सागरी आठवणींचा मनोहर कोलाज

उदय हर्डीकर
रविवार, 29 जानेवारी 2017

गहन, गंभीर आणि अवखळ सागराचं रूप कायम आकर्षित करतं. पाण्याचा हा अफाट साठा म्हणजे मानवाला निसर्गानं दिलेलं वरदानच. त्याच्या पाठीवरून लहानग्या होडक्‍यांपासून भलीमोठी जहाजं मार्गक्रमण करत असतात; पण याचा मूड कधी बदलेल, हे सांगता येत नाही. मात्र, तरीही हजारो वर्षं सागर आणि माणसाचं नातं आहे. पूर्वी लाकडी ओंडक्‍यांच्या मदतीनं पाण्यात उतरलेल्या माणसानं कालांतराने वल्ही, शिडाच्या नौकांचा वापर केला. वाफेचा शोध लागल्यावर जहाजं वेगवान झाली. नंतर खनिज तेलाच्या साह्यानं ती प्रवास करायला लागली आणि आता अणुशक्ती मदतीला आली आहे. काळ बदलला, तंत्र बदललं; पण माणसाची साहसी वृत्ती आणि सागराचा स्वभाव बदलले नाहीत.

गहन, गंभीर आणि अवखळ सागराचं रूप कायम आकर्षित करतं. पाण्याचा हा अफाट साठा म्हणजे मानवाला निसर्गानं दिलेलं वरदानच. त्याच्या पाठीवरून लहानग्या होडक्‍यांपासून भलीमोठी जहाजं मार्गक्रमण करत असतात; पण याचा मूड कधी बदलेल, हे सांगता येत नाही. मात्र, तरीही हजारो वर्षं सागर आणि माणसाचं नातं आहे. पूर्वी लाकडी ओंडक्‍यांच्या मदतीनं पाण्यात उतरलेल्या माणसानं कालांतराने वल्ही, शिडाच्या नौकांचा वापर केला. वाफेचा शोध लागल्यावर जहाजं वेगवान झाली. नंतर खनिज तेलाच्या साह्यानं ती प्रवास करायला लागली आणि आता अणुशक्ती मदतीला आली आहे. काळ बदलला, तंत्र बदललं; पण माणसाची साहसी वृत्ती आणि सागराचा स्वभाव बदलले नाहीत. आजही अस्सल खलाशाला ओढ असते त्या खाऱ्या पाण्याची, प्रतिकूल स्थितीशी झुंजण्याची आणि आपलं तारू सुखरूप किनाऱ्याला लावण्याची...

सागरी जीवन म्हणजे सहनशक्तीपासून सगळ्याची कठोर कसोटी. नाविकांचं जगच वेगळं. त्यांच्या काही खास परंपरा, त्यांची विशिष्ट जीवनशैली, त्यांची भाषा हे सगळं आगळंच. मर्चंट नेव्हीतून रेडिओ ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले नितीन लाळे यांचं ‘बोटीवरून’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं आहे. नेव्हीतले अधिकारी म्हणून विलक्षण वेगळं जग त्यांनी अनुभवलं आणि तेच त्यांनी पुस्तकरूपात मांडलं आहे. नेव्हीत काम करताना त्यांची अक्षरश- जगभर भ्रमंती झाली आणि भन्नाट अनुभव आले. काही गोड, काही कडू. त्यांनी सुवेझ कालव्यातून प्रवास केला, रशियाला भेट दिली, शेजारच्या पाकिस्तानात जाऊन आले आणि जगानं वाळीत टाकलेल्या उत्तर कोरियाला जाण्याची संधीही त्यांना मिळाली. कधी त्यांना समुद्रानं प्रेमळ, तर कधी रौद्र रूप दाखवलं. ‘बोटीवरून’ या सगळ्या अनुभवांची माहिती देतं. त्याशिवाय फार परिचित नसलेल्या; किंबहुना अजिबातच कल्पना नसलेल्या पाणबुड्यांच्या जागाची ओळखही लाळे यांनी थोडक्‍यात करून दिली आहे. सागरी जीवन जेवढं आकर्षक, तेवढंच धोक्‍याचंही असल्याची कल्पना त्यांच्या लेखनातून येते. पुस्तकातलं काही लेखन त्यांचं स्वत-चं, काही त्यांच्या पत्नीचं तर काही मित्रांनी सांगितलेल्या अनुभवांचं आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभव नाहीत, तर त्याला इतिहासाच्या अभ्यासाची जोडही आहे. त्यामुळं ते वाचणं आनंददायी होतं.

