प्रश्नांचे मोहोळ उठविणारी ‘ती’ची होरपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात बलात्कार आणि खुनाच्या घटना वाढत आहेत.

प्रश्नांचे मोहोळ उठविणारी ‘ती’ची होरपळ

राज्यात बलात्कार आणि खुनाच्या घटना वाढत आहेत. या घटना घडल्यानंतर त्यावर चर्चा होते. पण ते घडण्याआधीही स्त्रीची होरपळ सतत सुरू असते. समाज म्हणून आपण मुळापासून यावर काही उपाय शोधणार की नाही?

- छाया काविरे

परवा रात्री गावाहून फोन आला : 'गावाकडच्या एका मावशीवर सामूहिक बलात्कार झाला असून, त्यानंतर तिचा खून केला गेला आहे.' सुन्न होण्याचाही अवसर मिळू न देणारी ही घटना. फोनवरची माहिती मी जसजशी ऐकत गेले, तसतसं मन अस्वस्थ होत गेलं.

तिचं लग्न ठरलं तेव्हा मी इयत्ता चौथीत असेन. तिला लग्न करायचं नव्हतं; पण योग्य वयात लग्न झालं नाही तर अनेक महिलांप्रमाणे तिच्यावरही 'चारित्र्य’ नावाचं लेबल समाजाकडून लावलं जाणार म्हणून घरच्यांनी - तिची इच्छा नसताना - तिचं लग्न ठरवलं. लहानपणी तिच्या लग्नाचे फोटो बघताना मी तिला नेहमी एक प्रश्न विचारत असे : 'तू इतकी उदास का होतीस तुझ्या लग्नात? तुला तर नवीन कपडे, बटणवाला फोन आणि अजून एक घर मिळणार होतं ना?" तेव्हा ती वस्तीतल्या इतर महिलांप्रमाणेच मला म्हणायची : "तुझं लग्न झालं की तुला कळेल."

तिचा नवरा दारू पिऊन तिला रोज मारहाण करायचा. पहिल्या दोन्ही मुली झाल्यामुळे सासरच्यांकडून तिला जाच सुरू झाला. त्रासाला वैतागून ती माहेरी राहायला आली. तेथील बायका तिला विचारत असत : "तू सासरी का जात नाहीस?" 'नवऱ्याला सोडून राहते म्हणून आपल्यासाठी ती उपभोगाचं साधन आहे,' असा समज करून घेऊन तिच्याकडं वाईट नजरेनं पाहणारी पुरुष जमातही आसपास होतीच. वयोवृद्ध महिला तिला सांगत : "माणूसनि जात अशीच रास." (पुरुषाची जात ही अशीच असते).

"दोन पोरींचा सांभाळ तू एकटी कशी काय करणार?' 'तू नवऱ्यासोबत राहत नाहीस...मग तुझ्या पोरींशी पुढं लग्न कोण करणार ? असे प्रश्न तिला विचारले जात. वैतागून ती सासरी परतली; पण तिथे सगळी परिस्थिती आधीसारखी होती. काही महिन्यांनी ती माहेरी परतली तेव्हा तिच्या गर्भात तिसरं बाळ आकार घेत होतं. पण नवऱ्यानं तिला मारहाण सुरू ठेवली होती. काळा-निळा पडलेला तिचा देह तिला झालेल्या मारहाणीच्या जुलमी रात्रींची कहाणी सांगत होता... तिन्ही पोरांना शिक्षण देता यावं म्हणून ती गल्लीतल्या बायकांबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्या वेचायला जायला लागली. गावातले गल्ली-बोळ, दवाखाना, स्मशानभूमी अशा परिसरातून ती पिशव्या गोळा करायची व तीन ते पाच रुपये किलो या दरानं पिशव्या विकायची आणि येणाऱ्या तुटपुंज्या पैशातून उदरनिर्वाह भागवायची. दोन वर्षांपूर्वी तिच्या भावाचं लग्न ठरलं. विवाहित बहीण माहेरी राहत असेल तर अशा घरात मुलगी द्यायला आपल्या समाजात मुलीचे आई-वडील कचरतात. भावाच्या लग्नात आपल्यामुळे अडथळा येत आहे हे ओळखून तिनं दुसरीकडं स्वतःचं एक छोटंसं घर उभारलं आणि तिचे वडील व तीन लेकरं यांच्यासह ती घरात राहू लागली.

सोमवारी नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत पाठवून ती खांद्यावर पोतं टाकून पिशव्या वेचायच्या कामावर निघाली. मात्र, आज कामावर गेलेली आपली आई परत येणार नाही, याची पोरांना काय कल्पना? एरवी दुपारी काम आटोपून येणारी आई संध्याकाळचे सहा वाजून गेले तरीही घरी पोहोचलीच नाही, म्हणून पोरं रडू लागली. नातेवाइकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. गावाच्या वेशीवर असलेल्या पाण्याच्या पाटाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचं कळलं. तो मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत काटेरी झाडा-झुडपांमध्ये असल्याचंही समजलं. विजेच्या प्रवाहाच्या धक्क्यामुळे - करंटमुळे - तिच्या देहावर फोड आले होते. मृतदेहाची ओळख पटली... ती महिला म्हणजे माझी मावशी होती!

