- डॉ. संजय वाटवे
आजकालच्या समाजात राग, आक्रमकता, हिंसाचार अशा घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसतात. क्षुल्लक कारणावरून रागवायचं, डोक्यात राग घालून घ्यायचा आणि लगेच दुसऱ्याची राखरांगोळी करायची, अशा घटना सर्व स्तरांवर दिसून येतात. अशा घटनांची संख्या, त्यातली अमानुषता इतकी पराकोटीची आहे, भयावह आहे, की त्यामुळे सगळा समाजच बेचिराख होतो की काय अशी भीती वाटते. सगळ्या समाजशास्त्रज्ञांनी एकत्र बसून विचार विनिमय करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर लवकरच समाज संपुष्टात येईल.
मुळात आपल्याला राग का येतो? राग ही अप्रिय घटनेची एक प्रतिक्षिप्त क्रिया ( Reflex ) आहे. आपल्या बचावाचं एक साधन आहे. (Defence) राग आल्याशिवाय आपल्या हातून अनेक क्रिया होऊच शकत नाहीत. राग आला की शरीर High Alert Mode मध्ये जाऊन लढाई, बचाव, पलायन अशा गोष्टी करू शकतं. कोणी हल्ला चढवला तर बचाव करण्यासाठी हे हत्यार आहे.
पण समाजात कोणीच हल्ला केलेला नसताना Anger आणि Aggression मोठ्या प्रमाणात दिसतात. माझ्याकडे का पाहिलं, मला हॉर्न का दिला, मी कोण आहे माहीत आहे का? माझी अस्मिता दुखावली, अशा किरकोळ कारणावरून हत्या झाल्या आहेत. दारूला पैसे दिले नाहीत; माझे घेतलेले पैसे वेळेत परत केले नाहीत, ही संतप्त होण्याची आणि हत्या ह्याची पुरेशी कारणं तरी आहेत का?
दुर्दैवानी हा हिंसाचार काही समाजकंटकांपुरता मर्यादित नाही; समाजाच्या सर्व थरात हा जागोजागी बोकाळलेला दिसतो. अगदी सुशिक्षित समाजात सुद्धा उघड छुपा हिंसाचार आढळून येतो. जेवणात मीठ जास्त आलं, चहा उशिरा दिला अशा कारणांवरून बायकोला चप्पलने बेदम मारहाण केली जाते. आपलं घराणं, आमच्या चालीरिती, आमची जात, आमच्या आस्था ही जतन करण्याची गोष्ट नसून दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्याची सबब आहे.
कोणीतरी फेक नॅरेटिव्ह पसरवतं आणि कुठला तरी समाज, गट, संघटना पेटून उठतात आणि जाळपोळ, हिंसाचार सुरू करतात. एवढे आपण कमजोर आहोत का ? ऊठसूट अस्मिता दुखावली जाते म्हणजे अस्मिता कमजोर असण्याची कबुलीच असते.
राग आला तर त्यातून होणाऱ्या आक्रमकतेची व्याप्ती प्रचंड मोठी असते. बायकोचे ३६ तुकडे फ्रिजमध्ये टाकणे; नाइट ड्युटीवरील लेडी डॉक्टरचे हातपाय कापणे, बलात्कारित महिलेच्या अंगावर ५६ रक्तरंजित चावे सापडणे; एक सरपंच धंद्याला आडवा येतो म्हणून बोटे तोडणे; जिवंतपणी डोळे काढणे, काय घटना आहेत ह्या? ही काय माणसं म्हणायची? इतका कशाचा राग येतो आणि तो इतक्या थराला कसा जातो? अशी माणसं म्हणजे नुसती भुईला भार आहेत.
