भाषाभगिनींच्या सर्वोत्कृष्ट साहित्याची झलक

भाषाभगिनींच्या सर्वोत्कृष्ट साहित्याची झलक

ज्ञानपीठ हा भारतीय साहित्य विश्वात सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार. इसवीसन १९६५पासून दरवर्षी देशातल्या मान्यताप्राप्त बावीस भाषांपैकी एका भाषेतल्या साहित्यिकाला हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. गेल्या ५२ वर्षांत फक्त सात लेखिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. आशापूर्णादेवी, महाश्वेतादेवी, महादेवी वर्मा, अमृता प्रीतम, कुर्रतुल ऐन हैदर, इंदिरा गोस्वामी, प्रतिभा राय या त्या सात जणी. वेगवेगळ्या भाषांत लेखन करणाऱ्या या सात जणींची आणि त्यांच्या साहित्याची ओळख मंगला गोखले यांनी ‘ज्ञानपीठ लेखिका’ या पुस्तकात करून दिली आहे.
ज्ञानपीठविजेत्या या लेखिकांची लेखनाची भाषा वेगळी असली, तरी त्यात एक समान सूत्र आहे, ते म्हणजे समाजाचं वास्तव चित्रण त्यांच्या लेखनात आहे. समाजातले शोषित घटक विशेषत: स्त्री हाच त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

आशापूर्णादेवींनी विसाव्या शतकातल्या स्त्रीजीवनाचं दर्शन घडवलं आहे. त्यांच्या पुरस्कारविजेत्या ‘प्रथम प्रतिश्रुती’ या कादंबरीची नायिका ‘सत्यवती’च्या माध्यमातून त्यांनी स्त्रीच्या अवहेलनेच्या विरोधात बंड पुकारलेलं दिसतं. या कादंबरीनंतर त्याच मालिकेत त्यांनी लिहिलेल्या ‘सुवर्णलता’ आणि ‘बकुलकथा’ या कादंबऱ्यांतून तीन पिढ्यांत बदलत गेलेल्या स्त्रीजीवनाचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय होतो. बंगालीतीलच दुसऱ्या लेखिका महाश्वेतादेवी यांनी तर साहित्याला शस्त्र मानलं. आदिवासी स्त्रिया, दलित, वंचित हेच त्यांच्या लेखनाचे केंद्रबिंदू राहिले. द्रौपदी, कुंती ओ निषादी, रुदाली, स्तनदायिनी, हजार चौराशीर माँ या दीर्घ कथांतून त्याचाच प्रत्यय येतो. शोषितांसाठी लिहिणं हे त्या लेखकाचं कर्तव्य समजत. त्यांच्या हक्कांसाठी त्या प्रसंगी रस्त्यावरही उतरल्या. राजकारण्यांवरही त्यांनी सडेतोड मते मांडली. उडिया लेखिका डॉ. प्रतिभा राय यांनीही आदिम आदिवासी बोंडा समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलं. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनातही उमटलं. स्त्रीचं समाजातलं स्थान, तिची अगतिकता त्यांनी आपल्या कथांमधून मांडली. त्यांच्या साहित्यात ओडिशातील समाजजीवनाचं दर्शन घडतं. स्त्रीजीवनात काही विधायक बदल घडायला हवेत, तर स्त्रीनं आपला आदर आपणच करायला शिकलं पाहिजे, अशी भूमिका हिंदी कवयित्री महादेवी वर्मा मांडतात. गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. स्त्रीशिक्षण आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी कार्य केलं. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारत त्यांनी अनुभवला. त्यामुळंच भारतातली विषमता, स्त्रियांची दयनीय अवस्था दूर करण्याची भावना त्यांच्या साहित्यात दिसते. काव्यात अंतर्मुख होऊन स्वत:बद्दल विचार करणाऱ्या महादेवींनी गद्य लेखनात मात्र स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडली.

