मालिकांनी कारकीर्द घडवली

Gauri-Nalawade
Gauri-Nalawade

सेलिब्रिटी टॉक  - गौरी नलावडे, अभिनेत्री
माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरवात छोट्या पडद्यापासून झाली. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत असताना मला प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझं पहिलं प्रेम मालिकाच आहे. मालिकेमध्ये काम करताना तुम्हाला तांत्रिक गोष्टी, तसेच कॅमेरा समजतो. मालिकेचा दिग्दर्शक प्रत्येक कलाकाराला बोट धरून शिकतो, पण चित्रपटांच्या बाबतीत तसं काहीच घडत नाही. मालिकेमुळं तुमच्या अभिनयाचा पाया मजबूत होतो. छोट्या पडद्यावर काम केल्याचा फायदा मला चित्रपटांमध्ये काम करताना झाला. जवळपास साडेतीन वर्षं मी मालिका केल्या. त्यात मी बऱ्याच तांत्रिक गोष्टी शिकले. त्याचं चांगलं फळ मला पुढं काम करताना मिळत गेलं. मी चित्रपटांबरोबर काही नाटकांमध्येही काम केलं. नाटकांनी माझा आत्मविश्‍वास वाढवला. मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून एक वेगळी गौरी घडत गेली. 

मला या क्षेत्रात नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. या काळात चित्रपटसृष्टी फार बदलली आहे. चित्रपटांच्या निर्मितीत वाढ झाली आहे, त्याचबरोबरीने नवनवीन कथा मराठीमध्ये येत आहेत. मी जेव्हा या क्षेत्रात आले, तेव्हा मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास नव्या कलाकारांना सहज संधी मिळत नव्हती. आता चित्र बदललं आहे. मात्र सहज मिळालेलं प्रसिद्धी टिकवून ठेवणंही महत्त्वाचं आहे. मी ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिका केली आणि अगदी कमी कालावधीमध्ये मला प्रेक्षकांनी डोक्‍यावर उचलून धरलं.

पण त्यानंतर माझ्या करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले. माझ्या पडत्या काळात मी खचले नाही. मी ब्रेक घेत काम करीत आहे, मात्र मी सगळ्यांपासून दूर आहे, असेही नाही. सोशल मीडियामुळे अजूनही मी प्रेक्षकांपर्यंत पोचत आहे. मी ‘कान्हा’ नावाचा एक मराठी चित्रपट केला. सुरवातीला माझी भूमिका खूपच छोटी होती, पण माझं काम पाहून दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी माझे सीन्स वाढवले. माझी या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांनाही फार आवडली. आजही मला जे काम करायला आवडेल, त्याच कामासाठी मी होकार देते. मालिका, चित्रपट स्वीकारताना मला वेगळं काही करायला मिळंल का, हे मी पाहते. 

माझा ‘अधम’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी मुख्य भूमिका आहे. मी पहिल्यांदाच नॉन-ग्लॅमरस भूमिका रुपेरी पडद्यावर साकारत आहे. या चित्रपटासाठी मी वजनही वाढवलं.

पुण्याजवळील दगडखाणीचे बेकायदेशीर खोदकाम, त्याचे अर्थकारण, राजकारण याविषयावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत आहे. दिग्दर्शक अभिषेक केळकर यांनी ‘अधम’च्या कथेची मांडणी अगदी उत्तम केली आहे. 

(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com