भरजरी कपडे सांभाळणारी ‘संदूक’

अनिता लोढा
बुधवार, 12 जून 2019

तुमचे भरजरी कपडे आपल्याकडे व्यवस्थित जपून ठेवणारी व हवे त्या दिवशी उपलब्ध देणारी ‘संदूक’ नावाची ही सेवा युनिक ठरत आहे. 

बिझनेस वुमन - अनिता लोढा
आपल्याला वर्षभरात लग्न व मुंजीसारख्या अनेक समारंभांना उपस्थित राहावे लागते. या वेळी आपण सुंदर, टापटीप व भरजरी कपडे घालून वावरत असतो. समारंभानंतर मात्र आपण या उंची कपड्यांच्या देखभालीच्या काळजीत पडतो. कपड्यांच्या देखभालीच्या या समस्येवर उत्तर शोधले आहे अनिता लोढा यांनी. तुमचे भरजरी कपडे आपल्याकडे व्यवस्थित जपून ठेवणारी व हवे त्या दिवशी उपलब्ध देणारी ‘संदूक’ नावाची ही सेवा युनिक ठरत आहे. 

अनिता म्हणतात, ‘‘लग्न समारंभांसाठी वापरात येणारे महागडे कपडे सांभाळणे हे खूप मोठे कसरतीचे काम ठरते व लोकांची ही समस्या मी हेरली होती. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असताना ‘संदूक’चा जन्म झाला. मी ‘संदूक’च्या माध्यमातून लोकांचे हे भरजरी कपडे माझ्याकडे व्यवस्थित ठेवून त्यांना हवे तेव्हा उपलब्ध करून देण्याचे ठरवले. ही युनिक सेवा सुरू करण्याच्या माझ्या निर्णयाला घरच्यांची साथ मिळाली. भरजरी वस्त्रे जतनासाठी देशात पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या या सेवेला लगेचच जोरदार प्रतिसाद मिळण्यास सुरवात झाली.’’

आपल्याकडील मौल्यवान दागदागिने आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. गरजेच्या वेळी आपण ते बॅंकेतून काढून आणतो आणि वापरतो. आपल्या खास आठवणी जोडल्या गेलेल्या कपड्यांचीही तशीच काळजी घेणे, ही प्रत्येकाची गरज असते. शिवाय घरातील महागड्या सिल्क साड्या, भरजरी शालू, उंची सूट, ब्लेझर्स, मुलामुलींचे मौल्यवान कपडे घरात ठेवण्यासाठी जागेची कमतरता भासते. त्यात हे कपडे ऐन समारंभाच्या वेळी योग्य स्थितीत उपलब्ध होणेही जिकिरीचे असते. कधी त्याला दुर्गंध सुटलेला असतो, तर कधी डाग पडलेले असतात, कधी हे कपडे विरतात, तर कधी त्याला कसर लागते. महागडे कपडे खराब होणे हा मोठा मनस्ताप असतो. शिवाय समारंभाच्या वेळी पुन्हा या कपड्यांना नीटनेटके करून वापरणे हा एक व्याप असतोच. हेच ओळखून कपडे योग्य स्थितीत आणि समारंभाच्या वेळी ते उत्तम स्थितीत उपलब्ध करून देण्याचा अनिता यांनी निर्णय घेतला. कपडे हवे असतील तेव्हा, फक्त एक दिवस आधी पूर्वसूचना दिल्यानंतर ‘संदूक’ हे कपडे अत्याधुनिक पद्धतीने क्‍लिनिंग व इस्त्री करून तुम्हाला घरपोच देते.

अनिता म्हणतात, ‘‘मला ‘संदूक’ची संकल्पना प्रत्यक्षात आणताना अनेक प्रश्न विचारण्यात आले. आमचे कपडे तुम्ही सुरक्षित कसे ठेवाल का, हा मुख्य प्रश्‍न असायचा. मी पूर्णपणे वातानुकूलित, सुसज्ज दालनामध्ये कपडे जतन करून, त्यावर चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून आणि कपड्यांचा विमा करून ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला. नजीकच्या काळात पुण्यासारख्या शहरामध्ये विविध ठिकाणी ‘संदूक’च्या शाखा सुरू करणार आहे. आयुष्यात आपण अनेक समस्यांना तोंड देत असतो, मात्र बहुसंख्य लोक अशाच समस्यांना तोंड देत असतील याचा आपल्याला विसर पडतो. तुम्हीदेखील अशा समस्या शोधून काढा आणि त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यातून तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा राहील. मात्र, व्यवसाय उभा करताना विश्‍वास संपादन करणे सर्वांत महत्त्वाचे असते.’’  
(शब्दांकन : गौरव मुठे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business woman Anita lodha