फिटनेससोबतच त्वचा, केसांचीही काळजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - श्रद्धा कपूर
मी आधीपासूनच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल हे खेळत असल्याने माझा फिटनेस चांगला होता. पण मी चित्रपटातून काम करायला सुरवात केल्यापासून फिटनेसवर अधिक भर द्यायला लागले. मी डाएट आणि वर्कआऊट या दोन्हीला तेवढेच महत्त्व देते. आठवड्यातून ४ ते ५ दिवस जसा वेळ मिळेल त्यानुसार जिमला जाते. मला नृत्य आवडते आणि नृत्याने माणूस सर्वाधिक फीट राहतो, यावर माझा विश्‍वास असल्याने नृत्यही व्यायामाचा एक भाग म्हणूनच करते. तसेच खेळ खेळणे हे देखील व्यायामाचा भाग असल्याने तुम्ही सतत खेळत राहिले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी योग्य झोपही महत्त्वाची आहे. यासाठी मी रोज आठ तास झोपतेच.

जेवणाच्या बाबतीत माझे असेच काही नियम आहेत. सकाळी नाश्‍ता खूप हलका घेते. यामध्ये पोहे आणि ग्लासभर दूध घेते. कधीतरी बदल म्हणून उपमा व फळांचा रस किंवा फळ घेते. दुपारच्या जेवणामध्ये ३ ते ४ चपात्यांसोबत डाळ व उकडलेल्या भाज्या खाते. रात्रीच्या जेवणाबाबत मी तो शक्‍य तेवढ्या लवकर घ्यायचा नियम पाळते. रात्रीचे जेवण रात्री ८च्या आधी झालेले असते. रात्रीचे जेवणही मी हलकेच घेते, यामध्ये पीनट बटरसोबत गव्हाच्या ब्रेडच्या २ स्लाइस आणि केशर घातलेले ग्लासभर दूध घेते. मी दिवसभर ३ ते ४ लिटर पाणी पिते, यामुळे त्वचा आणि शरीर चांगले राहते.

मला नैसर्गिकरीत्या तयार केलेला फळाचा ज्यूस आवडतो, कारण यामुळे त्यातील नैसर्गिक घटक आपल्या शरीराला मिळतात. या व्यतिरिक्त मी माझ्या दैनंदिन डाएटमध्ये ग्रीन टी देखील समाविष्ट केलेला आहे, यामुळे दिवसभर ताजेतवाने राहायला मदत होते. 

व्यायाम आणि डाएटने आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो, तशीच काळजी मी माझ्या केस व त्वचेची देखील घेते. केसांसाठी मी शक्‍यतो कोरफडीपासून घरीच तयार केलेले पॅक वापरते. तसेच नॅचरल ऑइलने केसांना मसाज करते. हेड स्पापेक्षा हेड मसाजवर माझा जास्त विश्‍वास आहे.

यामुळे केसांचे आतून पोषण होते. त्वचेच्या बाबतीतही मी तेवढीच काळजी घेते. मेकअप करण्याआधी मी माझ्या चेहऱ्यावर चांगले मॉइश्‍चरायजर वापरते. मेक-अप उतरवल्याशिवाय मी कधीच झोपत नाही. तुमच्या फिगरएवढीच केस व त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Slim Fit Shraddha Kapoor Maitrin Supplement Sakal Pune Today