आमच्या सातपुड्याच्या भागात पुण्यातल्यासारखे कुणी 'बाबा आढाव' नाहीत आणि कागद-कचरा वेचणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी लढणारी त्यांची 'कागद-काच-पत्रा'सारखी कोणती संघटनाही नाही. तेव्हा, माहीत नाही, मावशीला खरंच न्याय मिळेल की नाही ते... की या महाराष्ट्रात आजवर घडून गेलेल्या बलात्काराच्या असंख्य घटनांचा आणि त्यातूनही तड न लागलेल्या किती तरी घटनांचाच एक भाग बनून जाईल मावशीबाबतचीही घटना? माहीत नाही...

तीला न्याय मिळेल?

मावशी, तुझा खून करणारे तर तुझे गुन्हेगार आहेतच; पण बदनामीच्या भीतीचं कारण पुढं करून हे प्रकरण दाबणारे-दडपणारेही तितकेच दोषी आहेत. मी तुझ्यासाठी कुठपर्यंत लढू शकेन मला माहीत नाही...पण माझ्याच्यानं होऊ शकणारे सगळे प्रयत्न मी करत राहीन... लहानपणी आई घरी नसतानाची गोष्ट. सायकलच्या चेनमध्ये माझं बोट अडकून ते रक्तबंबाळ झालं होतं. बोटातून वाहणारं रक्त थांबावं म्हणून माझ्या बोटावर तू रॉकेल ओतून रक्त थांबवलं होतंस...व रडणाऱ्या मला शांत केलं होतंस. ही प्रेमळ आठवण माझ्या मनात वाहतच राहील...सतत. आणि, ही वाहती आठवण थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही मी. ती आठवण वाहतीच राहायला हवीय मला...!

# # # # # ## # #

फक्त १३.७ टक्के प्रकरणांतच बलात्काराच्या आरोपींना शिक्षा

भारतात एका दिवसात बलात्काराची सरासरी ८७ प्रकरणं नोंदवली जातात. हा आकडा म्हणजे पोलीस-ठाण्यात ज्यांची नोंद झालेली असते अशाच केवळ घटना आहेत. मात्र, याशिवाय ग्रामीण भागात आदिवासी/बहुजन समाजातल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची किती तरी प्रकरणं पोलीस-ठाण्यापर्यंत जातच नाहीत! कारण काय? तर 'बदनामी होईल' ही संबंधित मुली-महिलांना, त्यांच्या नातलगांना वाटणारी भीती.

'नॅशनल क्राइम रेकाॅर्ड्स ब्यूरो'च्या अहवालानुसार,

- बलात्कार करून महिलांना मारून टाकण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वात जास्त.

- महिलांविषयीच्या महाराष्ट्रातील गुन्ह्यांपैकी ९४ टक्के खटले प्रलंबित.

- महाराष्ट्रात २०२१ मध्ये २४९६ बलात्काराच्या गुन्ह्यांत १३.७ टक्के प्रकरणांमध्येच आरोपींना शिक्षा.

- राज्यात रोज सहाहून जास्त महिलांवर बलात्कार.

अत्याचाराच्या रोज १०८ घटना

एनसीआरबीच्या अहवालानुसार, सन २०२१मध्ये महाराष्ट्रात महिलांच्या विरोधात दररोज १०८ गुन्हे घडले. या गुन्ह्यांची पोलीस-ठाण्यात नोंद झाली. राज्यात एकूण गुन्ह्यांत महिलांवरील गुन्ह्यांचं प्रमाण ६६ टक्के आहे. आरोपपत्र दाखल केलं जाण्याचं प्रमाण ८२ टक्के आहे. २०२१मध्ये भादंविच्या विविध कलमांतर्गत राज्यात महिलांविरुद्ध एकूण ३९ हजार ५२६ गुन्हे नोंदवण्यात आले. सन २०१८मध्ये ३५ हजार ४९७, २०१९मध्ये ३७ हजार १४४ आणि सन २०२० मध्ये ३१ हजार ९५४ प्रकरणं नोंदवण्यात आली.

महाराष्ट्रातलं 'खैरलांजी’, ‘कोपर्डी’, तसंच दिल्लीतलं 'निर्भया'अशा कित्येक प्रकरणांना न्याय मिळायला अनेक वर्षं जावी लागली. बलात्काऱ्यांच्या विरोधात तब्बल २० वर्षं लढा देणाऱ्या बिल्किस बानोचा शेवटी न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला. जून २०२०च्या शेवटच्या आठवड्यात रोहे तालुक्यात १४ वर्षांच्या मुलीवर गावातल्याच २२ वर्षांच्या तरुणानं बलात्कार केला व नंतर तिची हत्या केली. तिचा मृतदेह गावाबाहेरच्या टेकडीवर टाकून देण्यात आला होता.