स्वप्नांची अंतराळ भरारी

अंतराळ पर्यटन हे आता केवळ विज्ञान कल्पित चित्रपटांमधील कहाणी राहिले नसून, हा एक वास्तविक उद्योग बनला आहे, जो वेगाने वाढतोय.
blue origin launch space tourist Gopi Thotakura space tourist
blue origin launch space tourist Gopi Thotakura space touristSakal

- डॉ. विनिता नवलकर

भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक गोपी थोटाकुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. अंतराळ पर्यटनामुळे मानवी संशोधन आणि साहसाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. संशोधनाच्या या नव्या युगामुळे स्वप्नांचा वास्तवाशी सांगड घालणारा अंतराळ प्रवास दृष्टिक्षेपात आला आहे. संशोधनाचे हे नवीन युग आपल्याला हेच सांगतेय, आकाशाला आता मर्यादा राहिलेली नाही.

तुम्ही कधी अंतराळात फिरण्याचे, शून्य गुरुत्वाकर्षणात तरंगण्याचे स्वप्न पाहिले आहे का? या एकविसाव्या शतकात, अंतराळात प्रवास करण्याचे तुमचे स्वप्न पूर्वीपेक्षा अधिक सत्यात उतरण्याची शक्यता जास्त आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलेत!

अंतराळ पर्यटन हे आता केवळ विज्ञान कल्पित चित्रपटांमधील कहाणी राहिले नसून, हा एक वास्तविक उद्योग बनला आहे, जो वेगाने वाढतोय. हे नवीन क्षेत्र सामान्यांना पृथ्वीच्या पलीकडे प्रवास करण्याचा अविश्वसनीय आनंद आणि रोमांचक साहसाचा अनुभव देते.

अंतराळ पर्यटनाची कल्पना तशी नवीन नाही. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही कल्पना २०००च्या दशकात सत्यात उतरली. पहिला अंतराळ पर्यटक डेनिस टिटो, एक अमेरिकन अभियंते आणि व्यापारी होते.

२००१ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जवळजवळ आठ दिवस राहण्यासाठी त्यांनी दोन कोटी डॉलर्स दिले. मात्र, त्यांच्या अंतराळ प्रवासामुळे नवी क्षितिजे निर्माण झाली. टिटो यांनी दाखवून दिले, की अंतराळ प्रवास केवळ अंतराळवीरांपुरताच मर्यादित राहिलेला नाही.

विमानांचे उड्डाण बेर्नोलीच्या तत्त्वांवर आधारित असते. विमानाच्या पंखावरच्या हवेचा दाब खाली असलेल्या हवेच्या दाबापेक्षा कमी असला की विमाने हवेत वर उचलली जातात; पण जर हवेचा दाब मुळातच कमी असेल तर पंखांवरच्या आणि खालच्या हवेच्या दाबामध्ये खूप फरक नसतो आणि विमाने एअरलिफ्ट होऊ शकत नाहीत.

पृथ्वीपासून साधारण ८३.१ किलोमीटरवर हवेची घनता खूप कमी होते. त्यामुळे या उंचीवर विमाने उडू शकत नाहीत. ही मर्यादा थियोडोर कार्मन या हंगेरियन-अमेरिकन इंजिनिअरने शोधून काढली. म्हणूनच पृथ्वीच्या वातावरणाला बाह्य अंतराळापासून वेगळे करणाऱ्या सीमारेषेला कार्मन रेषा, असे नाव दिले गेले आहे. कार्मन रेषा ओलांडल्यानंतर, अंतराळ प्रवास सुरू होतो...

अंतराळ पर्यटन तीन मुख्य प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते. उपकक्षीय, कक्षीय आणि चंद्र किंवा आंतरग्रहीय. सध्या उपकक्षीय (सबऑर्बिटल) प्रवास हा अंतराळ पर्यटनाचा सर्वात सोपा प्रकार आहे. सबऑर्बिटल उड्डाणे प्रवाशांना पृथ्वीपासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवर घेऊन जातात. येथे त्यांना काही मिनिटांसाठी शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेता येतो.

या अंतरावरून पृथ्वीची वक्रता अनुभवता येते. दुसऱ्या प्रकारचे अंतराळ पर्यटन म्हणजे कक्षीय पर्यटन. यात पृथ्वीभोवती साधारण ४०० किलोमीटरवर स्थिर कक्षेत प्रवास करणे समाविष्ट आहे. हा प्रवास उपकक्षीय उड्डाणांपेक्षा अधिक जटिल आणि महाग आहे. कक्षीय उड्डाणांमध्ये, वजनहिनतेचा दीर्घ अनुभव घेता येतो. तसेच पृथ्वी प्रदक्षिणेचा आनंद अधिक काळासाठी मिळतो.

