बांधकाम क्षेत्रातील आश्‍वासक चेहरा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

बिझनेस वुमन -  दर्शना परमार
‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला म्हणत महिला विभागाची स्थापना करायलाच आक्षेप असणाऱ्या दर्शना यांना त्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने त्याची गरज, भविष्यातील संधीची जाणीव झाली. 

मुळातच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या बांधकाम क्षेत्रात व्यावसायिक म्हणूनच महिलांची संख्या कमी असताना महिलांना गवंडी बनविण्याचे प्रशिक्षण असो किंवा मटेरिअल सप्लायसारख्या विविध विभागांमध्ये कार्यरत करण्याचे मोठे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले आहे. याविषयी बोलताना, पुण्यासारख्या शहरातच आज १०० पेक्षा जास्त महिलांनी आपल्या व्यवसायाला सुरवात केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. बांधकाम क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी देशभरातील विविध राज्ये आणि विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. याशिवाय भारत सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रोत्साहन देताना बांधकाम व्यावसायिकांनी काय केले पाहिजे, याची क्रेडाईअंतर्गत रूपरेषा ठरविणाऱ्या समितीच्या प्रमुख म्हणून देखील त्या महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे स्वतःचा व्यवसाय विस्तारत आणि कुटुंब सांभाळत. 

बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या दर्शना यांचा या क्षेत्रातील प्रवेश खूप अनपेक्षित होता. त्याला कारण म्हणजे त्यांची आयटी क्षेत्राची पार्श्‍वभूमी. पुण्यात पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन अमेरिकेतील मिनिसोटा येथून ‘सॉफ्टवेअर सायन्स’मध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केले. त्यानंतर, झेन्सॉर टेक्‍नॉलॉजीस, आयबीएम सारख्या कंपन्यात अमेरिका, लंडनसारख्या ठिकाणी उच्च पदावर त्या कार्यरत होत्या. आयटी क्षेत्रात १२ वर्षे घालविल्यानंतर स्वतःची ‘आयटी/बीपीओ’ कंपनी सुरू करण्याचा विचार करून त्या भारतात परतल्या. दरम्यानच्या काळात वडिलांना व्यवसायात मदत म्हणून बांधकाम क्षेत्रात रस घेतल्यानंतर एक मोठा प्रोजेक्‍ट चालून आला आणि याच संधीचे सोने करायचे, असे ठरवून त्यांनी पूर्णपणे स्वतःला या क्षेत्रात झोकून दिले. 

बांधकाम क्षेत्र म्हणजे फक्त दगड आणि विटांपुरतेच मर्यादित नसून लोकांना एकमेकांना जोडण्याचा, एक सुखकारक जीवन जगण्यासाठी सुंदर घराची निर्मिती करून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा मार्ग असल्याचे दर्शना यांचे तत्त्वज्ञान आहे. मात्र या क्षेत्रातील सुरवातीचा काळ खूप कठीण गेल्याचे त्या सांगतात. स्वतःवरचा विश्‍वास आणि वडिलांचा पाठिंबा यामुळे या क्षेत्रात सहज रुळलो गेल्याचे त्या सांगतात. मागील काही वर्षांमध्ये बांधकाम क्षेत्रात आलेली मरगळ सरकारच्या ‘सर्वांसाठी घर’ या योजनेच्या माध्यमातून दूर होईल, असा आशावाद त्या व्यक्त करतात. भारतात बांधकाम क्षेत्राच्या विकासाला आता कुठे सुरवात झाली असून अजून खूप मोठा टप्पा बाकी आहे हे त्या ज्या आत्मविश्वासाने सांगतात यावरून त्यांना या क्षेत्रात असलेल्या संधीचा अंदाज सहज लक्षात येतो. महिला आणि बांधकाम क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दर्शना स्वतःचा व्यवसायदेखील झपाट्याने वाढवीत आहेत. 
(शब्दांकन - प्रवीण कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Women Darshana Parmar maitrin supplement sakal pune today