दारावरची थाप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

चौकटीतली ‘ती’ -  सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक
जिथं माणसंदेखील किड्या-मुंग्यांसारखी राहतात, अशा मुंबईनामक महानगरात वास्तव्य करायला आलेलं हमीद आणि सलमा हे एक सामान्य, नवविवाहित जोडपं. हमीद एका सरकारी खात्यात कारकून म्हणून लागलेला, तर सलमा ही गृहिणी. पण तिचं माहेर मुंबईपासून दूर एका छोट्या गावातलं.

मुंबईत त्यांना कशीबशी एक जागा मिळते, तीही ‘रेड लाइट एरिया’ या नावानं बदनाम असलेल्या वस्तीत. एका जुनाट चाळीत वरच्या मजल्यावर ते आपलं बिऱ्हाड थाटतात. खालच्या पानवाल्यानं हे घर मिळवून दिलेलं असतं. तिला ही जागा आवडलेली नसते, पण याहून चांगल्या जागेसाठी पागडी द्यायला पैसे आणायचे कुठून, हा मोठा प्रश्‍न असतो. सलमाचे वडील जुन्या काळातले शास्त्रीय गायक, म्हणून तिलाही गाण्याचं चांगलं अंग. हमीद या घरात आल्यानंतर तिचं गाणं पहिल्यांदा ऐकतो आणि भारावून जातो. पण तिच्या गाण्यातून वेगळंच झेंगट मागे लागतं. घराच्या दारावर वेळी-अवेळी ‘थाप’ पडू लागते. खरी गोम अशी, की या घरात त्यांच्या आधी शमशाद ऊर्फ ‘शादो’ नावाची एक तवायफ राहत असते. ती जागा सोडून गेल्यानं ज्यांची ‘आबाळ’ झाली, अशी शौकीन मंडळी वेळोवेळी या ठिकाणी येऊ लागतात. अशा लोकांना तोंड देता-देता हमीद आणि सलमा यांची पुरेवाट होते. ही असली ‘दिव्य’ जागा पाहून दिल्याबद्दल हमीद त्या पानवाल्यावर भडकतो; पण आता काही उपयोग नसतो. खरं तर पानवाल्याचा धंदाही शमशाद गेल्यामुळं बसलेला असतो. सलमाच्या गाण्याचे सूर कानी पडल्यानंतर त्याला तेवढंच हायसं वाटतं. चाळीतल्या लोकांच्या बोचक नजरांनी व आजूबाजूच्या टारगट पोरांच्या त्रासानं दोघं आधीच वैतागलेले, त्यात रात्री-अपरात्री दार ठोठावणाऱ्यांचा हा उपद्रव! ‘दुसरं घर बघा’ असा तिचा लकडा सुरू असतो.

पण तुटपुंज्या पगारात कसंबसं घर चालवणाऱ्या हमीदला ते शक्‍य नसतं. बरं, महापालिकेच्या नोकरीत हमीदला वरकड कमाईची भरपूर संधी असली तरी प्रामाणिक वृत्तीमुळं तो ‘चिरीमिरी’ लाथाडत असतो. हमीद कामावर गेल्यानंतर एकट्या सलमाला घर खायला उठतं. शेजार-पाजाराच्यांशी बोलायचं नाही, कुणाच्या घरी जायचं नाही, परक्‍या व्यक्तीला मुळीच घरात घ्यायचं नाही, अशा नाना सूचना त्यानं दिलेल्या असतात. काही वेळा या सूचना न पाळल्यानं तिला हमीदची बोलणी खावी लागतात. विरंगुळा म्हणून तानपुरा छेडायला जावं तर दारावर थाप पडलीच म्हणून समजा! येणारे लोकही नाना प्रकारचे असतात. कुणी थेट मुद्द्याला भिडणारे, तर काही जण संभावितपणाचा आव आणून ‘दलाली’ करायला आलेले. तर कधी पोलिसांनीच छापा घालायच्या हेतूनं एखादं बोगस ‘गिऱ्हाईक’ तिच्या घरी पाठवलेलं. एक वयस्कर बाई गोड बोलून भुलवत तिला आपल्या घरी नेते, पण ती दुसरी-तिसरी कुणी नसून सलमाच्याच घरात आधी राहणारी कोठेवाली शमशाद निघते. तिनं नव्या जागेत चक्क शरीरविक्रीचा धंदा सुरू केलेला असतो. सलमा जिवानिशी पळून घरी येते. असे एक ना दोन, अनेक प्रसंग. सलमा कंटाळून जाते. सततच्या तणावानं भ्रमिष्ट झाल्यासारखी वागू लागते. हमीदलाही घर बदलायचं असतं, पण पैशाची सोय होत नसते. अखेर तो एका ठेकेदाराकडून लाच घ्यायला प्रवृत्त होतो. ठेकेदार रात्री पैसे द्यायला त्याच्या घरी येणार असतो. पण खूप प्रतीक्षा करूनही तो येतच नाही.

