

New Marathi Books Review
esakal
डॉ. सुरेश सावंत - saptarang@esakal.com
बिब्लीओबिबुलीचा सापळा’ हा सुरेश वंदिले यांचा नवा, कोरा बालकथासंग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. वाचनसंस्कृती ह्या विषयावरच्या वीस कथांचा समावेश ह्या संग्रहात आहे. नाटकात जसा एक निवेदक किंवा सूत्रधार असतो, तशी ह्या प्रत्येक कथेच्या सुरुवातीला ‘आजी’ हे पात्र निवेदन करते. आजीबाईने ह्या सगळ्या कथा एका सूत्रात गुंफल्या आहेत. एका छोट्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास शेवटी संपूर्ण पुस्तकविश्वालाच आपल्या कवेत घेतो.
कथांमध्ये आजीसह त्यांचा मुलगा आणि सून, नात तेजोमयी आणि अलेक्झांडर कुत्रा अशी चार पात्रे आहेत.
‘चौदा पुस्तके’ ह्या पहिल्याच कथेत साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या कुटुंबात अवतरतात. ते म्हणतात, ‘‘उद्या १४ एप्रिल, म्हणजे माझा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तुम्ही १४ पुस्तके खरेदी करा.’’ मग पुढे बाबासाहेब सगळ्यांना पुस्तकांचे महत्त्व समजावून सांगतात. तेजोमयीला पुस्तक वाचायला अजिबात आवडत नसे. तिला पुस्तकाची गोडी लावण्यासाठी पहिल्या कथेत बाबासाहेब येतात, तर दुसऱ्या कथेत परिराणी येते. सुरुवातीला अजिबात पुस्तक न वाचणारी तेजोमयी पुढे पुढे पुस्तकांचा फडशा पाडू लागली. तिला रोज नवं पुस्तक लागायचं. आता हिला रोज नवीन पुस्तक कुठून आणून द्यायचे, असा प्रश्न बाबांना पडला. शोध घेतल्यावर एका ‘जादूई गल्ली’चा शोध लागला. जिथे जुन्या पुस्तकांचा बाजार भरतो, ती ही जादूई गल्ली. बाबांसह तिथे जाऊन तिने २२-२३ पुस्तके खरेदी केली.