डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस?

कोलकाता उच्च न्यायालयाने नुकतंच अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणं लैंगिक अत्याचार असल्याचं म्हटलं. तो चक्क गुन्हा ठरतो, असंही नमूद केलं...
Darling Darling
Darling Darlingsakal

कोलकाता उच्च न्यायालयाने नुकतंच अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणं लैंगिक अत्याचार असल्याचं म्हटलं. तो चक्क गुन्हा ठरतो, असंही नमूद केलं... आता ‘डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस...’ असं गाणं तरी म्हणावं का, असा प्रश्न निर्माण झालाय.

समस्त पुरुषवर्गाला वैधानिक इशारा : नशापाणी करून अथवा न करून कुठल्याही इसमाने कुठल्याही वयाच्या अनोळखी महिलेस ‘डार्लिंग’ असे संबोधल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरील वर्तन सद्‌अभिरुचीला सोडून असल्याचे कारणाने भा. दं. वि. कलम ३५४ / अ (३) आणि कलम ५०९ अन्वये किमान तीन महिने सक्षम कारावास तसेच रुपये पाचशेपर्यंत दंड अथवा दोन्हीही अशी कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

सभ्य गृहस्थहो, आता तुम्ही म्हणाल, भले! अनोळखी महिलेला डार्लिंग कोण म्हणेल? इथे ओळखीच्या महिलेस असलं काही म्हणण्याची चोरी! फेब्रुवारीत ‘व्हॅलेंटाईन डे’ला एका बिचाऱ्या नवऱ्यानं आपल्या स्वत:च्या बायकोला हळूचकन ‘डार्लिंग’ म्हटलं तर बायकोनं ‘काय डोकंबिकं फिरलंय का?’ असे भावविभोर उद्‍गार काढून त्यास दचकवलंनीत!

आपल्या बायकोला अथवा मैत्रिणीला (अहह..! ही प्रजाती कुठं असते, याची प्रस्तुत लेखकाला कल्पना नाही.) स्त्रियांस तोंडावर डार्लिंग म्हणणारे नरपुंगव वेगळे असतात. तेथे पाहिजे जातीचे, हे येरागबाळाचे काम नोहे!! त्याला वाघाचं काळीज लागतं. खरं तर हेही चुकलंच. वाघाचीही अशी बिशाद नाही. कारण थोड्या रुमानी मूडमधल्या वाघाला वाघिणीनं गुरकावून दूर ढकलल्याचं आम्ही ‘ॲनिमल प्लॅनेट’वर स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे.

वाघासारखा वाघ शेपूट पायात दाबून दूर गेला. वाघाची ही अवस्था तर मर्त्य माणसांचं काय? अतएव, स्त्रीच्या मनाविरुद्ध तिला डार्लिंग म्हणणं ही डेंजरस गोष्ट आहे. ती कोणीही आपापल्या रिस्कवरही करू नये. भलता उद्योग अंगलट येऊ शकतो. बोल बोल म्हणता पायताणाचा तळवा बघण्याची वेळ गुदरते.

एक वेळ कुणी मोटारसायकल एका चाकावर चालवून अथवा उडवून दाखवावी. (संदर्भ : जाहिराती) किंवा कड्यावरून स्वत:ला झोकून देत विमानातील शीतपेयाची बाटली हवेतल्या हवेत हस्तगत करून ‘डर के आगे जीत है’ असे ऐटीत सुनवावे. (संदर्भ : पुन्हा जाहिरातीच!) हे स्टंट सहज शक्य आहेत; पण अपरिचित स्त्रीस डार्लिंग? अगं बया बया बया!! असला नसता हुंबपणा कोण करील? पण सभ्य गृहस्थहो, काही महाभाग असले उद्योगही करतात.

शेक्सपीअरसाहेबाने म्हणून ठेवलं आहे - ‘व्हेअर एंजल्स फीअर टू ट्रीड, फूल्स रश इन..!’ जिथं देवदूत जायला कचरतात, तिथं मूर्ख बेधडक घुसतात. हे घ्या उदाहरण : श्रीमान जानकीराम नामक एका गृहस्थानं दूरस्थ अंदमान बेटावर एका महिला पोलिसास ‘क्या डार्लिंग, चालान काटने आई हो क्या?’ असं धुंद अवस्थेत सलगीनं विचारलं.

