ओल्या मुठीत अजून आहे शाबूत चांदणे जिणे घायाळ तरीही सुरू पहाड फोडणे

child labour
child labour

काही बालकांच्या शाळेची दारं लहानपणीच बंद होतात. आम्ही कितीही शाळाबाह्य मुले शोधत असलो तरी माळेतून एखादा मणी सहज निसटून जावा तसा एखादा मुलगा शिक्षणाच्या प्रवाहातून लांब निघून जातो. तो पुन्हा कधी प्रवाहात येत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक गरिबी. आपल्या देशात बालमजुरांची संख्या प्रचंड आहे. घराला आर्थिक आधार व्हावा म्हणून मिळेल ती कामं बालवयात करतात. जगण्याच्या ससेहोलपटीत बालके आपला आनंद केव्हाच विसरून गेलेली असतात. कुटुंबाची आर्थिक चणचण अशा मुलांचे भावनिक जग काळवंडून टाकते. शाळा हरवून बसलेल्या बालकांना पुस्तकांच्या आभासी जगापेक्षा भाकरीचे जग अधिक प्रिय वाटायला लागते.

वाईट व्यसन बालवयात लागल्याने अनेकांचे भविष्य उद्‌ध्वस्त झाल्याचे आपण बघतो. काम चांगले की वाईट याचे मूल्यमापन नको, जगण्याचा उद्देश त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. आम्ही काही बालमित्र उन्हाळ्याच्या सुट्टीत तेंदूपानाचे पुडके पलटवायला जायचो. कामाचा आनंद घ्यायचो. त्यावेळी पंचवीस पैसे खूप वाटायचे. पैसे कमी मिळाले म्हणून हुज्जत घातली नाही. खरं तर आपल्या देशात श्रमाचे मोल वय आणि लिंगानुसार ठरत असते. बालकांनी मोठ्यांच्या बरोबरीने कितीही कष्ट उपसले तरी त्याचे मूल्य वयानुसार दिले जाते. स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत मिळणारी मजुरी कमीच आहे.
जुन्या शाळेचा एक प्रसंग आठवतो. भूगोल शिकवत असताना कुणीकुणी रेल्वेने प्रवास केला आहे, असा प्रश्‍न मुलांना विचारला. त्यावर आठ-दहा मुलांनी हात वर केले. मला नवल वाटले. अहेरी, मुलचेरा तालुक्‍यांतील आदिवासी मुलांना रेल्वे कशी माहीत असेल? म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की; या भागातली बरीच मुलं घरच्यांसोबत मंचेरीयल, हैद्राबाद येथे कामाला जातात. मला नवल वाटले. त्यांच्या कष्टाळू चेहऱ्यांकडे बघत मी म्हणालो, तुम्ही खरंच रे भाग्यवान हैद्राबाद तरी बघितलं. मी तर अजूनही या शहराचं नावच ऐकत आलो आहे. मुलं विस्मयानं माझ्याकडं बघत हसायला लागली. जुलै महिना सुरू झाला तरी बड्या शहरात कामाला गेलेली मुलं परत आलेली नसायची. एक दत्तू नावाचा मुलगा अजूनही आठवतो. शाळा सुरू होताना त्याचे आईवडील आश्रमशाळेत सोडून कामाला जायचे आणि थेट दिवाळीतच घ्यायला यायचे. आपल्या आई-बाबांना कष्ट करताना बघून यांचेही कोवळे हात मातीत रमले जायचे.
काहींच्या शिरावर कौटुंबिक जबाबदारी लहान वयातच येते. ज्या हातांनी लेखणीशी घट्ट नाते सांगावे तेच हात रेती विटांशी इतके घट्ट होतात की इतरांच्या अपेक्षांचे ओझे वाहता वाहता स्वतःचा चेहरा हरवून बसतात. अशा परिस्थितीत आपली स्वप्ने, इच्छा, आकांक्षांना जगण्याच्या प्रवासात निर्माल्यासारखं दान करावं लागते. तेलंगणात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील तसेच आजूबाजूच्या राज्यातील बरेच मजूर मिरची तोडण्यासाठी जात असतात. जामलो माकदम बारा वर्षांची मुलगी. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात राहणारी. तेलंगणात मिरचीच्या शेतात आपल्या गावातील सहकाऱ्यांसह मिरची तोडण्यासाठी गेली. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झालेलं. स्थलांतरित मजुरांचे जत्थे आपल्या गावाच्या दिशेने निघाले. जामलो आपल्या सहकाऱ्यांसह अनवाणी निघाली. जामलो काही अंतर चालली आणि मिरचीच्या शेतात कोसळली व जखमी झाली. तिचे सोबती थांबायला तयार नव्हते. सोबत्यांसोबत तीन दिवस इवल्याशा पावलांनी चालली. चौथ्या दिवशी वेदना असह्य झाल्याने जमिनीवर कोसळली ती कायमची. पोटाच्या भटकंतीत जामलोसारखी बालकं काळाच्या पडद्याआड गडप होत चालली आहेत. एक दुःखद बातमी आपण वाचतो आणि हळहळ व्यक्‍त करून मोकळे होत असतो. समाजातील अशा घटनांना माणूस म्हणून आम्ही जबाबदार नाही का? शाळेच्या मुख्य प्रवाहातून अशी फुलपाखरे भरकटू नये म्हणून शासन आपली भूमिका बजावते. माणूस म्हणून आपली भूमिका दिशादर्शक आणि पथदर्शकाची असली म्हणजे, अशी पाखरे कामाच्या चक्रवातातून सहज बाहेर काढता येतील.


