निखळ अभिनय शिकवणारे आदिवासी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, अभिनेत्री
मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे कुठलीही कलाकृती करताना टीम वर्क फार महत्त्वाचं असतं. काम करणाऱ्या प्रत्येकाचे ध्येय ती कलाकृती यशस्वी करणंच असतं. हेमलकसा आणि भामरागड या भागात सिनेमाचं काम करताना तेथील स्थानिक आदिवासी आणि आमच्यात एक भाषा नव्हती.

त्यातल्या एखाद्या म्होरक्‍याला तुटकी-फुटकी हिंदी येत असे आणि मी सिनेमात जास्तीत जास्त आदिवासी लोक घेतले होते. जंगलात गेल्यावर प्रत्येक १० किलोमीटरवर एक वेगळा छोटासा आदिवासी पाडा लागतो. अधिकाधिक जंगलात जाल, तसं अधिक अविकसित खेडं लागतं. तिथं निवडक लोक चिरोट्यासारखा कपडा बांधतात. बाकी अजूनही कपडे घालत नाहीत. सिनेमा खरा वाटण्यासाठी मला असं अविकसित आदिवासी काम करायला हवं होतं. माझा कुणाल नावाचा असिस्टंट जीप घेऊन अशा आदिवासी पाड्यात शूटिंगच्या दिवशी गेला. सुरवातीला त्यांची भाषा येणारा व कपडे घालणारा जरा शहाणा माणूस त्याच्यासोबत होता. आदिवासींना सिनेमा कशाला म्हणतात, हे माहीत नव्हतं आणि त्यांना पैशांचं आकर्षणही नव्हतं. त्यांचा मुखिया जायला सांगतोय म्हणून जायचं आणि जे करायला सांगतोय ते करायचं, एवढंच त्यांना माहीत. ते जीपमध्ये कधीच बसले नसल्यामुळं बसायच्या जागेला सोडून इतरत्र बसायचे! एका जीपमध्ये १० आदिवासी. माझा असिस्टंट त्यांना बसायचं कसं म्हणून परत-परत दाखवायचा. जीप सुरू करायच्या आधी सगळ्यांची नीट जागा ठरवून सांगून बसवून द्यायचा, पण जीप सुरू झाल्यावर ते घाबरून खालीच कार्पेट, सीटचे पाय धरून बसत. हे सगळं बघून हसायला यायचं, पण कीव यायची की एकीकडं मनुष्य चंद्रावर गेला आणि दुसरीकडं अजूनही माणसाला मूलभूत गरजा पोचल्या नाहीत. 

मग शेवटी ते आदिवासींना कॅमेरासमोर उभं केलं जायचं. कॅमेरा कधीच पाहिलाच नसल्यामुळं एकही व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये बघायचा नाही. कुणीच ॲक्‍टिंग करायचं नाही. सगळंच नॅचरल, जेवढं सांगितलं तेवढंच करणार. ओव्हर ॲक्‍टिंगचा प्रश्‍नच नाही. उलट इतकं सोपं जायचं आणि इतकं खरं वाटायचं त्यांच्यासोबत सीन करताना... नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी म्हणाले, की इतका पाण्यासारखा स्वच्छ, निखळ अभिनय करताना आमचा कस लागतोय आणि खरी मजा येतेय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Samruddhi Pore maitrin supplement sakal pune today