त्याच्याऐवजी टपकतं ते शमशादचंच एक जुनं, श्रीमंत गिऱ्हाईक. खूप दिवसांनी तिचं गाणं ऐकायला आलेलं. हमीद नेहमीप्रमाणं त्याला वाटेला लावणार एवढ्यात आतल्या खोलीतून तानपुऱ्याचे स्वर ऐकू येतात. ती व्यक्ती आत जाते. सलमा जमिनीवर बसून तानपुरा छेडत असते. त्याला बसायला सांगून ती गाणं ऐकवते. संतापलेला हमीद तिला मारण्याच्या उद्देशानं सुरी हातात घेतो. पण गाणं संपताच सलमा उठून त्या व्यक्तीच्या डोक्‍यात तानपुरा फेकते. बिचारं गिऱ्हाईक जिवानिशी पळून जातं. हमीदचा गैरसमज दूर होतो. ती त्याच्या पायावर कोसळते. ‘मुझे माफ कर दो, मैं गिर गयी थी,’ म्हणत क्षमा मागते. पण तो तिला सावरतो. ‘मैं भी गिर गया था,’ म्हणत तिला दिलासा देतो. कितीही संकटं येवोत, या शहरात आपण धैर्यानं जगत राहू, लढत राहू, असा निर्धार दोघं करतात.

‘दाग़’, ‘मिर्झा ग़ालिब’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘अनुराधा’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘अभिमान’ अशा आशयसंपन्न चित्रपटांचे संवादलेखक राजेंद्रसिंग बेदी यांचं पहिलंवहिलं दिग्दर्शन असलेल्या ‘दस्तक’ (१९७०) या चित्रपटाची ही गोष्ट. परिस्थितीपायी एका विचित्र कोंडीत सापडलेल्या जोडप्याचं चित्रण करताना बेदी यांनी नायिका सलमाची व्यथा अतिशय तरलतेनं पडद्यावर मांडली होती. पण ‘बैंया ना धरो’, ‘माई री...’, ‘हम हैं मता-ए-कूचा..’ अशी एकाहून एक सरस गाणी असलेला हा चित्रपट लोकांनी साफ दुर्लक्षिला. सलमा साकारणारी रेहाना सुलतान ही वास्तवात गुणी अभिनेत्री. पण त्या काळातल्या तिच्या काही ‘बोल्ड’ भूमिकांमुळे तिला ‘नको तशी’ प्रसिद्धी मिळाली आणि या भूमिकेवर तिनं घेतलेले कष्ट वाया गेले. ‘मैं कहता था ‘दस्तक’ और लोग समझते थे ‘दस तक’!’ अशा विषादपूर्ण शब्दांत बेदी यांनी या चित्रपटाच्या अपयशावर भाष्य केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity Sunil Deshpande maitrin supplement sakal pune today