एकतरी सुशांत आपल्याला वाचवता येईल का?

प्रमोद काळबांडे
Friday, 19 June 2020

अंजनगाव बारी हे सात हजार लोकवस्तीचे गाव. "नाळ' सिनेमातील चिमुकला हिरो चैत्या याच गावचा. या गावात अनेक लोक सुशांतच्या मार्गाने गेले आहेत. किती याची मात्र काहीच मोजदाद नाही. मी प्रत्यक्ष अशा 13 घरांना भेटी दिल्या आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडच नव्हे, तर अख्खा देश हादरला आहे. ते स्वाभाविकच आहे. बॉलीवूडशी आपली नाळ जुळली आहे. त्यातच सुशांत उत्तम अभिनेता. त्याच्या अभिनयामुळे त्याने आपल्या हृदयात स्थान पटकावले होते. धक्का तर बसणारच. सुशातसिंहच्या निमित्ताने बॉलीवूडचे अनेक किस्से आणि कथा पुढे येत आहेत. परंतु, सुशांतच्या निमित्ताने मी अंजनगाव बारीची कथा सांगणार आहे. इथेही अनेक "सुशांत' आहेत ज्यांनी मृत्यूला जवळ केले आहे.

अंजनगाव बारी हे सात हजार लोकवस्तीचे गाव. "नाळ' सिनेमातील चिमुकला हिरो चैत्या याच गावचा. या गावात अनेक लोक सुशांतच्या मार्गाने गेले आहेत. किती याची मात्र काहीच मोजदाद नाही. मी प्रत्यक्ष अशा 13 घरांना भेटी दिल्या आहेत. 14-15 वर्षांपूर्वी अख्ख्या अमरावतीला अंजनगाव बारी हेच गाव भाजीपाला पुरवायचे. पुढे स्थिती बदलली. इतर राज्यांतून अमरावतीत स्थायिक झालेल्या लोकांनी घाण पाण्यावर भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. तो भाजीपाला अमरावतीकरांना स्वस्तात मिळू लागला. त्यामुळे अंजनगाव बारीतून भाजीपाला हळूहळू बंद व्हायला लागला. आधी भाजीपाला विकला की, आठवड्याचा पैसा यायचा. अंजनगाव बारीच्या प्रत्येकच शेतकऱ्याच्या हाती खेळता पैसा असायचा. त्यात त्यांच्या दैनंदिन गरजा भागायच्या. भाजीपाला विक्री जवळपास थांबली नि मग इथून एकूणच जीवनचक्र बदलले. सुखी असलेल्या या गावात दुःचक्र सुरू झाले. काळ्या मातीत फाळ खुपूसून तिच्या पोटातून सोनं काढण्याची धमक असलेले अनेक बळीपुत्र मग सुशांतसिंह ज्या वाटेने गेला, त्याच वाटेने जाऊ लागले.

सुशांतने वयाची चौतीशी गाठली होती. दिनेश विलासराव कदम केवळ 25 वर्षांचा होता. वडिलांना शेतीत मदत करायचा. तेवढ्याने भागत नाही म्हणून मग "ड्रायव्हर'की करायला लागला. कधी पॅसेंजर जीप चालवायचा, तर कधी ट्रॅक्‍टर. त्याची वडिलोपार्जित दोन एकर शेती. 2018 च्या हंगामात त्यातील केवळ 25 टक्केच सोयाबीन हाती पडले. दिनेशने मग घात केला. त्याच्या आईला "वाटाणे भात करजो' म्हणून सांगून गेला आणि घरून गेला तो कायमचा. त्याने जीव दिला.

सुशांतने आत्महत्येसाठी असा खास मुहूर्त साधला नाही. परंतु, रूपाली अशोक माहेकर हिने भाऊबीजेचा मुहूर्त निवडला. बारावीनंतर "आयटीआय' झालेल्या रूपालीने 19 व्या वर्षी आत्महत्या केली. ""माह्या लक्षुमीच्या पोटातून ऑपरेशन करून गोळा काढला, तव्हा तिच्यानं काम होत नव्हतं. तव्हा रूपालीनं हिम्मत देल्ली. कॉलेज सोडून घरी राह्यली. वावरात आली. पोरगी हिताची होती. दिवाळीले ड्रेस देजो बाबा, एवढं बोलली होती. लग्न झालेल्या वैशाली आणि मंगला या दोन पोरीही येणार होत्या. कपडे कुणाकुणाला घेऊ, याची चिंता मले सतावत होती. रूपालीनं मात्र तिची सुटका करून घेतली.'' तिच्या वडिलाने आपबीती सांगितली.

प्रवीण देवराव मेहेर सुशांतपेक्षा एक वर्षाने मोठा होता. प्रवीणच्या वडिलांची तीन एकर शेती. अर्थातच ती परवडणारी नव्हती. त्यामुळे शेती करता-करता त्याने सायकल रिपेअरिंगचे दुकानही टाकले. गावातील सामाजिक कार्यातही तो सक्रिय राहायचा. "त्याने पुढाकार घेतला म्हणून आमच्या माळीपुऱ्यात ग्रामपंचायतीने रोड बांधला', असे आजूबाजूचे लोक सांगतात. अशा हिंमतबाज प्रवीणने जवळच्या भिवापूर तलावात उडी मारली.

पुष्पा प्रभाकरराव टेटू हिनेही राहत्या घरी सुशांतसारखीच गळफास लावून आत्महत्या केली. तीही अविवाहित होती. वडील विहिरींचे खोदकाम करायला जायचे, तर आई हातमजुरी करायची. भाऊ दिलीप ट्रॅक्‍टर चालवायचा. निरंजन टाइल्सच्या कंपनीत काम करायचा. एक दिवस दुपारी कुणीच नसताना पुष्पाने दार लावून घेतले. दुपारी तीन वाजता दिलीप घरी आला. त्याने दाराचा कोंडा तोडला तेव्हा पुष्पा लटकलेली दिसली. तिच्या जाण्यानंतर वडील प्रभाकरराव यांनाही व्याधीनं घेरलं. त्यातच ते गेले.

पुष्पा, रूपाली, दिनेश, प्रवीण यांच्या माध्यमातून मला अंजनगाव बारी येथे सुशांतची अनेक रूपे बघायला मिळाली. परंतु, ही रूपे सुशांतएवढी "ग्लॅमरस' नव्हती. म्हणूनच ती "पोलिस डायरी'तील मृत्यूच्या कॉलमपर्यंतच मर्यादित राहिली. यवतमाळ जिल्ह्यातील तिरझडा आणि दाभडी या गावांमध्येही अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मी भेटलो. अडीच हजार लोकसंख्येच्या तिरझडा गावात तर 40 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अंजनगाव बारी येथे मी आत्महत्याग्रस्त कुटंबाचा शोध घ्यायला गेलो तेव्हा प्रत्येकच मोहल्ल्यात मला आत्महत्या झालेली दिसली. एका कुटुंबाची व्यथा समजून बाहेर पडताच दुसरे आत्महत्याग्रस्त कुटुंब दत्त म्हणून उभे असायचे. सुभाष शंकर शेवतकर, महादेव तुकाराम कुंभलकर, रोशन विलास कुंभलकर, श्रीकृष्ण मारोतराव साखरवाडे, विशाल जानराव पवार, छाया सचिन भांडे, ज्ञानेश्वर बापूराव कुंभलकर, शंकर रामकृष्ण लाड, विजय महादेव पवार, सतीश रामकृष्ण साकुरे यांनीही सुशांतप्रमाणेच आत्महत्येचा पर्याच निवडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can we save any more Sushant?