लाळे यांचे अनुभव वेगळेच आहेत. मुंबईच्या पिरपाँव (तुर्भे) जेटीवरून त्यांचा ऑइल टॅंकर निघत असताना सुटलेला सोसाट्याचा वारा, खराब झालेलं वातावरण आणि त्यातूनही क्षणभर दिसलेली माथेरानची डोंगररांग हा त्यांचा पहिला अनुभव. असा अनुभव घेणं खरोखरच दुर्मिळ. असाच एक अनुभव पाकिस्तानच्या कराचीजवळच्या बिन कासीम बंदराचा. भारताबरोबर कायम शत्रुत्वानं वागणाऱ्या पाकिस्तानाच्या वागणुकीवर लाळे यांनी हा लेख लिहिला आहे. भारतीय जहाजावर केलेलं डेकोरेशन उतरवण्याचा आदेश देणारा पाकिस्तानी पायलट आणि नंतर बंदरातील अधिकाऱ्यांची वागणूक यावर लाळे यांनी लेखन केलं आहे. सर्वसामान्यांना कधीच राजकारणाशी देणं-घेणं नसतं. त्यांना सलोखा हवा असतो; पण सत्तेपुढं चालत नाही. मात्र, तरीही सर्वसामान्यांची वागणूक आपुलकीचीच असते, असं ते सांगतात. जगानं वाळीत टाकलेल्या जहाल उत्तर कोरियाच्या सफरीबाबत स्मिता लाळे यांनी अनुभव सांगितले आहेत. कम्युनिस्ट देशांतल्या २०-२५ वर्षांपूर्वीच्या संशयी आणि करड्या वातावरणाची झलक या लेखात दिसते. त्यानिमित्तानं कोरियाच्या फाळणीचा संदर्भही समजतो. त्या देशातली परिस्थिती आणि एकूण चित्र सामोरं येतं. नाविक आणि वादळ यांचा कधी तरी संबंध येणारच. त्या संदर्भातील एक लेखही आहे.

‘इक्वेटर (विषुववृत्त) क्रॉसिंग सेरेमनी’ हा पुस्तकातील एक मस्त लेख. व्यापारी जहाजांवर नोकरी करणाऱ्यांना विषुववृत्त ओलांडावं लागतं. प्रथमच हा प्रवास करणाऱ्यांसाठी जहाजांवर एक धमाल कार्यक्रम होतो. दंतकथांनुसार, ‘लॉर्ड नेपच्युन’ हा महासागरांचा सम्राट. विषुववृत्ताच्या आडव्या रेषेमुळं पृथ्वीवर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशी दोन काल्पनिक साम्राज्यं निर्माण झाली. पण हे वृत्त ओलांडणाऱ्यांना ‘सम्राट’ शिक्षा देतो. अर्थात, हा प्रकार म्हणजे निव्वळ गंमत असते आणि ‘शिक्षा’ भोगल्यावर नवख्याला ‘इक्वेटोर क्रॉसिंग’चे सर्टिफिकेटही दिलं जाते. मग सायंकाळी जहाजावर धमाल पार्टी रंगते. ‘पाणबुड्यांच्या सहवासात’ हा वेगळाच लेख आहे. लाळे यांची भाषाशैली चांगली आहे. काही लेखांत त्यांनी तपशीलही दिले आहेत. ‘बोट’ वेगळी आणि ‘जहाज’ वेगळे हे या पुस्तकातून कळतं. जहाजावरचं आयुष्यच वेगळं आणि आव्हानात्मक. त्याला सामोरे जात हजारो नाविक आपलं काम पार पाडत असतात. प्रत्यक्षात जहाजप्रवास किती जणांना करता येईल, ही बाब अलहिदा; पण त्या जगात जाऊन येण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं.

पुस्तकाचं नाव - बोटीवरून
लेखक - नितीन लाळे  प्रकाशक - इंद्रनील प्रकाशन, कोल्हापूर (९५४५९८६३२१)
पृष्ठं - २६०/ मूल्य - ३६० रुपये

Web Title: book review in saptarang