महिला पोलिसानं त्यास ‘आता माझी सटकली’ हे सोदाहरण दाखवून देत सरळ कॉलरला धरून पोलिस ठाण्यात नेलं. केस दर्ज झाली आणि अंदमानच्या पोर्टब्लेअर खंडपीठानं त्यांस दोषी करार केल्यामुळे जानकीराम गृहस्थ दारू उतरलेल्या अवस्थेत गजाआड की हो जाहले! त्यांनी प्रकरण हायकोडतात नेलं; पण छे, हायकोर्टाचे न्यायमूर्ती जय सेनगुप्ता यांनी त्यांना उलटंच ताणलं.

सदरील प्रकार घडला तेव्हा आपले अशील मद्यधुंद अवस्थेत होते याचा काहीही पुरावा नाही, असा युक्तिवाद जानकीराम यांच्या वकिलांनी (शुद्धीत) केला. त्यामुळे न्यायमूर्ती आणखीनच चिडले. ‘मग तर हा अधिकच गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो’, असा शेरा मारून त्यांनी ‘अनोळखी स्त्रीस कामुक पद्धतीने संबोधणं ही बाब तिच्या स्वाभिमानाची हेळसांड तर आहेच; पण ती लैंगिक छळणुकीच्या अंतर्गतही मोडते, असं न्यायमूर्तींनी ठणकावलं. हा प्रकार घडला २०१७ साली आणि निकाल लागला गेल्या आठवड्यात!

दरम्यान, सदरहू जानकीराम गृहस्थ हे महिनाभर ‘अंदर’ झाले होते. त्या काळात त्यांना उपरती झाल्याचं दयाळू न्यायमूर्तींच्या लक्षात आल्यानं त्यांनी उर्वरित शिक्षा माफ केली हा भाग वेगळा; पण खुद्द जानकीराम यांनी गेल्या गटारी अमावस्येच्या मुहूर्तावर ताक पिऊन ‘मी दारू सोडली, सोडली, सोडली’ असं जाहीर केलं असून स्वपत्नीसदेखील ते आदरार्थी संबोधू लागले आहेत, असं समजतं. खरं-खोटं (जानकी)राम जाणे.

सभ्य गृहस्थहो, सांप्रतकाळी ‘डार्लिंग’, ‘स्वीटहार्ट’, ‘हनी’, ‘शुगर’, ‘बेबी’ अशी बरीच बरीच संबोधनं बोकाळली आहेत. हे सगळे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामचे परिणाम बरं! गेल्या पंधरा-वीस वर्षांत एतद्देशीयांमध्ये इंग्रजी भाषेचं काय वाट्टेल ते झालं असेल; पण हा नवा शब्दसंग्रह मात्र आपल्या देशी तरुण-तरुणींच्या चांगलाच ओळखीचा झाला, तोंडवळणी पडला.

पूर्वीच्या काळी इंग्रजी चित्रपटांमधून असली शिकवणी मिळत असे. अगदीच फुटकळ प्रमाणात हिंदी चित्रपटांतून; पण आपल्या प्रियतमेला डार्लिंग म्हणणं हे भलतंच फ्याशनेबल आणि फॉर्वर्डपणाचं लक्षण आहे, हे भिनलं होतं. हा ‘दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तडपाओगे, मैं आग दिल में लगा दूंगा वो के पल में पिघल जाओगे’

छापाचा आत्मविश्वास या हिंदी चित्रपटांच्या नायकांनीच दिला असावा.

हिंदी गाण्यांमध्येही डार्लिंग अनेकदा डोकावून जातो. ‘डाऽऽर्लिंग आखों से आंखे चार करने दो...’ असं काहीतरी गाणं विशाल भारद्वाजच्या ‘सात खून माफ’मध्ये होतं. उषा उत्थुपनं ते इतकं जोरकस म्हटलंय की ‘डाऽऽर्लिंग’ अशी त्यातली हाक ऐकून एखादा खुर्चीतल्या खुर्चीत दचकायचा! मराठीतही डार्लिंगनं एकेकाळी कहर केला होता. सत्तरीचं दशक असेल बहुधा.