चंद्र आणि आंतरग्रहीय पर्यटन हा अंतराळ पर्यटनाचा सर्वात नवीन आणि महत्त्वाकांक्षी प्रकार आहे. ज्याचा उद्देश पर्यटकांना चंद्रावर आणि त्यापलीकडे नेणे हा आहे. ‘स्पेसएक्स’च्या स्टारशिपची रचना या कठीण अंतराळ मोहिमांसाठी करण्यात आली आहे, ज्यात चंद्र आणि संभाव्य मंगळावरील सहलींचा समावेश असेल.

अजून अशा मोहिमांची सुरुवात झालेली नसली तरी आतापासूनच युसाकू मेझावा नावाच्या एका जपानी अब्जाधीशाने आधीच पुढील काही वर्षांसाठी नियोजित स्टारशिपवर चंद्राच्या भोवती एक फेरी बुक केली आहे.

आज अनेक कंपन्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आणि तंत्रज्ञान वापरून अंतराळ पर्यटन प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. ॲमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी स्थापन केलेली ब्लू ओरिजिन कंपनी उपकक्षीय उड्डाणांवर लक्ष केंद्रित करते.

त्यांच्या न्यू शेपर्ड रॉकेटने अनेक उड्डाणे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वजनहिनतेचा आणि पृथ्वीच्या सुंदर दृश्यांचा एक छोटासा; परंतु रोमांचक अनुभव मिळाला आहे. त्या व्यतिरिक्त सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी स्थापन केलेली ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ ही कंपनीसुद्धा अनेकांना उपकक्षीय अंतराळ प्रवास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे.

बहुचर्चित एलॉन मस्क यांनी स्थापन केलेली ‘स्पेसएक्स’ ही अंतराळ पर्यटनातील सर्वात महत्त्वाकांक्षी कंपनी आहे. ‘स्पेसएक्स’ने यापूर्वी ‘आयएसएस’वर क्रू मोहिमा यशस्वी पूर्ण केल्या आहेत. तसेच ‘ऑल-सिव्हिलियन इन्स्पिरेशन ४’सारख्या मोहिमासुद्धा पार पाडल्या आहेत.

‘इन्स्पिरेशन ४’ सामान्यांना घेऊन पृथ्वीभोवती फिरणारे पहिले कक्षीय मिशन होते. आता खोल अंतराळ प्रवासासाठी ‘स्पेसएक्स’ कक्षीय मोहिमा आणि स्टारशिप वाहनावर काम करत आहे. अंतराळ पर्यटन उद्योगातील एक नवीन कंपनी,

एक्सिओम स्पेस पहिले व्यावसायिक अंतराळ स्थानक तयार करण्याची योजना आखत आहे. सुरुवातीला ‘आयएसएसला’च नवीन मॉड्यूल जोडून हे अंतराळ स्थानक सुरू करण्यात येईल. नंतर हे एक स्वतंत्र व्यावसायिक स्थानक बनेल, असा या कंपनीचा प्रस्ताव आहे.

युरी गागारीन यांच्यापासून सुरू झालेल्या मानवाच्या अंतराळ मोहिमा जवळजवळ ५० वर्षे फक्त खगोल अभ्यासापर्यंत मर्यादित होत्या. मात्र, पर्यटनाच्या वाढत्या उद्योगामुळे दरवर्षी होणारी उड्डाणेही वाढत चालली आहेत. त्याचा धोका काही प्रमाणात पर्यावरणाला नक्कीच होतो.

अंतराळ यान आणि रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते अन् ते मोठ्या प्रमाणात वायू व ध्वनिप्रदूषण निर्माण करू शकते. हे उत्सर्जन हवामान बदलास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे भविष्यात वर्षभरात अंतराळ पर्यटनासाठी आणि खगोल संशोधनासाठी किती उड्डाणे करावीत, याबाबत काही नियम करणे आवश्यक आहे.

त्या व्यतिरिक्त अंतराळ प्रवासातील वाढीमुळे अंतराळात स्पेस डेब्रिसची चिंता आणखी वाढू लागली आहे. स्पेस डेब्रिसमुळे अंतराळ यान आणि उपग्रह या दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि तो कमी करण्याचे काम प्राधान्याने हाती घेणे गरजेचे आहे.

