रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा (व्हिडिओ)

गौरव मुठे
बुधवार, 17 एप्रिल 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

बिझनेस वुमन - सोनिया बासू, संस्थापक संचालक, ‘हेल्थफिन’
मी स्वतः डॉक्‍टर असल्याने ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची सेवा करते. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येने हॉस्पिटल ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. मात्र, प्रत्येकाला मर्यादा असतात.

माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांबरोबरच इतर गरजू रुग्णांनाही कशा प्रकारे मदत करता येईल, हा विचार डोक्‍यात सतत सुरू असतो. आर्थिक अडचणींमुळे बऱ्याच रुग्णांना तातडीच्या वेळी आवश्‍यक उपचार घेता येत नाहीत आणि त्यातून बरेच रुग्ण फक्त दवाखान्याचा खर्च करू शकत नसल्याने दगावतात. एक डॉक्‍टर म्हणून मी जीव वाचवू शकत असले, तरी आर्थिक अडचणींमुळे रुग्ण आमच्यापर्यंत पोचतच नाही आणि यातूनच जन्म झाला ‘हेल्थफिन’चा. 

‘हेल्थफिन’च्या माध्यमातून ज्या लोकांकडे वैद्यकीय विमा नाही किंवा ज्यांचा विमा उतरविण्यात आला आहे, मात्र उपचारांसाठी तत्काळ निधी आवश्‍यक असलेल्या लोकांना आर्थिक मदत केली जाते. शिवाय रुग्ण दवाखान्यात असेल आणि तोच कमावता असल्यास ९० दिवसांच्या कालावधीपर्यंत त्याच्याकडून पैसे देखील घेतले जात नाही. तो बरा झाल्यानंतर ‘ईएमआय’च्या माध्यमातून दिलेल्या कर्जाची परतफेड करू शकतो. शिवाय बऱ्याच रुग्णांना उपचार घेण्यासाठी ठराविक कालावधीसाठी बिनव्याजी कर्जदेखील देण्यात येते. पैसे नाहीत म्हणून कोणताच रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी मी प्रयत्न करत असते. ‘हेल्थफिन’ सुरू करताना अनेक अडचणी आल्या मात्र यादरम्यान कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा मिळत होता. त्यामुळेच दोन वर्षांत तीन हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी कंपनीमार्फत ३० कोटी रुपये देता आले.

रुग्णांना अगदी गरजेच्या वेळी किंवा १५ मिनिटांत उपचारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, हे मी माझे कर्तव्य समजते. कंपनी सध्या पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळूरमधील रुग्णांना अशा सेवा देते. नवनवीन क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही वैद्यकीय क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, आता एमबीबीएस होऊन प्रॅक्‍टिस करणे हा एकच पर्याय नाही, तर अशा इतरही अनेक संधी या क्षेत्रात आहेत. तुम्ही फक्त मागे फिरू नका. तुम्ही करत असलेल्या कामामध्येच थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला अनेक संधी दिसतील. 
(शब्दांकन - गौरव मुठे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Woman Sonia Basu maitrin supplement sakal pune today