पूर्वेकडचे नंदनवन ‘कंबोडिया’

कंबोडिया म्हणजे भारतीय संस्कृतीशी पौराणिक नाळ जोडून असलेला देश. जगातील सर्वात पुरातन हिंदू मंदिर समूह तिथे आपल्याला पाहता येतो.
Cambodia mythological connection with Indian culture
Cambodia mythological connection with Indian cultureSakal

- विशाखा बाग

कंबोडिया म्हणजे भारतीय संस्कृतीशी पौराणिक नाळ जोडून असलेला देश. जगातील सर्वात पुरातन हिंदू मंदिर समूह तिथे आपल्याला पाहता येतो. शहरात जागोजागी तुम्हाला मंदिरे बघायला मिळतात. इथली पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी मंदिरे अन् पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.

पूर्वेकडचे देश भारतीयांसाठी नवीन नाहीत. जवळच असलेले थायलंड, सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियासह आता व्हिएतनाम अन् कंबोडियामध्येही अनेक भारतीय पर्यटक दिसायला लागले आहेत. ऑफिसच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी या देशांना अनेकदा भेट दिली आहे.

बौद्ध संस्कृतीशी असलेल्या साधर्म्यामुळे या देशांतील पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी मंदिरे अन् पर्यटन स्थळे भारतीयांना आकर्षित करतात. त्याचबरोबर हे सर्वच देश लहान असल्यामुळेही त्यांना उत्तम समुद्रकिनारे लाभले आहेत.

ते सर्व किनारे सुंदर आणि स्वच्छ राखण्यात आले आहेत. अशा सर्वच देशांची बहुतांश प्रमाणात अर्थव्यवस्था पर्यटकांवरच अवलंबून आहे आणि त्यामुळे त्यांना पूर्वेकडचे नंदनवन असेसुद्धा संबोधले जाते.

कंबोडिया हा असाच एक भारतीय संस्कृतीशी पौराणिक नाळ जोडून असलेला देश. जानेवारीत कंबोडियामध्ये जाण्याची संधी चालून आली आणि जगातील सर्वात पुरातन असा हिंदू मंदिर समूह बघण्याचा योग जुळून आला.

हजारो वर्षांपासून क्ख्मेर राजघराण्याची सत्ता असलेला हा देश थायलंडच्या बाजूला मॅकॉग नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसलेला आहे. अजूनही या देशाची बोलीभाषा आणि लिहिण्याची लिपीसुद्धा क्ख्मेर आहे.

पौराणिक काळात हजारो वर्षांपूर्वी भारतवर्षातून दक्षिणेच्या बाजूने गेलेले कंबू स्वयंभू या ऋषींनी तेव्हा कंबोज या राजघराण्याची आणि राज्याची स्थापना केली. वेदांमध्ये आणि अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेला कंबूज देश म्हणजेच आताचा कंबोडिया.

अंगकोर वाट हा मंदिर समूह सीॲम रीप या कंबोडियाच्या शहराजवळ आहे. सीॲम रीप हे कंबोडियामधले क्रमांक दोनचे मोठे शहर आहे. सीॲम रीप या नदीजवळ ते वसलेले असल्यामुळे त्याला हे नाव पडले.

शहरात जागोजागी तुम्हाला अनेक ठिकाणी मंदिरे बघायला मिळतात. शहरातील ५० टक्के लोकसंख्या रोजगारासाठी पर्यटन व्यवस्थेवर अवलंबून आहे. २००४ पासून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वाहतूक मुख्यतः हे शहर, अंगकोर वाट हा मंदिर समूह आणि तानले सॅप हा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव बघण्यासाठी सुरू झालेली आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्याचबरोबर युनेस्को जागतिक वारसा अन् पर्यटन स्थळांच्या यादीत या मंदिर समूहाचे नाव आहे. क्ख्मेर राजघराण्याच्या दुसऱ्या सूर्यवर्मन राजाने मुख्यतः विष्णूसाठी म्हणून ही मंदिरे बांधायला घेतली.

१६२ हेक्टरमध्ये पसरलेला या मंदिर समूहामध्ये पाच मुख्य मंदिर आणि गॅलरीवजा लांबच लांब पसरलेली मंदिरे आहे. देवांचे निवासस्थान असलेला मेरू पर्वत आणि मुख्यतः विष्णूचे निवासस्थान म्हणून या मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली होती.

मेरू पर्वताशी साधर्म्य साधण्यासाठी बांधलेले पाचही मंदिरांचे कळस उठून दिसतात. लांबच लांब पसरलेल्या गॅलरीसारख्या मंदिरांत मुख्यतः पौराणिक हिंदू धर्मातील विविध कथा आणि महत्त्वाचे प्रसंग कोरलेले आहेत.

मंदिरांमधील गोपूर आणि गॅलरीमध्ये रामायण-महाभारतातील कथा, वेदांमधील वेगवेगळे ऋषी आणि देवांच्या मूर्तींचे कोरीव काम खूपच सुंदर अन् बघण्यासारखे आहे. सूर्यवर्मन राजाने जेव्हा हा मंदिर समूह बांधण्यासाठी घेतला तेव्हा या शहराचे नाव यशोधरपूर असे होते.

