ब्लॅंक

Sakhi-Gokhale
Sakhi-Gokhale

सेलिब्रिटी टॉक : सखी गोखले, अभिनेत्री
गेले तीन दिवस लॅपटॉप उघडून नुसत्याच कोऱ्या पानाकडे बघत बरेच तास घालवले. टेक्‍नोलॉजीमुळे मनातलं काही व्यक्त करता येत नाहीये, काही सुचत नाहीये असा माझ्या लॅपटॉपला दोष देत मी वही आणि पेन घेऊन आमच्या लंडनमधील घरातल्या टेबलावर बसले.

माझ्या फ्लॅटमेट्‌सचे येणे-जाणे, किचनमधील लुडबूड, मधे-मधे गप्पा सुरू होत्या. आता अशा अत्यंत विचलित करणाऱ्या वातावरणात कसं सुचणार मला? वही बंद करून त्यांना दोष देत मी खोलीचं दार बंद करून बेडवर लोळत माझी वही परत उघडली. आता कुठल्याही क्षणी मला या आठवड्याचा लेखाचा विषय सुचणार आहे आणि नकळत माझी शब्दांची माळ विणली जाणारं आणि त्यांचा गठ्ठा करून मी पाठवून देईन, असं वाटलं आहे, मात्र काहीच सुचत नाहीये!

आज घराची घासून पुसून स्वच्छता केली आहे. त्यामुळे एखाद्या फिनेलच्या बाटलीत बसल्यासारखं वाटतंय, एकाच गोष्टीची कमी होती, एखादी फुलांनी सजलेली फुलदाणी! आमच्या मुंबईच्या घरातील ही एक मूलभूत गरज आहे. त्याशिवाय आमच्या घराला काहीच पूर्णत्व येत नाही. आमच्या घराजवळच्या सिग्नलवर गजरे विकणारी मुलगी होती, आई कायम तिच्याकडून गजरे, चाफा घ्यायची. ती उगाच आधी वाटेल ती रक्कम सांगायची, आई काहीच कमी-जास्त न करता पैसे द्यायची. एक गजरा गाडीत, गाडीतल्या गणपती बाप्पाच्या छोट्याशा मूर्तीसमोर एक -दोन चाफ्याची फुलं. बाकीच्या मोगऱ्याचे गजरे देवघरातल्या मूर्तींवर अलगदपणे विणायचे आणि दारात एखाद्या मोठ्या वाडग्यात उरलेली चाफ्याची फुलं पाण्यात सजवून ठेवायची.

सिग्नलवर कोणीच नसायचे त्या दिवशी घराखालच्या फुलविक्रेत्याकडून जरबेरा, कधी कधी ऑर्किड्‌स किंवा अगदी लिलीसुद्धा आई आणते. घराच्या प्रत्येक खोलीत एक सुंदर फुलदाणी आणि त्यात अतिशय मन लावून सजवलेली फुलं असतात. आई म्हणते तिच्या कॉलेजच्या होम सायन्स या विषयात घरातील सगळी कामं शिकवायचे, त्यात ती फ्लॉवर अरेंजमेंट्‌स शिकली. मी तर तिला बघत बघतच शिकले. होम सायन्स हा मला न कळणारा विषय आहे. म्हणजे मला स्वयंपाक येतो, स्वच्छता ठेवता येते, घर सजवता येतं, अडचणीच्या वेळेस शिवणकामसुद्धा येतं. यात शिक्षण घेणं का आवश्‍यक आहे, हे कधीच कळलं नाही. आईच्या वर्गात फक्त मुली असायच्या. त्यांना वाटत नाही का एखाद्या वेळी घरात फुलं आणून घर सजवावे? विचित्रच आहे. 

मी शिक्षणासाठी घर सोडलं, मग स्वतःच्या घरी राहू लागले, प्रत्येक घरात मात्र चादरी, कटलरी, खिडक्‍यांचे पडदे, शाम्पू इत्यादींसकट दोन तरी फुलदाण्या घेतल्या. सुरवातीला काही दिवस आसपासचे फुलवाले शोधायचे, किमती तोलायच्या आणि एखादा निवडायचा. त्याच्याकडून वारंवार घरासाठी आणि गाडीसाठी फुलं, गजरे घ्यायचे, हळूहळू प्रत्येक फुलवाल्या काकू, काका, ताई, दादांशी मैत्री झाली आणि बरेचदा एखादं जास्तीच फूल, ५ ऐवजी ८ चाफ्याची फुलं, त्यादिवशी असलेल्या फ्रेश फुलांच्या गठ्ठ्यातील फुलं निवडून ते द्यायचे. मी ती फुलं मिरवत घरी येऊन बराच वेळ फुलदाणीमध्ये अरेंज करायचे, मग आईला फोटो पाठवायचे आणि तिच्या कौतुकाची वाट बघायचे. तर मुद्दा असा, की या आठवड्यात काहीच सुचत नाही. लॅपटॉप, वही, फोन, मित्र, घर, शहर सगळ्यांचीच चूक आहे. पुढच्या आठवड्यात या सगळ्यावर ताबा असेल, तेव्हा भेटूच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com