जेजुरीच्या सुप्रसिद्ध लावणी कलावती रोशनबाई सातारकरांनी ‘डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस, भलताच बाई येडा दिसतोस, डा... डा... डार्लिंग’ अशी फुल्ल रॉक लावणी पेश केली होती. विश्वनाथ मोरे यांचं संगीत होतं. या गाण्यानं अनेक विवाह सोहळे रोशन केले. बॅण्डवर हे गाणं वाजलं नाही, असं कधी होतच नसे. अजूनही कुठं कुठं वाजत असेल. बाकी रोशनबाईंच्या लावण्या हा प्रकारच भन्नाट होता. त्यांची ‘येऊ कशी कशी मी नांदायला...’ ही लावणी तर सदाबहार आहे.

डार्लिंगचं मूळ प्राचीन इंग्रजी भाषेत सापडतं. त्याचं मूळ स्वरूप Deorling असं काहीतरी आहे. ते ‘डिअर’ या सर्वभाषिक संबोधनाच्या जवळ जाणारं. डार्लिंग हे त्याचंच एक रूप आहे. जरा अधिक प्रेमाचं. ‘डिअर’ आताशा घासून घासून गुळगुळीत झाला आहे. त्याचा खरा अर्थ लोपला आणि पत्र किंवा ई-मेलच्या मायन्यापुरता उरला. या मायन्यानिशी तर हल्ली बँका हप्ता बुडवल्याचं स्मरणपत्रही पाठवतात. डार्लिंग नाही म्हणत! डार्लिंगचा एक फुलफॉर्म इंग्रजीत एकेकाळी फार लोकप्रिय होता. - ‘Dear Always Remember Love Is Not Game!’ असो. हे विषयांतर झालं...

तेव्हा सभ्य गृहस्थहो, मित्र-मैत्रिणींनी किंवा सहकाऱ्यांनी सहज एकमेकांना गमतीनं, प्रेमानं ‘डार्लिंग’ असं काही म्हटलं तर समजून घेण्याजोगं आहे; पण डार्लिंग इज टू ओल्ड नाऊ. आता त्याची जागा स्वीटहार्ट, हनी, शुगर आदी अधिक गोड पदार्थांनी घेतली आहे. डार्लिंग शब्द वापरल्यास ब्लडप्रेशर वाढू शकतं; पण हे मधा-साखरेचे शब्द खाणाऱ्यास मदनबाधेपेक्षा मधुमेहाची बाधा होण्याची शक्यताच अधिक!

देशी प्रेमिक तर हल्ली इंग्रजीच्या नादाला लागत नाहीत बहुधा. पिल्लू, बाबू, शोना, असं काय काय म्हणतात च्यामारी! आता किती शब्दांना भारतीय दंडविधानातली कलमं लावणार? बाकी अनोळखी तरुणीस नेमकं काय म्हणावं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे. खरंच काय म्हणावं? अहो, शुक शुक..., एक्सक्युज मी, मॅम, हलोऽऽ, ताई, माई, आक्का, काकू, आंटी... नेमकं काय चालेल?

उपरोक्त हाकाऱ्यांनी कोणीही (पक्षी : महिलावर्ग) प्रतिसाद देत नाही, असा प्रस्तुत लेखकाचा तोकडा अनुभव सांगतो. एका दुकानात रांगेत पुढे उभ्या असलेल्या भगिनीस ‘आंटी’ असं संबोधल्यानंतर प्रस्तुत लेखकाला रांग मोडून निघून जावं लागलं होतं. आंटी म्हटल्यापेक्षा डार्लिंग म्हटलं असतं तर रांग सोडावी लागली नसती, असं मनाला तेव्हा चाटून गेलं. काहीही म्हणावं; पण डार्लिंग म्हणू नये. कुणालाच म्हणू नये. जानकीराम गृहस्थानं थेट महिला पोलिसाशीच पंगा घेतला. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या न्यायानं आपण वागावं.

तात्पर्य : अनोळखी स्त्री दिसल्यास मान खाली घालून निमूट निघून जावं आणि ओळखीची स्त्री दिसल्यास फूटपाथ बदलावा, या नेमस्त जीवनातच सभ्यतेचं सार आहे. क्यूं डार्लिंग, सही है ना?

pravintokekar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com