
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
अमेरिकन पोलिसी मालिकांची एक अखंड परंपरा आहे, ‘हिल स्ट्रीट ब्ल्यूज’, ‘द वायर’, ‘ट्रू डिटेक्टिव्ह’ अशा भरपूर मालिका सांगता येतील. ‘बॉश’ ही मालिका त्याच परंपरेत; पण जरा वेगळ्या शैलीत येते. मायकल कॉनलीच्या कादंबऱ्यांवर आधारित ही कथा लॉस एंजेलिस पोलिस खात्यातील होमसाइड शाखेतील डिटेक्टिव्ह हायरोनिमस ऊर्फ ‘हॅरी’ बॉशभोवती (टायटस वेलिव्हर) फिरते; पण ‘बॉश’चा गाभा केवळ रहस्य किंवा गुन्ह्यांत दडलेला नाही, तर तो आहे एका शहराच्या ढवळून टाकणाऱ्या गढूळ वास्तवात आणि न्यायप्रणालीतील तडजोडींत. ही मालिका केवळ एका पोलिस अधिकाऱ्याची कथा नाही. एरिक ओव्हरमायरने निर्माण केलेली ‘बॉश’ ही शहर, गुन्हे, न्याय आणि व्यवस्थात्मक गुंतागुंत या साऱ्याच्या छायेखाली घडणारी एक गडद; पण अतिशय संयत कथा आहे.