राग हा सार्वत्रिक आहे पण राग स्वतःची आणि दुसऱ्याची राखरांगोळी करणारा असतो. क्षणैक रागाच्या भरात वाटेल ती कृत्ये करणारा माणूस भानावर आला की आयुष्यभर पश्चात्ताप दग्ध जीवन जगतो. त्यामुळे राग हा बेभान करणारा असताच कामा नये. कारण क्षणैक राग तुमचं शिक्षण, संस्कार, विवेकबुद्धी सगळ्यावर मात करून गैरकृत्य घडवून आणू शकतो. वर्षानुवर्षे जोपासलेला संयम क्षणार्धात नाहीसा होऊन माणसाचा पशू बनवून टाकतो.
राग हा जर बचाव आणि Reflex आहे तर शास्त्र त्याला रोग का म्हणतं. राग केव्हा यावा, राग किती यावा, अशा निकषांवर शास्त्र ह्याला रोग म्हणते. दिवसभर चिडचिड करणारा माणूस रोगीच असतो. कुठल्याही क्षुल्लक कारणांनी राग येणार असेल, तर जीवन जगताच येणार नाही. कारण रागामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात हानी (Wear and Tear) होत असतो. तुम्ही जेव्हा समोरच्याकडे अंगारभऱ्या नजरेनी पाहता, तेव्हा ते अंगार तुम्हालाच जाळत असतात. समोरच्याला खाऊ का गिळू असं बघितलं, की त्याच्या आधी तुम्हालाच रागानी गिळलेलं असतं.
त्यामुळे राग नैसर्गिक असला तरी सारखा येणं, अतिरिक्त प्रमाणात येणं, रागात वाहवत जाणं, हिंसक बनणं हे रोग मानले आहेत. त्यातूनच अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक रोग निर्माण होत असतात. म्हणून माझं पेशंट्सना सांगण्याचं एक आवडतं वाक्य आहे, ‘राग नियंत्रण म्हणजे रोग नियंत्रण.’
समाजात घरोघरी बोकाळलेल्या रागाची कारणं तरी काय असतात
१) असुरक्षित सामाजिक वातावरण : जेव्हा समाजात असुरक्षित वातावरण वाढीला लागतं, तेव्हा माणसांच्या रागात वाढ होते. एकमेकांवर विश्वास ठेवता येत नसेल तर सगळेच शत्रू वाटायला लागतात. मग एखाद्याला शत्रूच मानलं तर त्याचं वाटेल ते नुकसान करायला मन धजावतं. समाजात कुरघोडी केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, ही समजूत दृढ झाली की माणूस तशी आक्रमकता जाणीवपूर्वक अंगी बाणवतो. मग एकदम मन पुरेसं निगरगट्ट झालं की वाटेल तशी गैरकृत्ये, पापे करता येतात.
२) संस्कारांचा संपूर्ण अभाव : आजकाल चांगले मार्क्स की चांगला पगार एवढं एकच गृहीत मांडून मुलांची वाढ केली जाते. सगळे मिळून इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणे, रेस जिंकणे याला पेटून कामाला लागतात. त्यामुळे मुलांच्या जडणघडणीत कोणाला वेळ घालवायचा नसतो. सुटीत आठ दिवस संस्कार वर्गात घातले की झाले संस्कार. मूळ प्रश्न इथे आहे, की संस्करणाचे महत्त्व हरवून गेले आहे. मुलांच्या जडणघडणीत कोणाला वेळ नसतो आणि intent ही नसतो. पैसा मिळवता आला की झालं. मग अशी मुलं हिंसाचारी बनतात.
३) स्वनियंत्रणाचा संपूर्ण अभाव : माणूस यशस्वी होण्याचा इतका आटापिटा करतो आहे, की तो Good civilized human being व्हायचा विसरून गेला आहे. त्यामुळे Human being आता Being Human असा टी शर्ट किंवा ब्रेसलेट घालतो आणि सगळी Inhuman कृत्ये करतो.
