बदलाची व अवकाश-विस्ताराची पहिली पायरी

मूळ पुस्तक वाचलं असल्याने, त्यांच्याशी पुस्तकाविषयी तपशिलात बोलू शकलो.
book
book sakal

जनमानसात एखाद्याची चांगली प्रतिमा असणं ही गोष्ट वेगळी आणि प्रतिमेच्या एका साच्यात अडकून जाणं ही गोष्ट वेगळी. जसं की, पु. ल. देशपांडे म्हटलं की हुकमी ‘हशा’ घेणारं प्रगल्भ विनोदी लेखन; दिलीपकुमार किंवा मीनाकुमारी म्हटलं की, शोकांतिक भूमिकांचे महामेरू; मन्ना डे म्हटलं की, शास्त्रीय संगीतावर आधारित गीतं गाणारे पट्टीचे पार्श्वगायक... प्रतिमेत बंदिस्त झालेल्यांची अशी अनेकानेक उदाहरणं देता येतील.

वास्तविक, अशा प्रतिमेत बंदिस्त झालेल्यांपैकी अनेकांनी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रांतली इतर क्षितिजंही धुंडाळलेली असतात आणि त्यात उल्लेखनीय कामगिरीही केलेली असते. एक गोष्ट खरी की, अशी प्रतिमा बनून जाणं हे सुरुवातीच्या काळात आपापल्या क्षेत्रात स्थिर होण्याच्या दृष्टीने, स्वतःचं एक स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरतं आणि तसं होणं तेव्हा गरजेचंही असतं. मात्र,

सुरुवातीच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल ठरणारी ही गोष्ट, पुढे जाऊन प्रतिकूल ठरू शकते. विशेषतः ज्याला केवळ याच प्रतिमेत अडकून राहायचं नसतं, आपल्या क्षेत्रातील इतर वाटाही चोखाळायच्या असतात आणि त्यात आपला ठसा उमटवायचा असतो; अशांना निर्माण झालेली प्रतिमा अडसर ठरू शकते. मात्र, त्यासाठी पुढची दिशा ठरवून सातत्याने नव्या वाटेवरचा प्रवास केल्यास, आधी निर्माण झालेल्या प्रतिमेचा अडसर दूर होऊ शकतो.

स्थापनेपासून काही वर्षांतच रोहन प्रकाशनाला नावलौकिक प्राप्त झाला होता. काळाची पावलं ओळखून त्या त्या विषयात अभिनवता आणि कल्पकता दाखवल्यामुळे, तसंच निर्मितीचे वेगळे मानदंड निर्माण केल्यामुळे ‘रोहन’चा वेगळा वाचकवर्ग निर्माण झाला व ही प्रकाशन संस्था लवकरच नावारूपाला आली.

मात्र, प्रतिमा निर्माण झाली ती उपयुक्त व माहितीपर पुस्तकांचे प्रकाशक म्हणून. तसं म्हटलं तर, असं होणं साहजिक होतं, कारण आमचा भर होता तो अशाच पुस्तकांवर; पण त्याचबरोबर आम्ही काही साहित्यिक पुस्तकंही प्रकाशित करत होतो आणि ती यशस्वीही होत होती. अशा पुस्तकांची उदाहरणं द्यायची तर, ‘न्या. महादेव गोविंद रानडे : व्यक्ती - कार्य - कर्तृत्व’ (डॉ. त्र्यं. कृ. टोपे), ‘बलुतं : एक वादळ’ (दया पवार), ‘अशी मी जयश्री’ (जयश्री गडकर), ‘संवाद’ (विद्या बाळ), ‘अशी असतात एकेक माणसं’ (बाळ सामंत/रमेश मंत्री), ‘गाजलेले अग्रलेख’ व ‘चिरंतनाचे प्रवासी’ (माधव गडकरी), ‘कानोकानी’ (अशोक जैन) अशा काही पुस्तकांचा उल्लेख करता येईल.

परंतु अशा गोष्टी एका रात्रीत घडत नाहीत, त्यासाठी सातत्य ठेवून एका दिशेने दीर्घकाळ काम करावं लागतं. ही दिशा घेण्याची पहिली पायरी म्हणजे आमचं ‘लालबहादूर शास्त्री : राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम’ हे पुस्तक ठरावं. हे पुस्तक घडण्यामागची गोष्ट सांगण्यासारखी आहे....

‘पाहुणचार’ची निर्मिती अखेरच्या टप्प्यात असताना, अशोक जैन यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये डॉ. सी. पी. श्रीवास्तवलिखित लालबहादूर शास्त्री यांच्या इंग्रजी चरित्राचं केलेलं परीक्षण वाचनात आलं. तोपर्यंत माझे अशोक जैन यांच्याशी छान सूर जमले होते. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे मी शास्त्रीजींच्या चरित्राचा विषय काढला. त्यांच्याकडून पुस्तक मागवून वाचून घेतलं. पुस्तकाची अतिविस्तृतता सोडली, तर पुस्तक अप्रतिम होतं. शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्य-कर्तृत्वाचे अनेक कंगोरे पुस्तकात उलगडले होते

त्यांच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं. मुख्य म्हणजे, लेखकाने शास्त्रीजींसोबत अनेक वर्षं काम केलं असल्याने पुस्तकाची विश्वासार्हता निर्विवाद होती. याच निकषांवर आणि शास्त्रीजींप्रती मला असलेल्या आदरापोटी या पुस्तकाचा अनुवाद प्रसिद्ध करण्याचा मी ध्यासच घेतला.

