‘पॉप्युलर’च्या जडणघडणीचा मागोवा

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
रविवार, 8 जानेवारी 2017

एकूणच आपल्याला नोंदी ठेवणं, दस्तऐवजीकरण इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या वाटतात. त्यामुळं मराठी पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेच्या वाटचालीचा आढावा पुस्तकरूपानं प्रसिद्ध होणं ही अपवादात्मक घटना आहे. १९५२मध्ये सुरू झालेल्या पॉप्युलर प्रकाशन या संस्थेच्या हीरक महोत्सवाचं निमित्त साधून ‘ग्रंथाली’साठी किशोर आरस यांनी ‘पॉप्युलरचं अंतरंग’ हे पुस्तक तयार केलं आहे. (तयार केलं म्हणण्याचं कारण त्यांनी संकलक म्हणून - संपादक नव्हे - काम केलं आहे.)

एकूणच आपल्याला नोंदी ठेवणं, दस्तऐवजीकरण इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या वाटतात. त्यामुळं मराठी पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेच्या वाटचालीचा आढावा पुस्तकरूपानं प्रसिद्ध होणं ही अपवादात्मक घटना आहे. १९५२मध्ये सुरू झालेल्या पॉप्युलर प्रकाशन या संस्थेच्या हीरक महोत्सवाचं निमित्त साधून ‘ग्रंथाली’साठी किशोर आरस यांनी ‘पॉप्युलरचं अंतरंग’ हे पुस्तक तयार केलं आहे. (तयार केलं म्हणण्याचं कारण त्यांनी संकलक म्हणून - संपादक नव्हे - काम केलं आहे.)

या पुस्तकाची मांडणी तीन विभागांत करण्यात आली आहे. पहिल्या विभागात ‘पॉप्युलर’चे संस्थापक रामदास भटकळ यांनी ‘चिरंतनाच्या मागावर’ हा जवळजवळ शंभर पानांचा मजकूर लिहिला आहे. स्वाभाविकच तो आत्मचरित्रात्मक आहे. स्वत- भटकळ आणि पॉप्युलरचं अभिन्नत्व त्यातून अधोरेखित झालं, तरी स्वत-चीच पाठ थोपटून घेण्यापासून तो बराच बचावला आहे. कारण हे लेखन करताना तृतीयपुरुषी निवेदकाची (‘पॉप्युलर’च्याच ‘एक झाड दोन पक्षी’च्या निवेदकाची आठवण देणारी) केलेली योजना! या कथनामधून भटकळ यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचा ‘मौज’मधला राबता, तिथं भेटलेली लेखक-कलावंत मंडळी, झडलेल्या साहित्यिक चर्चा, घडत गेलेला विचक्षण रसिक...हे सारं उलगडतं. भटकळ यांची अभिजात रुची, लेखक-कलाकारांवर लोभ करण्याची वृत्ती, त्यांचा नवतेकडं असणारा कल आणि ‘आतला आवाज’ ऐकत (बरेचसे) अचूक आडाखे बांधण्याचा स्वभाव त्यामधून दिसतो. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी पुस्तक प्रकाशनाला प्रारंभ करणाऱ्या भटकळ यांची आणि ‘पॉप्युलर’ची पायाभरणी कशी झाली ते यातून समजतं.

दुसरा विभाग आहे ‘पॉप्युलर’ची यापुढची ‘मार्गक्रमणा’ मांडणारा. या विभागात व्यवस्थापक आणि नंतर संचालक म्हणून काम पाहिलेल्या रघुनाथ गोकर्ण आणि संपादक मृदुला जोशी, अंजली कीर्तने, शुभांगी पांगे आणि अस्मिता मोहिते यांची मनोगतं आहेत. या सर्व मनोगतांमधून
‘पॉप्युलरची साहित्यनिवड, संपादन कार्य, पुस्तक निर्मिती, विविध ग्रंथप्रसार योजना इत्यादी बाबींवर प्रकाश पडतो. संस्थेच्या कार्यालयातलं खेळीमेळीचं वातावरण, ‘सर’, ‘बॉस’ अशा साहेबगिरीला असणारा मज्जाव यांचा सर्वांनीच आत्मीयभावानं उल्लेख केला आहे; तसंच मतभेदही नोंदवले आहेत. मोठ्या लेखकांसह काम करताना आलेले अनुभव त्यांनी टिपले आहेत. ‘पॉप्युलर’मधले दिवस आनंदाचे होते,’ असं मृदुला जोशींनी म्हटलंय, तर ते ‘विद्यापीठ’ असल्याची भावना अस्मिता मोहिते यांनी व्यक्त केली आहे. तिथलं निवडीचं आणि वाद घालण्याचं स्वातंत्र्यही सर्वांना उल्लेखावंसं वाटलं आहे.

