का रे भुललासी...?

बहुतांश गुंतवणूकदार तोटा सहन करायची तयारी नसल्यामुळे ‘पदरी पडलं पवित्र झालं’ म्हणत प्राथमिक समभाग विक्रीत मिळालेले शेअर आयुष्यभर उराशी बाळगतात.
Paytm
PaytmSakal
Summary

बहुतांश गुंतवणूकदार तोटा सहन करायची तयारी नसल्यामुळे ‘पदरी पडलं पवित्र झालं’ म्हणत प्राथमिक समभाग विक्रीत मिळालेले शेअर आयुष्यभर उराशी बाळगतात.

बहुतांश गुंतवणूकदार तोटा सहन करायची तयारी नसल्यामुळे ‘पदरी पडलं पवित्र झालं’ म्हणत प्राथमिक समभाग विक्रीत मिळालेले शेअर आयुष्यभर उराशी बाळगतात. ‘पेटीएम’च्या शेअरने तर इतिहास घडवला. केवळ कंपनीच्या नावाला भुलून शेअर घेण्याची चूक महागात पडू शकते.

‘पेटीएम’चे शेअर लागले बुवा!’’ अत्यंत हुरळून गेलेले वसंतराव सांगत होते...

‘अरे व्वा, हो का?’’ मी आवाजात शक्य तितका आनंद दर्शवायचा प्रयत्न केला.

‘अहो मलाच काय, बायकोलापण मिळाले...’

आता मी आवंढा गिळला. मला खरंतर ‘अरेरे...’ म्हणायचं होतं.

‘पण, अर्ज करायच्या आधी तुम्ही कंपनीबाबतचं ‘सेबी’ प्रमाणित रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स वाचलं होतं का?’

‘आँ... ते काय असतं?’

सहसा कुठलाच गुंतवणूकदार ते वाचत नाही, हे जरी मला माहिती असलं तरी खात्री करून घेतली. (कारण ते लांबलचक असतं व क्लिष्ट वाटतं).

‘बरं, ते जाऊ द्या, किमान इश्यू मॅनेजरची ‘आयपीओ नोट’ तरी वाचली होती का?’

‘नाही. ती कुठं मिळते?’

‘मग काय पाहिलं तुम्ही?’

‘अहो, काय सांगू ! गुगल केलं. बऱ्याच तज्ज्ञांनी गुंतवणूक करायला हरकत नाही, कदाचित थोडं थांबावं लागेल, असं मत व्यक्त केलं होतं.’

‘आणखी?’

‘ग्रे मार्केट प्रीमियम रोजच बघायचो.’

प्राथमिक समभाग विक्री होण्याआधी, बाजारात नोंदणी होणाऱ्या शेअरचा भाव काय असेल याचा मोठा सट्टा होतो, तो भाव अनेकदा वृत्तपत्रांत येतो, त्याला ‘ग्रे मार्केट प्रीमियम’ म्हणतात आणि कधीमधी नशिबाने पैसे मिळालेल्या नवगुंतवणूकदारांत हा एकमेव निकष अत्यंत लोकप्रिय आहे.

‘काय भाव होता ‘ग्रे मार्केट’मध्ये?’

‘२५० रुपये वर होता,’ त्यांनी उत्साहाने सांगितलं. शेअरचा भाव २१६०, त्यावर २५० रुपये म्हणजे दहा टक्के नफा झाला.

‘आज काय भाव आहे?’

‘काही माहीत नाही, भाव येत नाही आजकाल..’

या बाबतीत अगदीच अनभिज्ञ असल्यामुळे ग्रे मार्केटचा भाव कधीच संपला आहे, हे त्यांच्या गावीही नव्हतं.

‘बरं एक सांगा, ही कंपनी नफ्यात तरी आहे ना?’

‘काही माहीत नाही बुवा!’

शेवटी त्यांना शहाणं करणं भाग होतं. म्हटलं, ‘कंपनीने आजतागायत काहीही नफा नोंदवलेला नाही. सुरुवातीपासून तोट्यातच आहे. बिझनेस मॉडेलही फारसं आकर्षक नाही. भरपूर स्पर्धा आहे. उद्या हा शेअर बाजारात नोंदल्यानंतर लगेच विकून टाका.’

माझं म्हणणं त्यांना काही फारसं पटलं नव्हतं. अनिच्छेनेच ते परतले.

दुसऱ्या दिवशी मान हलवतच पुन्हा आले.

‘का हो, विकले का?’

‘नाही हो, तोट्यात कसे विकणार? भाव उघडलाच १९५०-५५ ला. दिवसभर बसून होतो. शेवटी बंद झाला १५५० जवळ.’

पुढे वसंतरावांनी पेटीएम विकले की नाही माहीत नाही; पण नवे शेअर विकत घेणं मात्र सोडलं. बहुतांश गुंतवणूकदार तोटा सहन करायची तयारी नसल्यामुळे ‘पदरी पडलं पवित्र झालं’ म्हणत प्राथमिक समभाग विक्रीत मिळालेले शेअर आयुष्यभर उराशी बाळगतात. आजही ‘रिलायन्स पॉवर’ डी-मॅट खात्यात असलेले कित्येक गुंतवणूकदार असतील. ‘पेटीएम’च्या शेअरने तर इतिहास घडवला. २१६० रुपयांना देऊ केलेला व १९५५ रुपयांना नोंदला गेलेला हा शेअर आता ७५ टक्के खाली आला आहे. रोजच नवा तळ गाठत गेल्यामुळे आताचा भाव (रु. ४६५) आणखी किती खाली जाईल, हे अजूनही सांगता येणार नाही. दुःखात सुख एवढंच, की नुकताच मॉर्गन स्टॅन्ले आणि बँक ऑफ अमेरिका इक्विटी पार्टनर्स या संस्थांनी खालच्या भावात खरेदी केली आहे. २०१८ मध्ये खासगी व्यवहारात ७० हजार कोटी रुपयांचं भांडवल मूल्य मिरवीत असलेल्या या शेअरचं आजचं भांडवल मूल्य २८ हजार कोटी रुपये आहे. ब्लॅकरॉक, सीपीपीआयबी, जीआयसी आदी संस्थांनी रांगा लावत अँकर इन्व्हेस्टर म्हणून घेतलेला हिस्सा हेच दर्शवतो, की मोठ्या संस्थादेखील तुमच्या-आमच्यासारख्या चुका करू शकतात.