पर्यावरणावर होणारे प्रभाव कमी करण्यासाठी काही कंपन्या अधिक पर्यावरणपूरक इंधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यातूनच स्पेस हॉटेल्सची संकल्पना समोर आली. ऑर्बिटल असेंब्ली कॉर्पोरेशन आणि ‘एक्सिओम स्पेस’सारख्या कंपन्या, लक्झरी हॉटेल्स म्हणून काम करू शकतील, अशी अंतराळ स्थानके विकसित करीत आहेत. त्यामुळे दीर्घ काळ अंतराळात वास्तव्य करणे शक्य होईल आणि काही प्रमाणात रॉकेटची सततची उड्डाणे मर्यादित करता येतील.

तंत्रज्ञान क्षेत्राच्या वेगवान विकासामुळे अंतराळ पर्यटनाचे भवितव्य आशादायक असले तरी अंतराळ प्रवास स्वाभाविकपणे धोकादायक आहे. त्यामुळे नियम आणि अंतराळ पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफ.ए.ए.)सारख्या संस्था खासगी कंपन्यांसोबत नियम प्रणाली विकसित करत आहेत. त्या प्रणालीनुसार पर्यटकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. कक्षीय अंतराळ प्रवासात शारीरिक फिटनेस आवश्यक असतो आणि प्रवाशांना त्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल. तसेच संभाव्य मानसिक आव्हानांसाठी सज्ज होण्यासाठी प्रवाशांना कठोर प्रशिक्षण देणे आवश्यक असेल. उपकक्षीय प्रवासासाठी या प्रशिक्षणाची गरज नाही.

अंतराळ याने अनेक सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज असणे गरजेचे आहे. ज्यात आपत्कालीन परिस्थितीत रॉकेटपासून कॅप्सूल त्वरित वेगळे करू शकणारी पलायन प्रणाली कार्यरत असणे आवश्यक आहे. पुन्हा प्रवेश करताना अत्यंत उच्च तापमानापासून संरक्षण करण्यासाठी उष्णता कवच आणि पृथ्वीवर सुरक्षित लॅण्डिंग सुनिश्चित करण्यासाठी पॅराशूट यांचा समावेश असणे बंधनकारक आहे.

या क्षेत्रात सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक म्हणजे खर्च! नजीकच्या काळात अंतराळ प्रवासाचे सौभाग्य काही अब्जाधीश व्यक्तींसाठीच मर्यादित असणार यात काही दुमत नाही; पण ‘फाल्कन ९’ आणि ‘स्टारशिप’सारखी परत वापरता येणारी रॉकेट्स जर मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली तर नक्कीच कालांतराने हे क्षेत्र सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल!

तसेच सध्या चालू असलेले आयॉन इंजिनचे संशोधन यशस्वी झाल्यास अंतराळ पर्यटनाला नक्कीच भरारी येईल. डेनिस टिटो यांच्या प्रवासाने भविष्यातील अंतराळ प्रवाशांसाठी एक मंच तयार केला गेला. त्यांच्या अनुभवाने दाखवून दिले, की अंतराळ पर्यटन शक्य आहे आणि अनेकांना अंतराळाला भेट देण्याचे स्वप्न पाहण्यास त्यांनी प्रेरित केले.

याच महिन्यात ‘ब्लू ओरिजिन’च्या एन. एस.-२५ मोहिमेच्या चमूमध्ये सहभागी होऊन गोपी थोटाकुरा हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले. त्या आधी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या पहिल्या फेरीत कंपनीचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासोबत भारतीय वंशाची, ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीचीच एरोनॉटिकल इंजिनिअर व अंतराळवीर शिरीशा बंडाला अंतराळात जाऊन आली होती.

अंतराळ पर्यटनामुळे मानवी संशोधन आणि साहसाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. मानवाच्या छोट्या सबऑर्बिटल ट्रिपपासून ते मंगळाच्या संभाव्य मोहिमांपर्यंत फिरण्याची शक्यता वेगाने विस्तारत आहेत. संशोधनाचे हे नवीन युग आपल्याला हेच सांगतेय, आकाशाला आता मर्यादा राहिलेली नाही. एका खूप मोठ्या साहसाची सुरुवात आहे!

vinita.navalkar@gmail.com (लेखिका प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com