

Contemporary Indian Female Painters
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
खासगीपणा कटाक्षाने जपणाऱ्या कलाकार ब्रिंदा मिलर याची कामाची पद्धतही वेगळी आहे. त्या चित्राची रूपरेखा आधी ठरवत नाहीत. चित्र काढण्यापूर्वी त्याची योजना काटेकोरपणे करत नाहीत. त्या म्हणतात, ‘मी रंग भरण्यापूर्वी आकृती रेखाटत नाही, आधीपासून काही ठरवत नसते. माझ्या हातून जे उतरते ते मला चकित करणारे हवे असते.’ त्यांना एआय आणि डिजिटल आर्टचे कौतुक आहे... पण त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष कलेला संगणकीय रूप द्यायचे नाही.
‘मा झ्यातील कलावंत हा सतत जागृत असतो, शांतपणे त्या मला सांगतात. मी ज्या वेळी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असते, तेव्हा कामासंबंधी निर्णयसुद्धा माझ्यातील कलावंतच घेत असतो.’
ब्रिंदा मिलर या चित्रकर्तीसंबंधी बोलताना ‘काला घोडा महोत्सवा’पासून सुरुवात करण्याचा मोह होणे साहजिकच आहे. ती उत्सवी गर्दी, या कार्यक्रमाचे विविध प्रायोजक, तेथे साकार होणारे निरनिराळे कार्यक्रम हे सारे आकर्षकच असते. परंतु तसे करणे म्हणजे एखाद्या झाडाची फांदी ही मुळापेक्षा अधिक महत्त्वाची मानणे असे होईल; त्याचे मूळ बीज हे अंतर्मुख, स्वयंस्फूर्त असे असते आणि इथे बीज म्हणजे त्यांचा स्टुडिओ.
‘मी पेंटिंग्ज करताना माझ्या आजूबाजूला मला कोणीही चालत नाही. अगदी एकही माणूस मला नको.’ त्या ठामपणे सांगतात. महोत्सवासाठी रोज दीडशेहून अधिक जणांना सोबत घेऊन एका सांस्कृतिक महत्त्वाच्या उत्सवाचे आयोजन त्याच करतात. परंतु समोर कोरा कॅनव्हास घेऊन काम करताना त्यांना संपूर्ण एकांत हवा असतो. हे दिसते वदतोव्याघातासारखे; परंतु हेच त्यांच्यातील कलावंताचे मर्म आहे.