चांदोमामा

चांदोमामा

सेलिब्रिटी व्ह्यू
‘आमचा’ पहिला-वहिला दात परवा पडला. आमचा म्हणजे माझ्या मुलीचा! पहिलाच असल्यानं भारी अप्रूप, उत्साह! झिपलॉकच्या पिशवीत ठेवून बाईंना (टीचरला) शाळेत दाखवून वगैरे झालं. 

रात्री तिनं तो उशीखाली ठेवला. कुणी म्हणे टूथ फेअरी असते, ती तो घेऊन जाते आणि त्याबदल्यात चांदीचं नाणं ठेवून जाते. यातलं मला काहीच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रडवेला चेहरा करून आली. म्हणाली, ‘आई चांदीचं नाणं?’ मला काय ते समजलं. मी तिला समजावलं. म्हटलं, ‘आज परत ठेव. आज रात्री नक्की देईल.’ तिनं इमाने इतबारे दात उशीखाली ठेवला खरा, पण आम्ही मात्र चांदीचं नाणं ठेवायला विसरलो. पुन्हा सकाळी तिचा आपला एवढासा चेहरा! मी मनातल्या मनात जीभ चावली. ‘आज परत ठेवू रात्री,’ असा सल्ला मी तिला दिला आणि आठवणीनं कपाटातून चांदीचं नाणं काढून ठेवलं!

रोजनुसार दिवस सरला. रात्री गोष्ट वाचून दाखवायच्या आमच्या कार्यक्रमात अचानक थांबवून ती मला म्हणाली, ‘आई, अगं टूथ फेअरी वगैरे नसतेच... मला श्रेयाताईंनी सांगितलं. आई-बाबाच ठेवतात ते नाणं’. मी तिच्याकडं पाहतच राहिले. मला खळकन्‌ काहीतरी फुटल्याचा आवाज आला... तिची एक गोड समजूत! त्या समजुतीला तडा जाताना मी पाहत होतं. ‘पऱ्या असतात! सुंदर-सुंदर, छोटे-छोटे पंख लावून, जादूची काडी हातात घेऊन उडणाऱ्या पऱ्या असतात,’ या तिच्या दृढ विश्‍वासाला गेलेला तडा! आज एवढासा चेहरा होण्याची माझी वेळ होती. तिच्या आयुष्यातली अजून एक नवलाई लोपली. 

ती चार वर्षांपूर्वी दोन-अडीच वर्षांची असंल. तिला समजायला लागल्यापासूनच्या वयातला गणपतीचा महिना. महिनाभर आधीपासून घरात, सोसायटीत लगबग सुरू होती. गणपती येणार, गणपती येणार! बाईसाहेब भारी खुशीत होत्या. ‘आम्च्याकलेपन गंपती येनाल,’ ती गणपतीची आतुरतेने वाट पाहत होती. 

अखेर तो दिवस उगवला. बाबा गणपतीची मूर्ती घेऊन दारात उभा! ही बुचकळ्यात पडलेली ‘गंपती कुठंय?’ आम्ही म्हटलं ‘हा काय!’ ती रडवेला चेहरा करत म्हणाली, ‘हा? पण हा तर चालत नाही, बोलत नाही... असा नकोय मला.’ बिच्चारी! ‘गणपती येणार’ म्हणजे हत्तीच सोंड लावून चालता-बोलता पाहुणा आपल्या घरी येणार, अशी तिची समजून होती. या मूर्तीनं कल्पनेला तडा गेला तो गेलाच!

मोठं होत जाणं म्हणजे काय? आपल्या कल्पनेतलं भावविश्‍व पुसट होत जातं का? आपल्याला जे ‘हमखास असंच आहे, असं वाटत असतं ते ‘तसं नसतं’ असं कळत जाणं म्हणजे मोठं होणं का?

अलीकडे शाळेत फार लवकर काय-काय शिकवतात. पाण्याचं चक्र, बाष्पीभवन, पाऊस कसा पडतो, सौरऊर्जा, सूर्य, नवग्रह, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे वगैरे वगैरे. मी म्हणते कशाला एवढ्या लवकर? अचानक आकाशात काळे-काळे ढग जमा होतात आणि त्यातून टप, टप, टप पाणी पडायला लागतं. आता त्यात भिजू दे न त्यांना मनसोक्त! चंद्राला अजून चांदोमामा म्हणू दे... इंद्रधनुष्याची घसरगुंडी करू दे... फुला-पानांचे वेगवेगळे रंग, गंध मनात साठवू दे... निसर्गाला हात पसरून कवेत घेऊ दे... बागडू दे!

राहू द्यावं त्यांना वेगवेगळ्या कल्पनांच्या विश्‍वात... वेगवेगळ्या भ्रमांच्या लाटांवर तरंगू द्यावं त्यांना! बाकी ‘सत्य’ प्रत्येक वळणावर ठाण मांडून उभी असतातच की, आपल्याला ‘आयुष्य’ शिकवायला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com