'मानसशास्त्र' करिअरचा उत्तम पर्याय; वाचा कशी मिळेल संधी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 June 2019

  • मानसशास्त्रात करिअरचे विविध पर्याय 
  • पदव्युत्तर पदवीसाठी मानसशास्त्र विषयातील बी. ए. पदवी आवश्‍यक
  • खेळ, उद्योग, कुटुंब न्यायालये, तुरुंग याठिकाणी समुपदेशकाची आवश्‍यकता

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मानसशास्त्र विषयामध्ये पदवी मिळविण्याचा पर्याय आहे. मानसशास्त्र हे व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशन मानसशास्त्र, चिकित्सालयीन मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र आणि बाल मानसशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. यात सामान्य व्यक्तींचा अभ्यास करून त्यांच्या विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. चिकित्सा मानसशास्त्र हे डिप्रेशन, स्क्रिझोफ्रेनिया, फोबिया, चिंता विकृती यांसारख्या वर्तनावर काम करते. 

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठानुसार प्रवेश पात्रता, प्रवेश प्रक्रिया बदलते. सर्वसाधारणपणे मानसशास्त्रामध्ये पदवीसाठी कोणत्याही शाखेची बारावी ही पात्रता असते. पदव्युत्तर पदवीसाठी मानसशास्त्र विषयातील बी. ए. पदवी आवश्‍यक असते. 

मानसशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर तसेच पीएच.डी.चे शिक्षण विविध विद्यापीठांमार्फत देण्यात येते. मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर बालसुधारगृह, अनाथाश्रम, शाळा, दवाखाने, वृद्धाश्रम, पुनर्वसन केंद्र, मनोरुग्णालय अशा ठिकाणी काम करता येते. याशिवाय योग्य त्या अटी पूर्ण करून स्वत:चे समुपदेशन केंद्र सुरू करता येते. मानसशास्त्र विषयातील शिक्षण व्यवसायाभिमुख आणि मोठी मागणी असणारे आहे. 

मानसिक गुणमापन विविध चाचण्यांद्वारे करण्याची क्षमता प्राप्त झाल्यामुळे बुद्धीगुणांक, अभिक्षमता, अध्ययन, अक्षमता, व्यक्तिमत्त्व अशा मापन आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा पर्याय निवडता येतो. मानसिक आरोग्याचे महत्त्व, संवर्धन आणि वाढीचे मार्ग प्रशिक्षण शिबिराद्वारे घेता येतात. खेळ, उद्योग, कुटुंब न्यायालये, तुरुंग याठिकाणी समुपदेशकाची आवश्‍यकता असते. एम. ए. मानसशास्त्रातील पदवी आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून देते. 

सामाजिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्राची आवड असणाऱ्यांसाठी मानसशास्त्रामधील करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. मानसशास्त्र विषयांमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी किंवा एखादा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टिफिकेट) पूर्ण केल्यास सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या अनेक वाटा खुल्या होऊ शकतात. 
- डॉ. रमेश पठारे, सहयोगी प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ 

मानसशास्त्रातील अभ्यासक्रम -
- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (एम. ए.) : समुपदेशन, क्‍लिनिकल, औद्योगिक मानसशास्त्र यातील अभ्यासक्रमांचा समावेश 
- पदविका अभ्यासक्रम : समुपदेशन, बाल मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र आदीचा अभ्यास करणे शक्‍य. 
- शैक्षणिक संस्था : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, विश्‍वकर्मा खासगी विद्यापीठ, स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, सिंबायोसिस महाविद्यालय आणि अन्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Career opportunities in psychology