वैज्ञानिक बनण्याची गोष्ट

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

अनादी काळापासून माणसाला आपलं हे विश्व कसं आहे, त्याची जडणघडण कशी झाली आहे, त्याचे घटक कोणते आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत, ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत यांसारख्या प्रश्नांनी सतावून सोडलं आहे. त्यांची संभाव्य उत्तरं शोधण्याची त्याची धडपड अव्याहत चालू आहे. त्याविषयीच्या चिंतनातूनच मग पंचमहाभूतांची संकल्पना उदयाला आली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे या विश्वाचे पायाभूत घटक असल्याचं जवळजवळ सगळ्याच प्राचीन संस्कृतींनी मान्य केलं होतं. कोणी त्यातले चारच घटक प्रमाणभूत मानले होते, कोणी तीन, कोणी पाच; तरीही त्या सर्वांमध्ये बऱ्याच अंशी समानता होती.

अनादी काळापासून माणसाला आपलं हे विश्व कसं आहे, त्याची जडणघडण कशी झाली आहे, त्याचे घटक कोणते आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत, ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत यांसारख्या प्रश्नांनी सतावून सोडलं आहे. त्यांची संभाव्य उत्तरं शोधण्याची त्याची धडपड अव्याहत चालू आहे. त्याविषयीच्या चिंतनातूनच मग पंचमहाभूतांची संकल्पना उदयाला आली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे या विश्वाचे पायाभूत घटक असल्याचं जवळजवळ सगळ्याच प्राचीन संस्कृतींनी मान्य केलं होतं. कोणी त्यातले चारच घटक प्रमाणभूत मानले होते, कोणी तीन, कोणी पाच; तरीही त्या सर्वांमध्ये बऱ्याच अंशी समानता होती. मुख्य म्हणजे याच घटकांनी विश्व बांधलं गेलं आहे, हा विचार सर्वमान्य होता. त्याकाळात विश्वाविषयीची माहितीही तुटपुंजी होती आणि ती मिळवण्याची साधनंही अपुरी होती. जसजशी अधिक माहिती मिळत गेली, विचार अधिक प्रगल्भ झाले, तसतसा या मूळ संकल्पनेचा आराखडा बदलत गेला. अठराव्या शतकात डाल्टननं अणू हा आपल्या जगातील आणि बहुतांशी साऱ्या विश्वातील चराचर सृष्टीचा घटक असल्याचा सिद्धांत मांडला. कणाद ऋषींनीही अशीच संकल्पना मांडल्याचा दावाही केला जातो. त्या विचारानुसार अणू हा मूलभूत आणि अविभाज्य घटक असल्याचं म्हटलं गेलं. पुढचं शतक- दीड शतक त्याला आव्हान दिलं गेलं नाही; पण एकोणिसावं शतक सरता-सरता इलेक्‍ट्रॉनचा शोध लागला आणि अणूचेही अधिक लहान घटक असतात हे दिसून आलं. त्यांना इलेक्‍ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अशा मूलकणांचा दर्जा दिला गेला. त्यांचे गुणधर्मही निश्‍चित करण्यात आले आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि अणूच्या अंतरंगातला त्यांचा रचनाबंधही निश्‍चित करण्यात आला. पण, जसजसं याबाबतीत अधिक संशोधन होऊ लागलं, तसतसं या घटकांचेही घटक असल्याचं दिसू लागलं. आपण क्षितिज गाठण्याची पराकाष्ठा करावी आणि ते आता आपल्या जवळ आलं आहे, अशी भावना मनात उमटावी, तो ते अजूनही तितकंच दूर असल्याची जाणीव व्हावी, अशीच ही स्थिती होती. तेव्हापासून मूलकणांचा हा भुलभुलैया वैज्ञानिकांना भुरळ घालतो आहे. एका वैज्ञानिकानं तर याचं वर्णन ‘पार्टिकल झू’ असं केलं आहे. आघाडीच्या या क्षेत्रामध्ये अनेक वैज्ञानिक आज गुंतले आहेत, त्यात लक्षणीय कामगिरी करणारा एक भारतीय तरुण म्हणजे आशुतोष कोतवाल. ‘हिग्ज बोसॉन’ किंवा ज्याला प्रसारमाध्यमांनी ‘देवकण’ असं नाव दिलं आहे, त्याच्या शोधाचा जो जागतिक प्रकल्प राबवला गेला, त्यात आशुतोषचा महत्त्वाचा सहभाग होता. याच आशुतोषची सर्वांगीण ओळख त्याच्या आईनं, माणिक कोतवाल यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चरित्रग्रंथात करून दिली आहे. अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. ‘कवी तो होता कसा आननी’  हे समजून घेण्याची इच्छा वैज्ञानिकांच्या बाबतीतही, खासकरून आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात लागू व्हावी. विज्ञान संशोधनाचं क्षेत्र अजूनही आजच्या तरुणांची प्राथमिक निवड नाही, त्यामुळं त्या क्षेत्राचं आकर्षण का वाटलं, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, त्या क्षेत्राची गुणवैशिष्ट्यं काय आहेत, त्या क्षेत्रातल्या कारकिर्दीमुळं इतर कुठेही न मिळणारे कोणते फायदे आहेत, याची ओळख जोवर तरुणांना होत नाही, तोवर त्यांना ती वाट धरण्याची प्रेरणा मिळणार नाही, ती देण्याचं काम या पुस्तकानं जोमदारपणे बजावलं आहे. तसं पाहिल्यास आशुतोष कोतवाल हे एका मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबातूनच वर आले आहेत. स्वकष्टावर आणि उपजत गुणवत्तेवर टाकीचे योग्य ते घाव घालत त्यांनी आजचा पल्ला गाठला आहे. त्यामुळं उत्तम वैज्ञानिक होण्यासाठी काहीतरी आगळीवेगळी प्रतिभाच हवी किंवा कोणीतरी ‘गॉडफादर’ हवा, या अपसमजांना मूठमाती देण्याचं उल्लेखनीय काम या पुस्तकानं बजावलं आहे. चरित्रलेखन ही एका अर्थी अवघड कामगिरी आहे. कारण, चरित्रनायकाच्या प्रेमात तरी लेखक पडतो किंवा त्याचा तिरस्कार तरी नकळत होतो. उत्तम लेखनासाठी आवश्‍यक असं साहित्यिक अलिप्तपण जपणं कठीण होतं. इथं तर एक आई आपल्याच मुलाविषयी लिहीत आहे, त्यामुळं तर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती; पण माणिक कोतवालांनी ती अलिप्तता सहजपणे साधली आहे. उलट इतक्‍या जवळून पाहिल्यामुळं आशुतोषच्या मूलभूत गुणवत्तेला नेमके कसे पैलू पडत गेले, याची वास्तव कहाणी समोर आली आहे. मूलकण विज्ञान ही अमूर्त विज्ञानाची एक शाखा आहे, त्यामुळं ते सर्वसामान्य वाचकांना सहजगत्या आकलन होईल, अशा सुबोध आणि रसमय भाषेत सांगणं ही बाब सोपी नाही, त्यामुळं काही भागात निवेदन अंमळ क्‍लिष्टतेकडं किंवा दुर्बोधतेकडं झुकलेलं दिसतं; पण एका अर्थी ते अपरिहार्य आहे. तो भाग टाळून पुढं जात वाचन केलं, तरी रसास्वादात उणीव जाणवणार नाही. विज्ञानाविषयी जिज्ञासा असणाऱ्या वाचकांच्या अत्यावश्‍यक यादीत याचा समावेश तर व्हायलाच हवा; पण त्या दिशेकडे जाणं टाळणाऱ्या सर्वसामान्य वाचकांनाही हे पुस्तक आनंद देऊन जाईल.

पुस्तकाचं नाव - पुत्र व्हावा ऐसा
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे
(०२० - २५३८३८८९, ९७६४९०७३६६)
पृष्ठं - २९०
मूल्य - ३०० रुपये

Web Title: book review