व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मपरीक्षण आणि स्वनियंत्रण अतिशय महत्त्वाचे आहेत. या सरावानींच येतात. किती जण या गोष्टी करण्याची क्षमता बाळगून आहेत? त्यामुळे स्वतःवर, षड्रिपूंवर, रागावर नियंत्रण नाही.
४) ‘मी’चे वाढलेले महत्त्व : आजकालच्या समाजात स्वतःला विशेष समजून वावरणारे असंख्य महाभाग वावरत असतात. Swollen Ego मुळे इतरांना तुच्छ लेखायला व त्यांचा पाणउतारा करायला मोकळे. मी, माझा मोठेपणा, माझी इच्छा, माझी महत्त्वाकांक्षा या मनातल्या सगळ्यात प्रबळ भावना असतात. समाज, देश म्हणजे मी नाही. आपण आहोत. इतरांच्या गरजा-इच्छा, त्यांनाही समाविष्ट करून घेण्याची मनाची रुंदी आणि खोलीच नसते. मी पणामुळे जीवनदृष्टीच बिघडलेली असते. आपण म्हणजे समाज असतो, मी पणा हा माज असतो.
५) संकुचित विचारसरणी : मी पणा, माझा गट, माझी संघटना, माझी जात, माझा धर्म या सगळ्या संकल्पना मनाच्या मर्यादा आहेत. या Boundaries च्या बाहेरही मोठं विश्व आहे, अशी जाणीवच नसते. त्यामुळे वैश्विक दृष्टी तयार होतच नाही. मग संकुचित कूपमंडल अस्थिर, असहिष्णू व्यक्ती तयार होते. अशा व्यक्तीला मोठी झेप घेताच येत नाही.
६) न्यायव्यवस्था : स्थिर उन्नत समाजासाठी न्यायव्यवस्था उत्तम असणे सगळ्यात महत्त्वाचे असते. आपल्याला न्याय मिळेल ही भावना असेल, तरच समाज स्थिर, प्रगतिशील, विश्वसनीय असतो आणि उत्कर्ष घडवून आणू शकतो. आपल्याला कुठेच न्याय मिळत नाही, मिळणार नाही अशी भावना माणसाला असुरक्षित, अस्थिर करते. असा माणूस मग स्वतःच न्याय मिळवण्यासाठी कुमार्गाला जातो.
भ्रष्ट, गलथान, अरेरावीखोर, लुटारू, अन्यायी हीच पोलिसांची जनमानसात प्रतिमा आहे. मग लोक स्वतःच सेटलमेंट करायला बघतात. राजकीय वातावरण तर हिंसाचाराला, जाळपोळीला प्रोत्साहन देणारेच आहे. मी बाहुबली आहे याचा अर्थ मी विकास करू शकतो असा नाही; तर मी कितीही विध्वंस करू शकतो असा आहे.
कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी कोणावरच कारवाई होत नाही. सगळे एकमेकांचे गुन्हे सांभाळून घेतात हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे सरकारकडून न्याय मिळणार नाही अशी खात्री लोकांच्यात आहे. या सगळ्या सामाजिक, राजकीय, न्यायिक गैरव्यवस्थेमुळे समाज संपूर्ण निराश आहे, वैतागलेला आहे. अशा खदखदणाऱ्या समाजातच हिंसाचार फार होतात. विकास योजना म्हणजे समाज विकास नव्हे तर योग्य न्यायदान म्हणजे समाज विकास हे सगळ्या रेवडी सरकारांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे.
मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही. व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने अथक परिश्रम केले तर अजूनही व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होऊ शकते. सुसंस्कार, सुविवेक, सारासार विचार, वैश्विक दृष्टिकोन, आत्मपरीक्षण, स्वयंनियंत्रण अशा अनेक मार्गांनी स्थिर व्यक्तिमत्त्व निर्माण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण होऊ शकतो. भ्रष्ट समाज लवकरच नष्ट होतो. त्यामुळे कसदार व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याच्या कामाला वाहून घेऊ या. समाजाचा विनाश वाचवू या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.