एक नवा रोमान्स ट्रॅक...

शब्दांकन - काजल डांगे
शनिवार, 20 एप्रिल 2019

जोडी पडद्यावरची... - अक्षय वाघमारे आणि मयूरी वाघ
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची... - अक्षय वाघमारे आणि मयूरी वाघ 
अभिनेत्री मयूरी वाघ म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा, तर दुसरीकडे अभिनेता अक्षय वाघमारे ‘यूथ’सारख्या मराठी चित्रपटामध्ये काम करत प्रेक्षकांसमोर आला. अभिनय क्षेत्रात नाव कमवू पाहणारे हे दोन्ही कलाकार एकत्र आले सोनी मराठी वाहिनीवरील ‘ती फुलराणी’ या मालिकेमुळं. अक्षयची ही पहिलीच मालिका. शिवाय या मालिकेपूर्वी दोघांच्या कधीच भेटी-गाठीही झाल्या नाहीत. 

अक्षय म्हणतो, ‘‘मी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मालिकेशी माझा कधीच संबंध आला नाही. पण ‘ती फुलराणी’ मालिकेची मला ऑफर आली आणि मी मालिकांकडं वळलो. मयूरीला मी पहिल्यांदा भेटलो ते या मालिकेच्या सेटवरच. आमची याआधी साधी तोंडओळखही नव्हती. ऑगस्ट महिन्यात या मालिकेला सुरवात झाली. सेटवरच चित्रीकरणादरम्यान आमची ओळख अधिक वाढत गेली. आता आमची चांगली मैत्री जमली आहे.’’ 

मयूरी सुरवातीपासूनच मालिकांमध्ये काम करत असल्यानं तिला सगळ्या टेक्‍निकल गोष्टींची माहिती होती, पण अक्षयला याबाबत काहीच ठाऊक नव्हतं. सुरवातीला तो मराठी शब्दांचा उच्चार करतानाही अडखळायचा. याबाबत मयूरीला विचारता ती म्हणाली, ‘सुरवातीला अक्षयला मराठीचे काही अवघड उच्चार करण्यासाठी खूप सराव करायला लागायचा. बऱ्याचदा तो संवादही विसरला आहे. पण मला त्याचं कौतुक एवढ्यासाठीच वाटतं की, त्यानं हार न मानता त्याचं मराठी सुधारलं. आपली कमजोर बाजू कोणती आहे, हे त्यानं जाणलं आणि त्यावर मेहनतही घेतली. आता मराठी बोलण्यात तसंच संवादाफेकीमध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही.’’ मयूरी-अक्षयची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर या जोडीला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत आहे. ‘‘सुरवातीपासूनच आमच्यात घट्ट मैत्री झाली आणि म्हणूनच पडद्यावर आमची केमिस्ट्री अधिक खुलून दिसते,’’ असं मयूरी सांगते. अक्षय मयूरीची थट्टा करण्याची एकही संधी सोडत नाही. अक्षय सेटवरचे किस्से सांगताना आणि चित्रीकरणाच्या आठवणी सांगताना अगदी रमून जातो. अक्षय म्हणतो, ‘‘एप्रिल फुलच्याच दिवशी मी मयूरीची एक गंमत केली. आमच्या डिओपी दादांचा वाढदिवस होता. त्यांनी आमच्या पूर्ण युनिटला आइस्क्रीमचे कॅन दिले होते.

त्याचदरम्यान मयूरीचा सीन सुरू होता म्हणून मी म्हटलं की, मी आणि मयूरी नंतर आइस्क्रीम खातो. मी मयूरीच्या आइस्क्रीम कॅनवर खोटी पाल ठेवली. सीन संपताच मयूरी आइस्क्रीम खायला पळाली आणि पाल पाहूनच आरडाओरडा तिनं करायला सुरवात केली. आमची संपूर्ण टीम मयुरीची मज्जा घेत होती.’’ मालिका सुरू होऊन जवळपास आठ ते नऊ महिने झाले आहेत, पण दोघंही एकमेकांना बऱ्यापैकी ओळखू लागले आहेत. ‘अक्षय व्यक्ती म्हणून उत्तम आहे. पटकन समोरच्या व्यक्तीच्या मदतीला धावून जातो. शिवाय नवनवीन शिकण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे,’ असे मयूरी सांगते. अक्षयला मयूरीबाबत विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘मी काम करताना चुकल्यास ती मला स्पष्टपणे सांगते. महत्त्वाचं म्हणजे, ती समोरच्याच ऐकून घेते. उत्तम अभिनेत्री ती आहेच, त्याचबरोबर इतरांना सांभाळून घेण्याची ताकद तिच्यामध्ये आहे.’’  मालिकांमधील काही जोड्या प्रेक्षकांना आपलंस करून घेतात, त्यातीलच एक जोडी म्हणजे मयूरी आणि अक्षय. या दोघांचा मालिकेमध्ये आता रोमान्स ट्रॅक सुरू झाला आहे. मयूरी-अक्षयची केमिस्ट्री या पुढेही अधिकाधिक खुलत जाणार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार एवढं नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Akshay Waghmare Mayuri Wagh maitrin supplement sakal pune today