वादळी आयुष्य जगलेल्या पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांनी फाळणीनंतरचं कौर्य अनुभवलं. त्या दु:खाचा आविष्कार त्यांच्या ‘पिंजर’ कादंबरीत दिसतो. स्त्रीजीवनातली वेदना, धर्मभेदामुळं चिरडलं जाणारं तिचं भावविश्व त्यांच्या साहित्यात दिसतं. फाळणीची दाहकता कुर्रतुल ऐन हैदर या उर्दू लेखिकेनंही अनुभवली. फाळणीचे समाजमनावर झालेले परिणाम त्यांनी ‘मेरे भी सनमखाने’ या कादंबरीत चित्रित केले. फाळणीनंतर मुस्लिमांबरोबरच हिंदूंची विशेषत: सिंधी समाजाची झालेली ससेहोलपट त्यांच्या ‘सीताहरण’ या कादंबरीत दिसते. ‘आग का दरिया’मध्येही त्यांनी स्वातंत्र्य चळवळ, राजकारण्यांचे डावपेच, फाळणीनंतर दुभंगलेली माणसं या साऱ्यांचा मागोवा घेतला आहे. आसामी लेखिका डॉ. इंदिरा गोस्वामी साहित्याकडं जीवनातल्या व्यथांपासून सुटका मिळवण्याचा मार्ग म्हणून पाहतात. अंधारात खितपत पडलेल्या समाजाच्या दु:खाला वाचा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या लेखनातून केला. त्यांनी व्यक्तिगत आयुष्यात खूप यातना सोसल्या, कष्टकरी स्त्रिया, विधवांचं दु:ख पाहिलं. त्याचंच वास्तव चित्रण त्यांच्या लेखनात उमटलं. त्यांच्या ‘चिनाबर स्त्रोत’, ‘मामरेधारा तारोवाल’, ‘अहिरन’ या कांदबऱ्यांमध्ये त्यांनी बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या व्यथा मांडल्या. रामायणाचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी त्या वृंदावन इथं राहिल्या. तिथल्या विधवांच्या वेदनेला त्यांनी ‘नीलकंठी ब्रज’ या कादंबरीतून शब्दरूप दिलं.  

समाजातलं वास्तवाचं चित्रण, त्याचबरोबर समाजातला अन्याय, विषमता दूर व्हावी, यासाठीची तळमळ या साऱ्याच लेखिकांच्या लेखनात दिसते. त्यातून प्रत्येकीनंच सामाजिक बांधिलकीही जपली. महाश्वेतादेवी, प्रतिभा राय, इंदिरा गोस्वामी, महादेवी वर्मा यांनी तर वंचितांसाठी प्रत्यक्ष काम केलं. गद्य, पद्य, ललित, स्तंभलेख असे लेखनाचे विविध प्रकार या लेखिकांनी हाताळले आहेत. त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतीचा मराठीसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. काही कादंबऱ्यांवर चित्रपट, मालिकाही झाल्या आहेत. मराठी साहित्य नेमकं याच बाबतीत कमी पडते, असं मंगला गोखले यांचं म्हणणं आहे. मराठी साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद होऊन, तो संपूर्ण भारतातील वाचकांपर्यंत पोचत नाही, हेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांमध्ये मराठी साहित्यिक कमी असण्याचं कारण आहे, असं त्यांचं मत आहे. गोखले यांनी पुस्तकात ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या लेखिकांचा जीवनपट, लेखनामागची त्यांची भूमिका आणि या भाषाभगिनींच्या संपूर्ण साहित्याची थोडक्‍यात ओळख करून दिली आहे. त्यांनी दाखवलेली ही झलक वाचकाला मूळ साहित्याकडं आकर्षित करते, हे नक्की.

पुस्तकाचं नाव : ज्ञानपीठ लेखिका
लेखिका :
मंगला गोखले
प्रकाशन :
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
पृष्ठं : २७८,
किंमत : ३६० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com