मुलांवर वाढत्या अपेक्षांचे ओझे

मुलांवर वाढत्या अपेक्षांचे ओझे

कालच माझ्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलताना ती फार नाराज वाटली. तिच्या नाराजीचं कारण विचारताच तिनं सांगितलं, ‘‘अगं, माझी साक्षी ना इतर मुलांसारखी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत नाही. छान छान बोलत नाही. नुसती मंद अशी वागते. त्यामुळे मला इतरांसारखं तिचं काही फेसबुकवर, व्हॉट्‌ॲपवर टाकता येत नाही. मग मला लाइक्‍स पण मिळत नाहीत. फार वाईट वाटतं ग!’’ तिचं बोलणं ऐकून मी आश्‍यर्चचकित झाले आणि एका वेगळ्याच विचारात गढून गेले.

कारण, साक्षी ही अतिशय गुणी मुलगी. रोज शाळेत जाणारी. वाचन, लेखन, शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम मुलगी होती. माझ्या मुलीच्याच वर्गात असल्यानं ती बऱ्यापैकी परिचयातील होती. फक्त ती मोजकंच बोलायची. इतर कलागुणांमध्ये सहभागी नाही व्हायची इतकंच. पण, साक्षी ही तिच्या आईच्याच दृष्टीनं मंद होती, याचा मात्र मला जोरदार धक्का बसला आणि मनाला जाणीव झाली ती वाढत्या अपेक्षांच्या ओझ्याची.

आजकाल सोशल मीडियाच्या वाढत्या वापरानं सगळ्यांनाच भारावून सोडलंय. आपल्या मुलांचे कोडकौतुक, गोडवे त्यावर व्यक्त करताना आपण थकत नाही. पण, याबरोबरच त्या मुलांच्या मनावर नकळत आपल्या साऱ्या अपेक्षांचं ओझं तर वाढत नाही ना? याची जाणीव पालक म्हणून ठेवायला हवी.

जसं आपलं कुणी कौतुक केलं, की आपल्याला छान वाटतं, प्रेरणा मिळते तसं आपणही मोकळ्या मनानं त्यांचं कौतुक करायला हवं. मात्र, उगीचच त्यांच्याशी तुलना करून दुःखी होणं टाळायला हवं. इतरांच्या सुखानं सुखी होणं आणि इतरांच्या दुःखानं मन भरून येणं, ही खरी सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि हे ज्याला उमगलं तोच खरा भाग्यवान. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा दुहेरी परिणाम समाजमनावर होत असतो. त्यामुळे आपण त्यातून कितपत चांगले विचार घ्यायचे, हेही सर्वस्वी आपल्याच हातात आहे.  चित्ररूपात मिळणाऱ्या कमेंट्‌स आणि लाइक्‍सची हाव धरण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात आपण किती लोकांना आवडतो, हवेहवेसे वाटतो, हे जास्त महत्त्वाचं आहे, नाही का?

आता हे झालं सोशल मीडियाचं. परंतु, पालक म्हणूनही आपल्या मुलांना जाणून घ्यायला हवं. त्यांच्या क्षमता, आवडीनिवडी समजून घेऊन त्यांना योग्य दिशा द्यायला हवी. आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट यावी, यासाठी प्रयत्न करणं वेगळं. परंतु, त्या गोष्टी येण्याकरिता त्यांच्यावर दबाव टाकणं, आग्रह धरणं मात्र पूर्णपणे चुकीचं आहे.

प्रत्येक मूल स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. प्रत्येकाच्या वाढीचा, विकासाचा वेग भिन्न आहे. त्यामुळे आपणही थोडं संयमानं वागायला हवं. त्यांच्या शिकण्याच्या वेगावर, वर्तणुकीवर त्यांची हुशारी ठरवता कामा नये.  म्हणूनच, मुलांवरचं हे वाढत्या अपेक्षांचं ओझं थोडंसं कमी करा, मुलांना मुक्त निरीक्षण करू द्या. निसर्गाच्या सहवासात रमू द्या. त्यांच्या गतीनं शिकूद्यात. मग बघा, तुमच्यातील एका छोट्याशा बदलानं मुलांच्या सुप्त गुणांना, कौशल्यांना वाव मिळेल. त्यांच्या आकांक्षांचं बळ इवल्याशा पंखात भरून ते स्वतःहून गगनाला गवसणी घालण्यास उद्युक्त होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com