
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
महाराष्ट्राच्या सीमेजवळ आणि मध्य प्रदेश या राज्यात येणारे बुरहाणपूर हे ठिकाण माहीत नाही, असा इतिहासप्रेमी सापडणे तसे मुश्कीलच. याला कारण या ठिकाणचे इतिहासाशी असलेले नाते. अनेक ऐतिहासिक संदर्भ चिकटलेले हे ठिकाण त्यामुळेच चुकवू नये असेच. याशिवाय आपल्या जळगाव जिल्ह्यापासून हे शहर अगदी जवळ. मुघल साम्राज्यात या ठिकाणचे अनन्यसाधारण महत्त्व होते. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याचा मार्ग याच बुरहाणपूरवरून जात असे. या शहराला ‘दख्खनचे प्रवेशद्वार’ समजले जात असे, ते या करणामुळेच.