डिझायनर फॅन्सच्या विश्‍वात... (व्हिडिओ)

प्रविण कुलकर्णी
बुधवार, 29 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

बिझनेस वुमन - प्राप्ती मोर, उद्योजिका
कलेला व्यवसायाची जोड देणारे अनेक आहेत. त्याचप्रमाणे व्यवसायात कला किती महत्त्वाची ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘द फॅन स्टुडिओ’.

पर्यावरणातील होत असलेल्या बदलांमुळे फक्त उन्हाळाच नाहीतर जवळ जवळ वर्षभर घर किंवा ऑफिसमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी ‘फॅन’ची गरज भासते. मात्र फक्त थंड किंवा खेळती हवा ठेवण्यापुरताच ‘फॅन’चा वापर मर्यादित न राहता घराच्या सुशोभीकरणात देखील त्याचा सहभाग असावा या हेतूने ‘द फॅन स्टुडिओ’ची सुरवात करण्यात आली. आकर्षक डिझाइन्स आणि हस्तकलेचा भरपूर वापर ही या फॅन्सची विशेष वैशिष्ट्ये आहेत. हे सुशोभीकरणाचे ‘वारे’ प्रत्येक घराघरांत पोचवण्याचा ध्यास घेऊन कंपनीच्या संचालिका प्राप्ती मोर कार्यरत आहेत. 

कॉमर्सचा अभ्यासक्रम पूर्ण करून वडिलांच्या आग्रहाखातर आणि एक वेगळे आव्हान म्हणून प्राप्ती या व्यवसायात आल्या. फॅनसारख्या इलेक्‍ट्रिक वस्तूवर हस्तकलेचा वापर करून एक ‘निश प्रॉडक्‍ट’ तयार करण्याच्या वडिलांच्या व्यावसायिक दृष्टीला गती देण्याचे काम प्राप्ती करत आहेत. या प्रकारचा प्रॉडक्‍ट १९९९मध्ये तयार करण्याचे श्रेय वडिलांना देताना प्राप्ती सांगतात, ‘‘त्या वेळी या प्रकारच्या प्रॉडक्‍टला ग्राहक शोधणे खूप जिकिरीचे होते. शिवाय कलाकुसर केलेली वस्तू असल्याने साहजिकच त्याची किंमत जास्त आहे. त्यामुळे विशिष्ट वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून जरी हा प्रॉडक्‍ट तयार केला गेला असला, तरी प्रत्यक्षात त्या वर्गापर्यंत पोचण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले. फॅन स्टुडिओच्या पहिल्या प्रॉडक्‍टला अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ‘ब्रेक’ दिल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने व्यवसायाला गती आली.’’ 

या व्यवसायाच्या माध्यमातून हस्तकलेसारखी कला जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे साधारणतः १०० कलाकारांना आणि कारागिरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्या सांगतात. मार्बल, चांदी किंवा उच्च दर्जाचे लाकूड या प्रकारच्या विविध साधनांचा वापर करून कारागीर त्यांच्या गुणांना वाव देऊन नवनवीन डिझाइन्स सादर करतात. वाराणसीमधून निर्मिती होत असलेले फॅन संपूर्ण देशभरात पोचवले जात आहेत. वडिलांच्या डिझाइन्स प्राप्ती यांचा भाऊ प्रत्यक्षात आणतो (मॅन्युफॅक्‍चरिंग) आणि ते प्रॉडक्‍ट ग्राहकांपर्यंत पोचविण्याचे काम प्राप्ती यांचे असते. याप्रकारे ‘फॅमिली बिझनेस’चे यशस्वी मॉडेल त्यांनी विकसित केले आहे.

भारतातील नागरिकांचे उत्पन्न झपाट्याने वाढत आहे. परिणामी स्वतःच्या घराबद्दलच्या संकल्पना देखील बदलत आहेत. तुलनेने महाग, पण उच्च दर्जाच्या वस्तूंची मागणी वाढत आहे. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात फक्त ‘क्‍लास’ वर्गाकडूनच मागणी असलेल्या फॅन्सना आता मध्यम वर्गाकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याने व्यवसायाचे भविष्य नक्कीच चांगले आहे. दुसरीकडे, चांगले कारागीर मिळविणेदेखील तेवढेच आव्हानात्मक असल्याचे प्राप्ती सांगतात. त्याचबरोबर, ई कॉमर्ससारख्या माध्यमांमुळे तुमची कला जगभर पोचू शकते आणि कलेला व्यवसायाची किंवा व्यवसायाला कलेची जोड दिल्यास नक्कीच चांगले भविष्य असल्याचे प्राप्ती यांना वाटते. 
(शब्दांकन - प्रवीण कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Women Prapti Mor maitrin supplement sakal pune today