आताचे अंगकोर हे नाव नगर या शब्दाचा अपभ्रंश होत पडलेले आहे आणि वाट म्हणजे मंदिरांच्या आजूबाजूचा रिकामा परिसर किंवा जागा. तेव्हा या मंदिर समूहाला सूर्यवर्मन राजाने दिलेले नाव होते ‘परम विष्णू लोक’. कालांतराने काही शतकांनी हिंदूधर्मीय राजांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केले.

त्यानंतर प्रजेनेसुद्धा बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केले. यामुळेच हे मंदिर आता हिंदू आणि बौद्ध धर्मीय मंदिर म्हणून ओळखले जाते. पाचही सर्व मोठ्या मंदिरांमध्ये विष्णूच्या मूर्ती आणि शंकराच्या पिंडी अजूनही बघायला मिळतात.

इथे गेल्यानंतर मंदिर बघण्यासाठी साधारण दोन ते तीन तास लागतात; पण इतिहास समजून घेण्यासाठी ‘गाईड’ करणे अत्यावश्यक आहे. ही सर्व माहिती आपल्याला गाईड व्यवस्थितपणे सांगतात. विदेशी पर्यटकांना हिंदू आणि बौद्ध धर्माबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यामुळे बरेच विदेशी पर्यटक या ठिकाणी आलेले दिसतात.

मनसोक्त फोटो काढून आणि मंदिरांचा इतिहास समजून घेऊन आम्ही शहरातील म्युझियम आणि इतर मंदिरे बघण्यासाठी गेलो. या मंदिराजवळ असलेले अजून एक महत्त्वाचे पर्यटनाचे आकर्षण म्हणजे बलून राईड. जमिनीपासून साधारण बलूनने आठशे मीटर उंचीवर जाऊन आपण मंदिरांचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिर वरून बघू शकतो. कंबोडियाला गेल्यानंतर हा बलून राईडचा अनुभव घ्यायला विसरू नका.

मंदिर बघून आल्यानंतर संध्याकाळी आम्ही कंबोडियामधील पारंपरिक डान्स शो बघण्यासाठी गेलो. थायलंड, कंबोडिया या देशांमध्ये पारंपरिक नृत्य हे पौराणिक कथांवर आधारित असते. रामायण आणि महाभारतातील वेगवेगळ्या गोष्टी नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येतात.

हा डान्स शो बघत असतानाच कंबोडियामधील लोकल कुझीन म्हणजेच स्थानिक वेगवेगळे पदार्थ चाखायलासुद्धा मिळतात. या संपूर्ण कार्यक्रमाच्या तिकिटामध्ये रात्रीचे जेवण आणि पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम समाविष्ट असतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वेकडच्या देशांमधील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव ‘तोंनले सॅप’ बघण्यासाठी गेलो. शहरापासून जवळपास दीड तासावर हा तलाव आहे. या तलावातच फ्लोटिंग व्हिलेज म्हणजेच तरंगते गाव आहे.

तलावाच्या पाण्यावरच बांधलेल्या झोपड्या, त्यामध्ये सुरू असलेले स्थानिकांचे मासेमारीचे काम आणि इतर स्थानिक काम, येथील राहण्याची आणि जगण्याची पद्धत हे सर्व आपल्याला बघायला मिळते. कंबोडियामध्ये अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गरिबी दिसते. फ्लोटिंग व्हिलेजमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन हे नक्कीच खडतर होते.

हे लोक इथे वर्षानुवर्षे कसे राहत असतील, हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडल्याशिवाय राहत नाही. घरांबरोबरच या तरंगत्या गावात शाळा आणि दवाखानासुद्धा आहे; पण आता हळूहळू पुढची पिढी या गावांमधून बाहेर बघण्याचे स्वप्न बघत आहे आणि त्यासाठी कष्टही करत आहे.

कंबोडियन करन्सी म्हणजे रियालची किंमत ही आपल्या रुपयापेक्षा कमी आहे. म्हणजेच एका रुपयामध्ये जवळपास ४८ रियाल आपल्याला वापरायला मिळतात आणि याचमुळे नाईट मार्केटमध्ये अन् लोकल मार्केटमध्ये पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. अनेक पर्यटक इथून कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत स्वस्तामध्ये खरेदी करतात.

पर्यटकांसाठी कंबोडियामधले अजून एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे विविध प्रकारचे स्पा आणि मसाज सेंटर. दिवसभर फिरल्यानंतर स्थानिक कंबोडियन मसाज नक्कीच करायला हवा. अनेक भारतीय वर्षानुवर्षे इथे स्थायिक झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थ अन् रेस्टॉरंटसुद्धा मुबलक प्रमाणात इथे आहेत. भारतीय पर्यटकांसाठी पटकन व्हिसा मिळण्याचे आणि त्याचबरोबर किफायतशीररीत्या फिरण्याचे ठिकाण म्हणून कंबोडिया नावारूपाला येत आहे.

gauribag7@gmail.com (लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com