esakal | IPO साठी गुंतवणूकदार क्रेझी !
sakal

बोलून बातमी शोधा

Investors

IPO साठी गुंतवणूकदार क्रेझी !

sakal_logo
By
भूषण महाजन

शेअर बाजारासाठी २०२१ हे वर्ष सुगीचं ठरलंय. बाजार फार महाग आहे असे म्हणता म्हणता आता बरेच तज्ज्ञ शेअर बाजाराचे गोडवे गायला लागलेत. नवीन भागविक्रीनं तर नव्या गुंतवणूकदारांना वेडच लावलंय. किमान ५० टक्के ‘आयपीओ’ घसघशीत फायदा करून देताना दिसतात. आजपर्यंतचा इतिहास सांगतो, की गुंतवणूकदाराला फायदा व्हावा या उदात्त हेतूनं प्राथमिक भागविक्री कधीही होत नाही. महापुरात आपली मुठा नदीही गंगेसारखी दिसते, तसेच तेजीत कुठलाही इश्यू खपतो व पुढे बाजारात सूचीबद्ध झाल्यावरही थोडाफार नफा देऊन जातो. पण एकतर अर्ज केल्यावर नशीब चांगले असेल तर हातात १२-१५ पंधरा शेअर्स येतात, व ते विकण्याची इतकी घाई होते की थोडा फार नफा जरी वसूल झाला तरी छोटा गुंतवणूकदार सुखावतो. खरं तर नवीन शेअर सूचीबद्ध झाल्यावर पटत असल्यास नव्याने घेऊन त्याचा पाठपुरावा करायला हवा तरच मोठे पैसे जमा होतील. उदा. डीमार्ट. ३०० रुपयांना मिळालेला शेअर ६०० रुपयांना सूचीबद्ध झाला आणि आजही पाचपट किमतीला आहे. नव्या शेअरची भाववाढ म्हणजे चढती पातळी कधीपर्यंत टिकेल हे सांगता येणार नाही, विकायचे कधी हे कोणालाच कळत नसल्यामुळे, मनात ‘स्टॉप लॉस’ ठेऊन, वेळच्यावेळी नफा ताब्यात घेतलेला चांगला. ‘ बेचके पछताओ ’ हे कलम इथे उपयोगी पडते, कारण अमर्याद भांडवल कुणाकडेच नसते व मोकळे झालेले भांडवल पुन्हा नव्याने गुंतवलं जातंच.

या पार्श्वभूमीवर बहुचर्चित झोमॅटोचा विचार करू. नुकत्याच संपलेल्या या भागविक्रीला भरघोस मागणी गुंतवणूकदारांकडून होती. छोट्या गुंतवणूकदारांसाठी जेमतेम १० टक्के कोटा होता. तो पहिल्याच दिवशी संपला. शुक्रवारपर्यंत किमान ३८.८ पट भरणा झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये ८५ ते ९० रुपयांचा भाव सांगतात. रिटेल कोट्याला सातपट मागणी होती. तेव्हा नशिबानं जे काही २०-२५ पंचवीस शेअर्स मिळतील ते लागलीच विकून तीन चारशे रुपये खिशात टाकण्याची लगबग सुरू होईल. असो.

विकायची घाई यासाठी की कंपनी सध्या तोट्यात आहे. फायदा कधी होणार हे ठाऊक नाही. त्यात मुख्य प्रवर्तक पंकज चढ्ढा व दीपेंदर गोयल प्रत्येक बाजार मूल्यांकनाला स्वत:चे भांडवल विकूनच दाखवतात. आता त्यांच्याकडे जेमतेम (१.७५ टक्के ) व ( ७ .७५ टक्के) शेअर्स उरले आहेत. जुने जाणकार सांगतात, की कंपनीत प्रवर्तकच नसेल, तर त्यात गुंतवणूक करू नये. मात्र नव्या युगातील स्टार्ट अप उद्योगांना हा नियम लागू नाही. एक कल्पना विकसित करणे व पुढे कार्यक्षम व्यवस्थापनाकडे सोपवणे, मालकी व व्यवस्थापन स्वतंत्र ठेवणे हा या युगाचा बाणा आहे. फ्लिपकार्टची पद्धत हीच. तेव्हा यापुढे प्रवर्तक म्हणून इन्फोएजचेच नाव घ्यायला हवे. इतर गुंतवणूकदार अलीपे, सॉफ्टटेल, अँट ग्रुप सारखे ताकदवान, अनुभवी व दीर्घ पल्ल्याचे गुंतवणूकदार आहेत. ते व्यवस्थापनाला काट्यावर ठेऊन प्रक्षेपित कामकाज करून घेतील.

कंपनीला सध्या विक्रीइतकाच तोटा होतो हा एक आक्षेप आहे. पण त्यातही मेख अशी की ई- कॉमर्स क्षेत्रातले शेअर पी ई गुणोत्तर किंवा नफा, तोटा बघून जोखले जात नाहीत. भारतात बाहेरचे जेवण मागवणारे फक्त १० टक्के नागरिक आहेत. अमेरिकेत हे प्रमाण ५० टक्के व चीनमधे ६८ टक्के आहे. सध्या नोकरीमुळे, शिक्षणामुळे व येत नसल्यामुळे गृहिणींचा स्वयंपाकाचा कंटाळा बघितला तर भारतातही हे प्रमाण पुढील तीन वर्षांत २५ टक्क्यांवर जाईल. झोमॅटोची वार्षिक ऑर्डर उलाढाल यावर्षी १२ हजार कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. यावर २० ते २५ टक्के कमिशन मिळते. एका ऑर्डरचे सरासरी बिल ५७५ रुपये होते व एक कुटुंब महिन्यातून तीन वेळा तरी झोमॅटोचा वापर करते. पुढील पाच वर्षात महागाईमुळे बिल एक हजार रुपये व ग्राहक किमान दुप्पट होतील व ते महिन्यातून चार वेळा झोमॅटोने मागवतील असे गृहीत धरले तर ही विक्री ६० हजार कोटी रुपये होते. तेव्हा पुढील ५-६ वर्षात कंपनी नफा पण नोंदवू शकेल. पण त्याकडे लक्ष द्यायचे कारण नाही. या क्षेत्रातील अध्वर्यू अमेझॉनलाही नफा नोंदवायला दहा वर्षे लागली होती. त्याशिवाय एकदा पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर या मनुष्यबळाचा उपयोग अनेक मार्गाने झोमॅटोला करता येईल (अंदाजे २ लाख डिलिव्हरीकर्ते पटावर आहेत). भविष्यात कल्पनातीत संधी उपलब्ध होतील व त्यावर बाजार मूल्यांकन ठरेल.

अमेरिकेत ग्रबहब, डोअरडॅश वगैरे याच व्यवसायात असलेल्या कंपन्या विक्रीच्या १७ -१८ पट मूल्यांकनाला मिळतात. त्या हिशोबाने आज १२ हजार कोटी विक्रीचे ९० रुपयांनी बाजार भांडवलमूल्य फक्त सहापट आहे. थोडी थांबायची तयारी ठेऊन, सूचीबद्ध झाल्यावर विकत घेतल्यास पाच वर्षात मोठा भाव मिळू शकतो. त्यासाठी शुभेच्छा. फिन टेक व ई कॉमर्स क्षेत्रातील पेटीएम वगैरे नवीन शेअर्सही येत आहेत. फक्त ग्रे मार्केटचे भाव बघण्यापेक्षा, वरील चष्म्यातून त्या गुंतवणुकीकडे बघणे सोपे व सोयीचे जाईल.

(लेखक शेअर बाजाराचे विश्‍लेषक असून गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image