आता समोर दोन प्रश्नचिन्हं होती. एक तर पुस्तकाचे मराठी आवृत्तीसाठीचे हक्क मिळवणं आणि दुसरं म्हणजे, मराठी वाचकांचा विचार करता पुस्तक संक्षिप्त (abridge) करण्यासाठी मान्यता मिळवणं. दोन्ही कारणांसाठी मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (OUP) यांनी लेखकाशी संपर्क साधण्यास सांगितलं. लेखकाचं वास्तव्य जास्त करून इटलीत असल्याने मोठ्या जिकिरीने मी श्रीवास्तव यांची भेट मिळवली. त्यांच्याकडे शास्त्रीजींविषयीच्या माझ्या भावना व्यक्त केल्या.

मूळ पुस्तक वाचलं असल्याने, त्यांच्याशी पुस्तकाविषयी तपशिलात बोलू शकलो. अशोक जैनसारखी मातब्बर व्यक्ती अनुवाद करेल वगैरे सांगितलं. माझ्या बोलण्याने ते प्रभावित वाटले; परंतु OUP ला शिफारस करण्याइतपत नव्हे, असं मला जेव्हा जाणवलं, तेव्हा मी सोबत नेलेलं ‘पाहुणचार’ हे ‘अस्त्र’ काढलं. पुस्तकाचा विषय काही त्यांच्या आस्थेचा असण्याची शक्यता नव्हती; परंतु निर्मिती दर्जा बरंच काही सांगणारा होता. श्रीवास्तव जवळजवळ दहा मिनिटं बारकाईने पुस्तक पाहत राहिले व म्हणाले,

‘If you can produce this quality and looking at your passion to publish a book on Shastrijee, I will have no hesitation in recommending OUP to grant you the rights.’ नंतर चक्रं वेगाने फिरली. OUP कडून हक्क मिळाले. अशोकने अनुवादाला उत्साहाने सुरुवात केली. टप्प्याटप्प्याला मी व अशोक भेटून तोवर झालेल्या अनुवादाचं मोठ्याने वाचन करत असू... वेळ, काळ, स्थळ यांपैकी कशाचं भान नसे तेव्हा. ‘मंतरलेले दिवस’ म्हटलं तरी चालेल असे ते दिवस.

अनुवादाचं संस्करण पुरुषोत्तम धाक्रस या जाणकार संपादकाने केलं. पुस्तकाचं शीर्षक आम्ही ठरवलं ‘लालबहादूर शास्त्री.’ धाक्रसांनी त्याला उपशीर्षक सुचवलं ‘राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम.’ कमल शेडगे यांनी माझ्या सूचनांवर सकारात्मक विचार करून पुस्तकाचं उत्तम मुखपृष्ठ साकारलं. एकंदर सर्व मनासारखं पार पडलं आणि पुस्तक उत्तम निर्मितीत तयार झालं.

पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे त्यावेळचे राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते मुंबईच्या राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये होणार होतं. दिवस होता ६ फेब्रुवारी १९९७. व्यासपीठावर जयंतराव टिळक, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी अशा प्रभृती होत्या. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रांतील प्रतिष्ठितांनी, त्याचप्रमाणे साहित्य व पत्रकारिता वर्तुळातील व्यक्तींनी आवर्जून हजेरी लावली होती. मी पुस्तकाला पूर्वप्रसिद्धी मिळेल यादृष्टीने भरपूर काम केलं होतं.

आता या कार्यक्रमालाही आणि एकंदर पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली... माझी पावलं योग्य रीतीने पडली होती. ‘हे पुस्तक प्रसिद्ध करू नये आणि केल्यास फार काही अपेक्षा करू नये’ असे सल्ले माझ्या सर्व ‘हितचिंतकांनी’ दिले होते. त्यांत आप्तेष्ट, मित्र, समव्यवसायी सर्वजण आले. मात्र, पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळणार याची मला खात्री होती.

तसा तो मिळालाच; पण पुस्तक हिरिरीने आणि मोठ्या ‘कॅनव्हास’वर प्रकाशित करण्यामागे ‘विक्रीचे आकडे’ हा विचार नव्हताच... शास्त्रीजींविषयीचा आदर ही पुस्तक प्रकाशनामागची प्रेरणा होती आणि प्रकाशनामागे ‘प्रतिमा-बदल’ तसंच ‘अवकाश-विस्तार’ हे विचार होते... याच विचाराने ‘कस्तुरबा : शलाका तेजाची’, ‘यांनी घडवलं सहस्रक’, ‘वॉर्ड नंबर पाच, केईएम’ अशा काही पुस्तकांच्या प्रकाशनांनी झालेलं पुढचं मार्गक्रमण पुढील लेखात....

म्हटलं असतं तर, मी आहे त्या ‘व्यवस्थेत’ सुखेनैव राहू शकलो असतो. चांगलं अर्थार्जन होऊ शकणारी उपयुक्ततावादी, माहितीपर पुस्तकं आणि जोडीला आपल्याला समाधान देणारी काही साहित्यिक पुस्तकं... असं करत राहणं मला जास्त सोयीचं होतं. परंतु, मला प्रतिमेत जखडून राहायचं नव्हतं, वेगवेगळे विषय हाताळायचे होते, रोहन प्रकाशनाचा अवकाश-विस्तार करण्याची आस होती, माझ्यातील सर्जनशील ऊर्मींना अधिक वाव द्यायचा होता.

(लेखक रोहन प्रकाशनचे संचालक आणि ‘रोहन साहित्य मैफल’ या मासिकाचे संपादक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com