आवडणाऱ्या भूमिकाच स्वीकारते

 मृण्मयी देशपांडे
मंगळवार, 11 जून 2019

मी या क्षेत्रात आले, तेव्हा कोणते काम करायचे किंवा कोणते नाही, याबाबतीतले निर्णय मी स्वतः घ्यायचे.

सेलिब्रिटी टॉक - मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री 
मी   अकरा वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात आले. मी स्वेच्छेने या क्षेत्राची निवड केली. या अकरा वर्षांनी मला खूप काही दिले. प्रसिद्धी, प्रेक्षकांचे प्रेम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक व्यक्ती, कलाकार म्हणून माझ्यात चांगले बदलही घडत गेले.

आतापर्यंतच्या करिअरमध्ये मला आलेले सगळेच चांगले-वाईट अनुभव गाठीशी बांधून ठेवण्यासारखे आहेत. मी या क्षेत्रात आले, तेव्हा कोणते काम करायचे किंवा कोणते नाही, याबाबतीतले निर्णय मी स्वतः घ्यायचे. सुरवातीला माझे बरेचसे निर्णय चुकले. मी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य होताच असे नाही. काही चित्रपट चालले, काही चित्रपटांना बरा प्रतिसाद मिळाला, तर काही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली; पण मिळालेल्या अपयशामुळे मी कधीच खचून गेले नाही. प्रत्येक चांगल्या आणि चुकीच्या निर्णयांनी मला शिकवले. त्यातूनच खरेतर मृण्मयी देशपांडे घडत गेली. वेळ तुम्हाला खूप काही शिकवून जाते. माझ्या बाबतीतही तसेच झाले. या क्षेत्रात आल्यानंतर काही वर्षे गेली आणि आपल्याकडे नेमक्‍या कशाप्रकारच्या भूमिका येत आहेत, हे मला कळू लागले. त्याप्रमाणे मी पुढचा प्रवास सुरू ठेवला. मी आजही मनापासून करायला आवडतात त्याच भूमिका स्वीकारते. एखादा प्रोजेक्‍ट न आवडल्यास मी पुढे पाऊलच टाकत नाही. कारण काम करताना मानसिक समाधान मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

या दहा वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टी फार बदलली आहे, असे मला वाटते. हे सांगायचे कारण म्हणजे मी या क्षेत्रात आले तेव्हा मला कोणी मॅनेजर किंवा पीआर नव्हते. आता लोक मॅनेजर-पीआर घेऊनच अभिनयक्षेत्रात उतरतात आणि ही चांगलीच गोष्ट आहे. नवोदित कलाकारांना त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळते. फक्त चित्रपटच नव्हे, तर मालिकांमध्येही मी काम केले. ‘कुंकू’ मालिकेमुळे मी घराघरांत पोचले. माझ्यासाठी माध्यम महत्त्वाचे नाही. आपली कला सादर करता येईल, अशा ठिकाणी मी रमते. मी पुन्हा दोन किंवा तीन वर्षे चालणारी मालिका करू शकणार नाही. सुरवातीचे काही महिने चांगले जातात; पण वर्ष उलटून गेल्यावर कंटाळवाणे वाटू लागते. अगदीच १०० भागांची मालिका असेल आणि त्याची कथा अगदी छोटी, छान असल्यास ती करायला मला आवडेल. शेवटी आपली कला प्रेक्षकांसमोर येणे महत्त्वाचे; पण एकाच गोष्टीमध्ये मला तीन-तीन वर्षे अडकून राहायला आवडणार नाही. सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. त्या माध्यमातही मला काही नवे प्रयोग करायला आवडतील. याचवर्षी अभिनेत्री माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या ‘१५ ऑगस्ट’ चित्रपटात मी काम केले. हा चित्रपटही नेटफ्लिक्‍सवरच प्रदर्शित झाला. माझ्यासाठी हा खूपच छान अनुभव होता. बदलत्या काळानुसार बदलत चाललेल्या मनोरंजनाच्या पद्धती कमालीच्या आहेत. चांगली वेबसीरिज आल्यास मी नक्की करणार आहे. याचा चित्रपटांवर परिणाम होईल, असे मला वाटत नाही.

सध्यातरी मी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. लवकरच माझा ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील माझी भूमिका आधुनिक काळातील आहे. नवीनच लग्न झालेली कावेरी घर, नोकरी सांभाळत कशाप्रकारे आयुष्य जगते हे या चित्रपटात दाखविले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत मी काम करणार आहे. दिग्दर्शक समीर जोशी यांनी योग्य पद्धतीने कथा रुपेरी पडद्यावर मांडली आहे. दीपा त्रासी आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी पेलली आहे. पती-पत्नीमधील वाढलेले अंतर आणि त्यामधून त्यांच्यात फुलत जाणारे प्रेम अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. 
(शब्दांकन : काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Talk Mrunmayee Deshpande Appropriate role is accepted