‘ट्वेल्थ फेल’ ः कडवी संघर्षगाथा, उज्ज्वल प्रेमकथा आणि प्रेरणादायी यशोगाथा! (पुस्तक परिक्षण)

प्रा.डॉ.मथु सुरेश सावंत
Wednesday, 8 July 2020

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आय.ए.एस. आणि आय.पी.एस. अशा अधिकारीपदांवर पोहोचलेल्या व्यक्तिमत्त्वांबद्दल आजच्या तरुण पिढीला खूपच आकर्षण आहे. किंबहुना तेच त्यांच्यासमोरचे आयडॉल आहेत. संघर्षातून सन्मानित झालेल्या, अशा अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या आत्मकथनांना, अनुभवकथनांना सध्या चांगला वाचकवर्ग आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आय.ए.एस. आणि आय.पी.एस. अशा अधिकारीपदांवर पोहोचलेल्या व्यक्तिमत्त्वांबद्दल आजच्या तरुण पिढीला खूपच आकर्षण आहे. किंबहुना तेच त्यांच्यासमोरचे आयडॉल आहेत. संघर्षातून सन्मानित झालेल्या, अशा अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या आत्मकथनांना, अनुभवकथनांना सध्या चांगला वाचकवर्ग आहे.

‘मी एक स्वप्न पाहिलं’ (राजेंद्र भारुड), मन में है विश्‍वास (विश्‍वास नांगरे पाटील), ताई, मी कलेक्टर व्हयनू (राजेश पाटील), खाकीतील माणूस (अशोककुमार) ही प्रेरणादायी पुस्तके स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण - तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाचली जातात. त्याच मालिकेतील मुंबई येथे डेप्युटी पोलीस कमीशनर पदावर कार्यरत मनोजकुमार शर्मा ह्या अधिकाऱ्याच्या जीवनावर अनुराग पाठक यांनी हिंदीतून ‘ट्वेल्थ फेल’ ही कादंबरी लिहिली. मनोजकुमार शर्मा यांची ही प्रेरणादायी जीवनकथा मराठी वाचकांसाठी उपलब्ध व्हावी, या हेतूने पत्रकार संदीप काळे यांनी ही कादंबरी मराठीतून अनुवादित केली आहे. ही कादंबरी ग्रंथालीने नुकतीच प्रकाशित केली आहे. तीव्र सामाजिक भान असलेल्या एका संवेदनशील अधिकाऱ्याच्या जडणघडणीची ही ओजस्वी कथा आहे.

प्रवाही कथनशैलीतील ह्या कादंबरीची मांडणी छोट्याछोट्या ५० प्रकरणांमधून करण्यात आली आहे.

मनोजकुमार शर्मा यांचा जन्म मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील जौरा तालुक्यातील बिलग्राम या छोट्याशा खेड्यात झाला. मनोजचे वडील रामवीर शर्मा हे राज्य शासनाच्या सेवेत कृषिविस्तार अधिकारी होते आणि आई गृहिणी. एक धाकटा भाऊ कमलेश आणि बहीण रजनी. वडिलांची नोकरी कधीच स्थिर नव्हती. रामवीर शर्मा यांचा वरिष्ठांशी सतत संघर्ष चालू असे. त्यामुळे ते चार महिने नोकरीवर असायचे आणि सहा महिने निलंबित किंवा गैरहजर. त्यामुळे त्यांना कधीच नियमित पगार मिळत नसे. मिळालेला पगार कोर्टकचेऱ्यांमध्ये जात असे. परिणामी बाराही महिने कुटुंबाची आर्थिक ओढाताण ठरलेली. आई तीन लेकरांना घेऊन गावी संसाराचा गाडा कसाबसा हाकत असे.

मनोजचे दहावीचे शिक्षण गावीच झाले, तर बारावीचे शिक्षण जौरा ह्या तालुक्याच्या गावी. बहुतेक सर्व विद्यार्थी कॉपीच्या भरवशावरच परीक्षा पास होत. मनोजही त्याला अपवाद नव्हता. तो कसाबसा दहावी पास झाला होता. पण त्याचवर्षी जौरा येथे आलेल्या उपविभागीय अधिकारी दुष्यंतसिंह यांनी कॉपीला आळा घातल्यामुळे मनोज हिंदी वगळता बाकी सर्व विषयांत बारावीला नापास झाला. निकाल समजल्यावर मनोज गावाबाहेरच्या मंदिरात जाऊन बराच वेळ एकटाच रडत बसला.

मनोजच्या घरची गरिबी किती असावी? एकदा जौरा ह्या तालुक्याच्या गावी क्रिकेट स्पर्धा होत्या. त्यासाठी  संघाची प्रवेश शुल्क होती शंभर रुपये. खेळाडूंनी प्रत्येकी १० रुपये जमा करावेत, असे ठरले. पण खेळाची आवड असूनही मनोज १० रुपये फीस भरू शकला नाही. त्यामुळे त्याला खेळाची आवड असूनही संघात सहभागी होता आले नाही. कारण त्याची आई उधार-उसनवारीवर कसाबसा घरखर्च भागवीत होती. त्यामुळे नाइलाजाने त्याला कॉमेंट्री करावी लागली. दुधाची तहान ताकावर भागवायची, दुसरे काय! ती कामेंट्रीही मनोजच्या पथ्यावरच पडली. त्याच्या गावचा संघ हरला.  त्यावेळी मनोज म्हणाला होता,

‘लहरोंसे डरकर, नौका पार नही होती
कोशीश करनेवालोंकी कभी हार नही होती’
ह्या ओळी जशा खेळाला लागू पडतात, तशा मनोजच्या जीवनालाही तंतोतंत लागू पडतात.

मनोजने केलेले खेळाचे धावते वर्णन ऐकून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी दुष्यंतसिंह अतिशय प्रभावित झाले. त्यांनी मनोजचे तोंडभरून कौतुक केले.
 

प्रा.डॉ.मथु सुरेश सावंत
सहयोगी प्राध्यापक,
पीपल्स कॉलेज, नांदेड
मो. ८८०६३८८५३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Book Review of Twelth Fail