२०२०-२१ मध्ये सर्वच शेअर बाजार मोठ्या तेजीत होते. प्राथमिक समभाग विक्रीतून त्या वर्षी तब्बल एक लाख वीस हजार कोटी रुपयांवर पैसे जमा झाले. त्या वर्षी आलेल्या ‘आयपीओ’तील सरासरी ७४ टक्के शेअर्सनी गुंतवणूकदारांना कमी-अधिक नफा मिळवून दिला; पण ऑक्टोबर २०२१ मध्ये बाजाराने ऐतिहासिक उच्चांक केला आणि या नशिबाला दृष्ट लागली. अगदी ‘एलआयसी’सारख्या जनसामान्यांत रुजलेल्या शेअरनेदेखील गुंतवणूकदारांची निराशाच केली. ‘जे जे नवं ते मला हवं’ करीत ‘झोमॅटो’पासून ‘नझारा’ ते ‘नायका’पर्यंत प्रत्येकच ‘आयपीओ’चा पाठलाग गुंतवणूकदारांकडून होत होता. अशा अनेक वाजतगाजत झालेल्या समभाग विक्रीचं पुढे पतन झाल्यामुळे यानिमित्ताने नव्या समभाग विक्रीत सहभागी होण्याचं धोरण व्यवस्थित आखण्याची वेळ आली आहे. त्यातही बाजारात नोंदणी झाल्यावर जो वर जातो तो आपल्याला मिळत नाही आणि नेमका जो लागतो, त्यात पदरी काही पडत नाही.

केवळ कंपनीच्या नावाला भुलून शेअर घेण्याची चूक महागात पडू शकते. फक्त नशिबावर हवाला ठेवण्यापेक्षा ‘गरजेल तो पडेल काय’ असं न विचारता, तो पडेलच असं गृहीत धरून चोखंदळपणे घेतलेला निर्णय समाधान देऊन जाईल. बघा पटतंय का?

अशा वेळी काय करावं?

काही मार्गदर्शक तत्त्वं पुढीलप्रमाणे

समभागधारकाच्या खिशात पैसे जावेत अशा उदात्त हेतूने ‘आयपीओ’ येत नाहीत. त्या-त्या वेळच्या तेजीचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांना किती ताणता येईल हेच पाहिलं जातं. यात सरकारी, खासगी असा आपपरभाव नाही.

‘आयपीओ नोट’ तरी किमान वाचली पाहिजे. किमान कंपनी नफ्यात आहे का, नसल्यास कधी येणार ते बघायला हवं.

शेअर बाजाराची धारणा सतत बदलत असते. दोन वर्षांपूर्वी युनिकॉर्न, स्टार्ट-अप आणि नवयुगाच्या मोहजालामुळे कंपनीचा ग्राहकवर्ग किती आहे, किंमत/विक्री हे गुणोत्तर कसं आहे (पी/ई बघण्यापेक्षा) आदी बघून पुढील ५-६ वर्षांत जरी नफा उद्दिष्ट साध्य झालं तरी बाजाराला चालत असे. (ॲमेझॉनच्या धर्तीवर). आता परदेशी बाजारांची पडझड झाल्यानंतर आजकाल तसं चालत नाही, नफा वाढता असलेली कंपनीच भाव खाऊन जाते. तेव्हा आपणही वारा वाहील तशी पाठ फिरवायला हवी.

विक्री ‘ऑफर फॉर सेल’ आहे, की कंपनी नवं भांडवल जमा करीत आहे, हे बघायला हवं. थोडक्यात, उभे केलेले पैसे कोणाच्या खिशात जाणार आहेत हे कळलं, तर योग्य निर्णय घेता येईल.

नव्या शेअरला अर्ज करून तो बाजारात नोंदला गेल्यावर लगेच विकून टाकणं, असं एक धोरण असू शकतं; पण ते निर्दयीपणे अमलात आणायला हवं. नफा होतोय की तोटा, हे न बघता आपलं भांडवल राखणं सर्वांत महत्त्वाचं.

आपल्यासारख्याच चुका करीत असले, तरी ‘अँकर इन्व्हेस्टर’ कोण आहेत, हे बघणं उद्‍बोधक ठरेल. थोडा संयम असेल व धोरण दीर्घकालीन असेल, तर अँजेल किंवा अँकर इन्व्हेस्टर गुंतवणुकीतून बाहेर पडल्यानंतरच आपण आत शिरावं.

‘आयपीओ’ असो की बाजारातून घेतलेले शेअर असोत, वेळोवेळी नफा खिशात टाकणं उत्तम.

नव्या समभाग विक्रीत मिळालेले तुटपुंजे शेअर बाळगून पोर्टफोलिओ फक्त मारुतीच्या शेपटीसारखा लांबत जातो. वेळोवेळी तो कमी करायला हवा, किंवा आपली निवड योग्य असेल तर त्यात भर टाकायला हवी व निर्णय चुकला असेल तर तो फिरवायलाच हवा.

(लेखक भांडवली बाजाराचे विश्लेषक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com