‘उत्तरपक्ष’ या विभागात भटकळ यांच्या सात मुलाखतींचा अंतर्भाव आहे. कादंबरीविषयी रंगनाथ पठारे, कथेसंबंधी अरुणा दुभाषी, कवितेबद्दल सुधा जोशी यांनी भटकळ यांना बोलतं केलं आहे. रत्नाकर मतकरी यांनी नाटकाविषयी, वसंत पाटणकर यांनी समीक्षेबद्दल, अरुण टिकेकर यांनी चरित्र, इतिहास आणि सामाजिक शास्त्रं यांविषयी आणि वसंत सरवटे यांनी चित्रं-सजावट आणि बालसाहित्य या विषयांवर भटकळ यांच्याशी संवाद साधला आहे. या सर्व मंडळींनी ‘पॉप्युलर’च्या सूचीतल्या विविध साहित्यप्रकारांच्या अनुषंगानं मुलाखतींची आखणी केल्यामुळं त्या पुष्कळच एकलक्ष्यी आणि आटोपशीर झाल्या आहेत. पठारे यांनी व्यवस्थापन, व्यवसाय आणि साहित्यिक दृष्टिकोन यासंबंधानं महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. अरुणा दुभाषी यांनी कथाकारांची निवड, एकूण पुस्तकात कथासंग्रहाची तुलनेनं कमी प्रकाशनं, लेखिकांची अल्प उपस्थिती यासंबंधानं स्पष्ट विचारणा केली आहे.

‘पॉप्युलर’नं सुरवातीपासून कवितासंग्रह आणि नाटकंही प्रकाशित केली. त्यांचा व्यवसायही चांगला झाला. सुधा जोशी आणि रत्नाकर मतकरी यांनी त्याची यथोचित दखल घेऊन या दोन्ही साहित्यप्रकारांमधल्या संपादकीय संस्करणाची आव्हानं वगैरे कळीचे प्रश्न चर्चेला घेतले आहेत.
ग. त्र्यं. देशपांडे, के. नारायण काळे, श्री. के. क्षीरसागर, वा. ल. कुळकर्णी, गंगाधर गाडगीळ, गो. म. कुलकर्णी, द. ग. गोडसे अशा मातब्बर समीक्षकांची महत्त्वाची पुस्तकं ‘पॉप्युलर’नं प्रकाशित केली. नंतरच्या पिढीतल्या समीक्षकांची मात्र तशी झाली नाहीत, हे पाटणकर यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

याच प्रकारे अरुण टिकेकर आणि वसंत सरवटे यांनीही ‘पॉप्युलर’च्या प्रकाशनांविषयी समतोल प्रश्न विचारले आहेत. त्यामुळं या मुलाखती केवळ भलावण करणाऱ्या झाल्या नाहीत. त्यातून ‘पॉप्युलर’नं काय साधलं, कसं साधलं हे पुढं येतंच; पण काय साधायला हवं होतं तेही! मुळात इंग्रजी-मराठी पुस्तकांचा जम बसलेला व्यवसाय, कुटुंबाची पाठराखण यामुळं मराठी पुस्तकांची प्रकाशनं करण्याची चैन करता आली, असं भटकळ नमूद करतात; पण ही ‘चैन’ मराठी साहित्य व्यवहाराला किती लाभदायक ठरली ते आपण जाणतोच. एकूण, या पुस्तकातून मराठीतल्या एका प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचं अंतरंग उलगडतंच आणि त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याच्या जडणघडणीचा मागोवाही घेता येतो.

एकहाती, एकटाकी सलग इतिहासलेखनातली एकसंधता इथं नसली, तरी वेगवेगळ्या वयाच्या, ‘पॉप्युलर’शी विविध नात्यांनी बांधलेल्या, आतल्या आणि बाहेरच्याही मंडळीनी संस्थेच्या कार्याची विविध दृष्टिकोनांतून टिपलेली वैशिष्ट्यं हाती लागतात. शिवाय ‘पॉप्युलर’विषयीच्या आस्थेनं लेखन केल्यामुळं खरोखरच अंतरंगाचा ठाव लागण्यास मदत होते. अशा वेळी काही मुद्द्यांची पुनरावृत्ती होणे अटळ असते. तशी ती या पुस्तकातही आढळते. संपादकीय हात फिरवून ती काढणं शक्‍य होतं. या निमित्तानं एका प्रकाशन संस्थेच्या साठ वर्षांच्या सुदीर्घ वाटचालीचा आढावा आपल्यासमोर येतो हे महत्त्वाचं.

पुस्तकाचं नाव - पॉप्युलरचं अंतरंग
संकलक : किशोर आरस
प्रकाशक -
ग्रंथाली, मुंबई
(०२२-२४२१६०५०)
पृष्ठं : ३१५ /
मूल्य : ४०० रुपये

Web Title: book review in saptarang