप्रमाणं 7500 या प्रीमियमपेक्षा जास्त नुकसान होऊ शकत नाही.

कॉल ऑप्शनची खरेदी करून ज्याप्रमाणं अल्प धोका स्वीकारून तेजीचा व्यवहार करता येतो, त्याचप्रमाणं पूट ऑप्शन खरेदी करून मंदीचा व्यवहार करता येतो. बाजारात मंदी येण्याचे संकेत मिळत असल्यास प्रीमियम देऊन पूट ऑप्शन खरेदी करता येतो. पूट ऑप्शन खरेदी केल्यावर अपेक्षित मंदी आल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो; मात्र मंदी न येता तेजी आल्यास पूट ऑप्शनसाठी भरलेल्या प्रीमियमपेक्षा जास्त नुकसान होत नाही. समजा, एखाद्या गुंतवणूकदारानं शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शेअर बाजार वधारल्यानं त्या गुंतवणुकीवर उत्तम नफा होत आहे; मात्र निर्देशांक घसरल्यास नफा जाऊन तोटा होण्याची भीती वाटत असेल, तर अशा वेळेस मोठ्या प्रमाणात फायदा होत असताना छोटा प्रीमियम देऊन पूट ऑप्शन खरेदी केल्यास होणाऱ्या नफ्यासाठी विमा कवच खरेदी केल्यासारखं आहे. निर्देशांकानं अपघातासमान अचानक मोठी घसरण दर्शवल्यास शेअरमधल्या गुंतवणुकीवर होणारा नफा कमी किंवा नाहीसा होईल; मात्र निर्देशांकानं घसरण दर्शवल्यानं पूट ऑप्शनमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकेल. निर्देशांकानं घसरण न दर्शवता तेजीच दर्शवल्यास पूटमधे प्रीमियमइतकंच नुकसान होईल. मात्र, पूर्वी केलेल्या शेअर्समधल्या गुंतवणुकीवरचा नफा आणखी वाढेल. अर्थात हे सगळं असलं, तरी लॉटरीसारखा व्यवहार करताना कमी रक्कम भरून मोठा फायदा होण्याची शक्‍यता असूनदेखील लॉटरीचं तिकीट सर्वांनाच लागणार नसतं, ही गोष्टही लक्षात घेणं अत्यंत आवश्‍यक आहे.

डिस्क्‍लेमर ः गुंतवणुकीशी संबंधित विविध गोष्टींबाबतची कल्पना येणं एवढ्याच मर्यादित हेतूनं प्रस्तुत माहिती देण्यात आली आहे. या संदर्भातली जोखीम लक्षात घेऊन, कोणतेही व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com