नव्या पर्यावरणातल्या प्रबोधनात्मक गोष्टी

विनायक लिमये
रविवार, 5 मार्च 2017

लहान मुलांसाठी गोष्टींच्या पुस्तकांची संख्या तशी कमीच आहे. मुलांना बोधप्रद आणि कंटाळा येणार नाहीत अशा पुस्तकांची तर वानवाच आहे. त्याचबरोबर मुलांचं पर्यावरण बदललंय त्याची जाण ठेवून लिहिलेल्या कथा आणि तशी पुस्तकं यासंदर्भातही फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यात दूरचित्रवाणीवरील कार्टून फिल्म दाखवणाऱ्या विविध वाहिन्यांचे आक्रमण आहेच. हे कार्टूनपट आणि त्यातल्या पात्रांचं आकर्षण व त्या पात्रांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेली हिंदी किंवा इंग्लिश भाषेतल्या पुस्तकांची आणि चित्रमय पुस्तकांची या सगळ्यात भर पडत आहेच. मुलांना चांगली पुस्तके देण्याचे प्रयत्न मराठीत तुरळकच आहेत.

लहान मुलांसाठी गोष्टींच्या पुस्तकांची संख्या तशी कमीच आहे. मुलांना बोधप्रद आणि कंटाळा येणार नाहीत अशा पुस्तकांची तर वानवाच आहे. त्याचबरोबर मुलांचं पर्यावरण बदललंय त्याची जाण ठेवून लिहिलेल्या कथा आणि तशी पुस्तकं यासंदर्भातही फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यात दूरचित्रवाणीवरील कार्टून फिल्म दाखवणाऱ्या विविध वाहिन्यांचे आक्रमण आहेच. हे कार्टूनपट आणि त्यातल्या पात्रांचं आकर्षण व त्या पात्रांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेली हिंदी किंवा इंग्लिश भाषेतल्या पुस्तकांची आणि चित्रमय पुस्तकांची या सगळ्यात भर पडत आहेच. मुलांना चांगली पुस्तके देण्याचे प्रयत्न मराठीत तुरळकच आहेत. या पार्श्‍वभूमीवर अमोल प्रकाशनच्या मुलांसाठीच्या गोष्टींच्या २० पुस्तकांचा संच खूपच आशादायक आणि आवर्जून वाचावा असा आहे.

पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांचे रंजन होईल आणि त्यांना त्यात रस वाटेल अशा या गोष्टी आहेत. क्षिप्रा शहाणे यांनी या गोष्टी लिहिल्या आहेत. आजोबांच्या गोड गोष्टी, रंगतदार गोष्टी, सुरस गोष्टी, अद्‌भुत गोष्टी, कथा तुमच्या आवडीच्या, कथा संतमहतांच्या, अशा विविध शीर्षकांच्या या २० पुस्तकांमध्ये शहाणे यांनी विविध विषय हाताळले आहेत. मुलांचं पर्यावरण आता बदललंय, त्यांच्या आयुष्यात अनेक नव्या गोष्टी आल्या आहेत. ५०-६० वर्षांपूर्वीच्या त्याच त्या जादूच्या आणि राक्षसाच्या गोष्टी आणि राजा-राणीच्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत याचे भान ठेवून शहाणे यांनी सध्याच्या काळातली उदाहरणे घेऊन मुलांना प्रामाणिकपणा, कष्ट याचं महत्त्व पटवून दिले आहे. अभ्यास कसा करावा, मोठ्या माणसांचा मान कसा राखावा, याबद्दलही काही कथांमधून नेमक्‍या शब्दांत मार्गदर्शन केलंय. ‘नवी दृष्टी’ या पुस्तकात त्यांनी शारदा या मुलीची कथा सांगून साक्षरतेचं महत्त्व पटवून दिलंय. या कथेतली शारदा दिवाळीच्या सुटीत आपल्या निरक्षर आईला लिहायला-वाचायला आणि स्वाक्षरी करायला शिकवते. या कथेतून शहाणे इथे मुलांना साक्षरतेचं महत्त्व तर पटवून देतातच, पण सुटीचा उपयोगही चांगल्या पद्धतीने कसा करता येईल ते सांगतात. ‘शक्ती आणि युक्तीच्या गोष्टी’ या शीर्षकाच्या पुस्तकात ‘गावाला पुरापासून वाचवणाऱ्या हेमंताची गोष्ट सांगून प्रसंगावधान आणि योग्यवेळी केलेली कृती कशी असायला हवी हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिलंय.   

प्रत्येक पुस्तकात घनश्‍याम देशमुख यांची आकर्षक चित्रे आहेत. कथा आणि बहारदार चित्रांचा समन्वय झाल्यानं ही पुस्तके वाचनीय आणि पाहण्यासाठीही खूप छान झाली आहेत. भूतदया, उच्च मूल्याचा आग्रह, शिक्षण, नम्रता या गोष्टी आयुष्यात कशा उपयुक्त आहेत हे विविध गोष्टींमधून समर्पक शब्दांत स्पष्ट केलंय. पौराणिक कथा आणि राजेरजवाड्याच्या कथा सांगतानाही शहाणे यांनी आजच्या काळाचे भान ठेवले आहे आणि योग्य शब्द वापरून या कथा मुलांमध्ये कुठलेही चुकीचे समज न रुजता त्यांचे रंजनही करतील आणि त्यांना ज्ञानही देतील याची दक्षता घेतली आहे. एकूणच २० पुस्तकांचा हा संच, त्यातली चित्रे आणि लेखन यामुळे लक्षवेधी आणि वाचनीय झाला आहे.

पुस्तकाचे नाव : गोष्टी चतुराईच्या, सूरस गोष्टी आणि अन्य कथा
एकूण : २० पुस्तकांचा संच
पृष्ठं - ३२ (प्रत्येकी), मूल्य - ४० रुपये (प्रत्येकी)
प्रकाशक - अमोल प्रकाशन, पुणे (दूरध्वनी ०२०- २४४३३९९०)

Web Title: book review in saptarang