पोषक खा, सुंदर दिसा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 June 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - मलायका अरोरा, अभिनेत्री
तुमचे शरीर हे तुमचे मंदिर आहे, आणि त्याचा आदर तुम्ही ठेवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कितीही बिझी असलात तरी रोज त्यासाठी थोडासा वेळ द्यायलाच हवा. मी डाएट करण्यावर कधीही विश्‍वास ठेवत नाही. फक्त तुम्ही चांगले आणि योग्य प्रमाणात खा, तुम्ही नेहमीच निरोगी राहता.

यासाठी मी स्वतःला घालून घेतलेला नियम म्हणजे - पोषक खा, सुंदर दिसा.
मला कमी कॅलरीज असलेले घरी बनवलेले पदार्थ खायला आवडतात. सकाळची सुरवात लिंबाचा रस व मध टाकलेल्या कोमट पाण्यापासून होते. त्यानंतर अर्ध्या तासाने मी एक लिटर पाणी पिते. सकाळच्या नाश्‍त्यात १ वाटी ताजी फळे, इडली, उपमा किंवा पोहे किंवा अंड्याच्या पांढऱ्या भागासोबत मल्टिग्रेन टोस्ट घेते. त्या नंतरच्या नाश्‍त्यात १ ग्लास फ्रेश भाज्यांचा ज्यूस, २ ब्राऊन ब्रेड टोस्ट आणि अंड्याचा पांढरा भाग घेते.

दुपारच्या जेवणात ब्राऊन राइस किंवा पोळी, भाजी, कडधान्यांचे सलाड आणि चिकन किंवा मासे घेते. संध्याकाळच्या नाश्‍त्यात एक पीनट बटर सॅण्डवीच खाते. वर्कआऊट केल्यानंतर १ केळ आणि प्रोटिन शेक घेते. रात्रीचे जेवण मी लवकर घेते. यामध्ये उकडलेल्या भाज्यांसहित एक वाटी सूप आणि सलाड घेते. मधल्या वेळेत मी खूप पाणी घेते. कधीतरी नारळ पाणी पिते.

योग्य आहारासोबतच योग्य व्यायामदेखील महत्त्वाचा असतो. मी रोज २० मिनिटे कार्डिओ करते. आठवड्यातून तीन वेळा वेट लिफ्टिंग करते. किक बॉक्‍सिंग, ॲरोबिक्‍स, हिप-हॉप करते. मला स्वीमिंग करायला आवडते.

त्यामुळे मी कंटाळते तेव्हा स्वीमिंग करते. भरतनाट्यम सारखे काही नृत्याचे प्रकारही करते. मला योगा करणेही आवडते. यामुळे आपले शरीर लवचिक राहते. निरोगी शरीर बनवायचे असल्यास आळशी बनू नका. वर्कआऊट करा, तुम्हाला आवडेल ते खा, पण प्रमाणात! रात्रीचे जेवण लवकर करा. पुरेशी विश्रांती घ्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Malaika Arora maitrin supplement sakal pune today