मराठी चित्रपटसृष्टी माझे माहेर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी
मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती कलाकृती पोचू शकणार नाही.

मग ते नाटक, चित्रपट किंवा मालिका असू दे. चित्रपटासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते दिग्दर्शकाचं म्हणणं ऐकून घेणं आणि मी समोरच्या व्यक्तीचं खूप चांगल्या प्रकारे ऐकून घेते. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. मी बरीच वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. साहजिकच प्रेक्षकांना आमच्याकडून जास्त अपेक्षा असतात आणि मला कोणाचाही अपेक्षाभंग झालेला आवडत नाही. मला वाटतं, आपलं वय जसं वाढतं जातं तशी आपली जबाबदारी अधिक वाढत जाते. आतापर्यंत मी प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि मला कोणतीही भूमिका साकारताना असं कधीही वाटलं नाही, की ही भूमिका आधीही साकारलेली आहे. 

माणूस म्हणून प्रत्येक जण जसा वेगळा असतो तसंच भूमिकेचं असतं. प्रत्येक भूमिका नवीन असते. मी ज्या भूमिका साकारल्या आहेत त्या मला वेगळ्या वाटलेल्या आहेत. प्रत्येक भूमिकेला प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीनं सादर करीत असतो. गेली सहा वर्षं मी ‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेत काम करते आहे. त्यातील माझी भूमिका फार सुंदर आहे आणि भूमिका चांगली असल्यास मला ती करायला आवडते. मी आतापर्यंत हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. मराठीमध्ये आपलेपण आहे.

मी मराठी चित्रपटसृष्टीमधून माझ्या करिअरला सुरवात केली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी माझ्यासाठी जास्त जवळची आहे आणि ती माझ्यासाठी माहेरघर आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील वातावरण फार वेगळं असतं. तेथील लोक अनेक राज्यांतून आलेले असतात. वेगवेगळी लोकांची ओळख होते. पण तिथेही फार शिकण्यासारखं आहे. मराठीत आपण सगळे एकसारखे वाढलेले असतो. आपली मातृभाषा सारखीच असते. त्यामुळे मराठीत काम करायला खूप आवडतं. 
(शब्दांकन - स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk nina kulkarni maitrin supplement sakal pune today