Krishna Janmashtami : "गोविंदा' खूप काही शिकवून जातो...

celebration of Krishna Janmashtami and Importance of govinda
celebration of Krishna Janmashtami and Importance of govinda

गोकुळाष्टमी :
"गोविंदा' 
गोकुळाष्टमी म्हटले, की आठवते उंचच उंच बांधलेली दहीहंडी ! रंगीबेरंगी पताका, लोकांची अमाप गर्दी, दहीहंडीकडे उंचावलेल्या नजरा, चापल्य अंगी असणारे विविध क्रीडा मंडळांचे तरुण अन्‌ सळसळता सांघिक उत्साह ! बलदंड शरीरयष्टीचे पुढे सरसावतात, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात. भक्कम आधाराचा पाया बनतो. पुढचा ग्रुप सरसावतो. त्यांच्या गुडघ्यावरून पटकन खाद्यावर उभा राहतो. क्षणार्धात मजल्यावर मजले चढत जातात. चपळाईला वेग येतो. तरुणाईतला उत्साह वाढतो. प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडतो. बघता बघता मजले वाढत जातात. काही वेळा दहीहंडीसाठी "गोविंदा' हात मारायला अन्‌ मनोरा कोसळायला एकच वेळ येते. सारेच क्षणार्धात कौशल्याने उतरतात. पुन्हा मंडळाचा प्रयत्न सुरू होतो. नव्या दमाने अन्‌ दुप्पट उत्साहाने ! 

जीवनातही पदोपदी दहीहंडीचा खेळ सुरू असतो. फक्त मैदान वेगळे असते. प्रत्येक जण आपल्या ध्येयप्राप्तीसाठी (दहीहंडी) दुसऱ्याची प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मदत घेत असतो. तळागाळातले अनेक जण राबत असतात. भक्कम आधार देत असतात. आपणाला यश मिळावे म्हणून ते पायाचे दगड बनतात. त्यांच्या आधारावरच "गोविंदा' दहीहंडीपर्यंत पोचत असतो. यश संपादन करतो अन्‌ मग यशाचा जल्लोष सुरू होतो. कळसावर असणारे उतरतात अन्‌ यश ज्यांच्यामुळे मिळाले त्या पायाखालच्या मानकऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचतात. कळसाचा "पाया' अन्‌ पायाचा कळस ! गोकुळाष्टमीचा "गोविंदा' खूप काही शिकवून जातो. 

हल्ली स्वार्थीपणाच्या लाटेत हे स्वरूपच बदलून गेलेय. आपल्याला मिळालेले यश म्हणजे स्वतःचीच वैयक्तिक कामगिरी याच तोऱ्यात तो वावरतो! त्याला आधार देणाऱ्यांना तो विसरतो, तुच्छ समजतो. ज्यांच्यामुळे त्याला ही "उंची' प्राप्त झाली त्या पायालाच तो विसरतो! खांद्यांचा आधार नजरेआड करतो. गोपाळकाला सर्वांसह खायला विसरतो. एकटाच मेवा खायला लागतो. हल्ली असेच होते. 

कामाचे खांदेकरी बाजूलाच राहतात. पाठ थोपटून घ्यायला दुसरेच पुढे सरसावतात. आज सगळ्यांनाच कळसाचे मानकरी व्हायला आवडते. ताजमहालाचे वरचे संगमरवरी सौंदर्य सर्वांनाच वेडावते. मात्र, पायाखालचे दगड गाडलेलेच असतात. 

शिक्षण, व्यवसाय, राजकारण, शासकीय संस्था, समाजसेवा, कार्यालये, बॅंका या क्षेत्रांत काम करणारे अधिकारी आपण ज्यांच्यामुळे मोठे झालो आहोत त्यांनाच विसरतात. हे "गोविंदा' आपल्या सवंगड्यांना विसरून जातात. आई, वडील, मित्र, तळागाळाचे कार्यकर्ते, कनिष्ठ कर्मचारी यांचा त्यांना विसर पडतो. असे कित्येक "गोविंदा' स्वतःच्याच मोठेपणात रंगून जातात. यशाचा पतंग हवेत भिरभिरतो. मात्र, त्याची दोरी तुटायला वेळ लागत नाही. फोटोत त्यांची छबी झळकते. खरे मानकरी फोटोच्या आड लपून जातात. अशा गोविंदांची किंमत शून्य ठरते. त्यांची लायकी सर्वांनी जाणलेली असते. 
मिळालेल्या यशात सर्वांचा वाटा महत्त्वाचा आहे. शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या कष्टाचे ते फळ आहे. ज्यांच्यामुळे यश मिळालेय त्या सर्वांचीच पाठ थोपटणारा खरा "गोविंदा' असतो. आज अशाच गोविंदांची गरज आहे. गोपाळकाला पेंद्या, गोंद्यासह खाण्यातच मजा आहे. त्यातच खरा आनंद आहे, कर्तव्यपूर्तीचे समाधान आहे. विजयातही विनयशीलता आहे. एकजुटीतच प्रचंड सामर्थ्य आहे. पुढच्या दहीहंडीचे ध्येय आहे मग सारे आकाशही इथे ठेंगणे आहे. फक्त गरज आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या व यशात दुसऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या गोविंदांची!! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com