मारोतीकाका सावकाराच्या दुकानात बालवयापासून काम करत होता. वर्गात प्रचंड हुशार. कुटुंबाला लागणारा किराणा त्याच्या मासिक मजुरीतून कापला जायचा. तो गणितात अत्यंत तल्लख. बापाकडे अनेकदा शाळेत जाण्याचा आग्रह धरला, पण घरच्या मोलमजुरीला किराण्याचा आधार असल्याने, मारोतीकाकाच्या बापाने दुकानातलं काम सोडू दिले नाही. उभं आयुष्य दुकानात काम करण्यात गेलं. त्याला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करता आला नाही. जेव्हा जेव्हा नवं काही करण्याचा विचार मालकाजवळ तो बोलून दाखवायचा तेव्हा तेव्हा मालक त्याला पगारवाढीचे आमिष दाखवून त्याच्या अंगी असलेल्या गुणांवर पाणी फेरायचा. बालमजुरीच्या नादी लागून अनेकांना आपलं अंगभूत कौशल्य गमवावं लागलं. कधी इतरांच्या मर्जीखातर तर कधी नाइलाजाने.
मोनाली आजची संगीत शिक्षिका. ती जेव्हा गाणे गाते तेव्हा तिच्या आवाजातून आर्ततेचा दुःखद स्वर अलगद बाहेर येतो. वडिलांच्या अकाली निधनाने तिच्या आईवर धुणीभांडी करण्याची वेळ आली. बालवयात मोनाली आईसोबत इतरांच्या घरी धुणीभांडी करायला जायची. ज्या घरी कामाला जायची ते घर एका संगीत शिक्षकाचे. मोनालीला संगीताचे सूर सतत छळत होते. तिला गायनाची प्रचंड आवड. तिच्यातील प्रतिभा जाणून शिक्षकांनी संगीताचे ज्ञान दिले. तिने आईसोबत काम करता करता हार्मोनियम वादनाचे कौशल्य हस्तगत केले. ती संगीत विशारद झाली. आज जेव्हा ती गोड गळ्याने गाते तेव्हा तिच्या गळ्यातून जिंदगीचे सूर अभिव्यक्‍त होत असल्याची जाणीव होते.

स्टारमेकरवरील तिच्या गायनाचे व्हिडिओ बघितले म्हणजे अनंतकाळाचे सूर तिच्या गळ्यात लपले आहेत याचा अंदाज येतो. बालवयात तिला गवसलेला सूर प्रत्येकालाच गवसेल असे नाही. पण, बालवयाला आकार देऊन, त्याच्या जगण्याचे सूर प्राप्त करण्यासाठी आम्ही निश्‍चितच मदत करू शकतो.
ओल्या मुठीत अजून
आहे शाबूत चांदणे
जिणे घायाळ तरीही
सुरू पहाड फोडणे.
जरी भाकरीने केली
सदा तिची परवड
भूक पोटात कोंबून
तिने चुंबियेला गड.
ध्येयवादी बालकं आपला गड निश्‍चितच साध्य करतात. महानगरांच्या चौकात हात पसरवणारी बालकं आम्हाला तयार करायची नाहीत. प्रत्येक बालकाच्या अंगात मोनालीसारखा सुप्तगुण दडलेला असतो. त्याचा शोध घेऊन योग्य दिशा दिली म्हणजे त्याला त्याच्या जिंदगीचा सूर नक्‍कीच गवसेल. बालकांच्या सशक्‍त विचारांवर उद्याचे भविष्य निर्भर आहे. त्यांच्या ओल्या मुठीत अजून बरेच काही दडले आहे. त्यांना भूकमुक्‍त, भयमुक्‍त कसं जगता येईल याचा विचार आत्मनिर्भर झालेल्या समाजाने करणे गरजेचे आहे. तेव्हाच ही मुलं उद्याच्या महाकाय बागेत फुलांसारखी टवटवीत दिसतील आणि कुणाचाही अन्नासाठी बळी जाणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com