घरच्यांच्या पाठिंब्यामुळे ‘कमबॅक’ शक्‍य

Kavita-Lad
Kavita-Lad

कमबॅक मॉम - कविता लाड, अभिनेत्री
आमच्या क्षेत्रात मला नाटक दौऱ्यांनिमित्तानं बाहेर जावं लागतं. तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, सगळ्यांचं खाणं-पिणं व्यवस्थित आहे की नाही, मुलांचे डबे, हे सगळं मला पाहावं लागतं. घरी असताना मुलांना (ईशान आणि सनाया) शाळेत सोडणं किंवा त्यांना शाळेतून घरी आणणं, शाळेच्या मीटिंगला जाणं अशी त्यांची शाळेची कामं करते. आपलं काम सांभाळून हे करणं सोपं नाही. हे सगळं करताना तारेवरची कसरत होते, पण इतकंही कठीण नाही. कारण या गोष्टी करण्यासाठी एखादं-दुसरी सुटी तर प्रत्येक स्त्रीला मिळतेच. माझं काम संपल्यानंतर किंवा सुटी असल्यास मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवते, आम्ही बाहेर फिरायला जातो, चित्रपट आणि नाटक बघतो. मी मुलांसोबत असा वेळ घालवते. 

मला वाटतं कुठलीही स्त्री घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय काहीही करू शकत नाही. करिअर करणाऱ्या स्त्रियांना घरच्यांचा पूर्णपणे पाठिंबा असतो. त्यामुळंच ती घराबाहेर पाऊल टाकून काम करू शकते. अर्थातच. मला माझे सासू-सासरे, आई-बाबा, माझा नवरा या सगळ्यांचा पाठिंबा होताच. माझी आई माझ्या मुलांना सांभाळायची, सासू-सासरे माझ्या घरी येऊन राहायचे, मला वेळ नसल्यास नवरा मुलांचं लसीकरण करायला घेऊन जायचा. हे सगळं सामंजस्यानं झाल्या नाही, तर आपण शांतपणे काम करूच शकणार नाही. त्यामुळं घरच्यांचा पाठिंबा तेव्हाही होता आणि अजूनही आहे. म्हणूनच मी आताही तेवढंच चांगलं काम करू शकते. 

मी मुलांना फार कमी वेळा चित्रीकरणादरम्यान सेटवर घेऊन गेले आहे, कारण त्यांना तिकडे गेल्यावर आईबरोबर जास्त वेळ घालवायला मिळत नाही. त्यामुळं चित्रीकरणाच्या वेळी माझ्यासोबत येण्याचा हट्ट त्यांनी कधीही केला नाही. आता थोडे मोठे झाल्यानंतर ते काही नाटकाच्या प्रयोगाला येतात. त्यांना नाटक पाहायला खूप आवडतं. मी शाळेत गेल्यानंतर शिक्षक, मुलांचे कौतुक करतात तेव्हा फारच आनंद होतो. 

प्रेग्नंसीनंतर काही काळ मला एकाच प्रकारच्या भूमिका येऊ लागल्या. त्याचं कारण म्हणजे आपण आई झाल्यानंतर आपलं वयही दिसू लागतं. मला वहिनीच्या, आईच्या भूमिका ऑफर व्हायला लागल्या. प्रेग्नंसीनंतर मी स्वतःच्या शरिरयष्टीवर जास्त लक्ष देण्यास सुरवात केली. कारण काही स्त्रियांना त्यांचं वजन कमी करण्याची बरीच इच्छा असते, पण मुलांना सांभाळून त्यांना ते करता येत नाही. माझे सासरे डॉक्‍टर असल्यानं त्यांनी मला फार मदत केली. त्यांनी मला सांगितलं, ‘‘मुलाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत वजन कमी झालं नाही, तर ते त्यानंतर कधीही कमी होत नाही. त्यामुळं पहिल्या वाढदिवसापर्यंत तुझं वजन कमी झालंच पाहिजे.

त्यासाठी तुला व्यायामासाठी जो वेळ लागेल तो तू घे. मुलांना आम्ही सांभाळू, पण तू तुझं वजन आधी कमी कर.’’ माझ्यासाठी ते फारच प्रेरणादायी होतं. त्यानंतर मी एक वर्ष जिम केली. मला जिम अजिबात आवडत नाही, पण माझ्याकडं दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळं मला ते करावं लागलं. मी फार व्यायाम  करणाऱ्यांपैकी नाही. कधीतरी चालणं वगैरे एवढाच माझा व्यायाम असतो, पण मी जे करते ते मनापासून करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com