esakal | एक समृद्ध वटसावित्री
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi-Pore

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

एक समृद्ध वटसावित्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका 
नुकताच वटसावित्रीचा सण साजरा झाला. मी पण तो मनापासून साजरा केला. पण मागच्या काही वर्षांपासून तो आम्ही सगळ्या मैत्रिणी जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. बाजारात ट्रक भरभरून वडाच्या फांद्या रस्त्यावर टाकल्या जातात. मग विक्रेते आपापला गठ्ठा घेऊन रस्त्यावर विकायला बसतात. बायकांची विकत घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते. त्यातील एकीचाही त्या पूजेवर पूर्ण विश्‍वास असतो की नाही, जरा शंकाच आहे. सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाची पूजा करण्याची प्रथा आहे.

त्यामागच्या हेतूविषयी आपण बोलूया. पण आता या प्रथेला बीभत्स रूप येत चाललंय, असं मला वाटतंय. वडाचं झाड आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. त्याच्या मुळात, दांड्यात औषधी गुण आहेत. पण सगळ्यात जास्त आयुष्य असणारं आणि भरपूर ऑक्‍सिजन देणारं हे झाड आहे. ते जगावं म्हणून आपल्या चतुर पूर्वजांनी ही प्रथा देवपूजेच्या रूपाने समाजात आणली. त्याला प्रेमाची एक सुंदर कहाणी रचली. नवरा-बायकोच्या नात्याला एक पवित्र रूप देऊन ते जास्त काळ प्रेमानं टिकावं (नवऱ्यासाठी अशी एकही प्रथा त्यांनी रचली नाही, हा वेगळा विषय आहे. आपण कधीतरी बोलूच.)

म्हणून या सगळ्या प्रथा आहेत. शिवाय त्याला सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व तर आहेच. सामाजिक असं की, पूर्वीच्या बायकांना सजून, नटून त्या निमित्ताने बाहेर पडायला मिळत असे. चार मैत्रिणींसोबत तो सोहळा साजरा करताना आनंद मिळत असे. नवऱ्याप्रति आपलं प्रेम व्यक्त करायला एक सुंदर दिवस मिळत असे. पण आता होतंय वेगळंच. झाड टिकावं म्हणून प्रथा सुरू झालीय तर स्त्रिया वडाला जाऊन भेटण्यापेक्षा त्याला तोडून त्याची घरच्याघरी पूजा करू लागल्या. ज्या स्त्रिया वडाला पुजायला जातात, तिथं तर एक वेगळीच दुकानं उघडली आहेत. स्वतःला पुरोहित म्हणवून घेणारे बरेच सद्‌गृहस्थ तिथं अक्षरशः हात धुऊन मागे लागतात. काहीजण वडापासून बऱ्याच लांबपर्यंत बायकांना गाठण्यासाठी आपले ब्रोकर उभे करतात. ते जोरजोरात ओरडून सांगत असतात की, त्यांच्याकडच्या पंडितांकडून पूजा केली की, जन्मोजन्मीचे पाप धुतले जाते. वडाकडं मागितलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. नवऱ्याचे दारूचे  व्यसन थांबते.

मुलं होत नसल्यास मुलं होतात. नवरा दुसऱ्या बाईच्या नादाला लागला असल्यास तिला सोडून तुमच्या प्रेमात परत तो अडकतो, वगैरेवगैरे हास्यास्पद. भटजींचं प्रमोशन मस्त पद्धतीनं चालू असते. तुम्ही त्या भटजीकडं न जाता दुसऱ्या भटजीकडं गेल्यास हेच ब्रोकर वजा प्रमोशन करणारे तुम्हाला शिव्याशाप देऊ लागतात. वडाजवळ सरळ जाणाऱ्यांना धुसफूस करतात. नीट पूजा करायला देत नाहीत. नैवेद्य ठेवायच्या आतच तिथली मुलं पळवतात. कुत्रे तोंड घालायला असतात ते वेगळंच. एरवी कुणीही त्या वडाकडं ढुंकूनही न बघणारे अक्षरशः त्या वडावर जवळजवळ आपलीच मालकी सांगू लागतात. वटसावित्रीची पूजा की किळसवाणा बाजार, असं वाटू लागते. काही बायकांनी तर पुराणात असं एकही व्रत दिलं नाहीये, तर आम्ही का करावं म्हणून या व्रतावर फुलीच मारली आहे. पण आम्ही काही मैत्रिणींनी काही वर्षांपासून या व्रताला एक वेगळं रूप दिलंय. वडाची दोरा गुंडाळून पूजा करण्यापेक्षा वटसावित्रीला एक वडाचं झाड लावायचं ठरवलंय. दोऱ्याऐवजी त्याला एक छोटंसं कुंपण करायचं आणि ते जरा मोठं होईपर्यंत जगवायचं. हे सुंदर झाड लावायला आपल्याला आपल्या प्रेमाच्या माणसांना पण घेऊन जाता येते. प्रत्येक वर्षी आपणच झाड लावलं पाहिजे, असं काही नाही. आपले आई, वडील, सासू, सासरे, गुरुजन, नवऱ्याकडूनही आपण हे झाड लावून घेऊ शकतो. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून वर्षानुवर्षे जगवू शकतो. आपण या पृथ्वीवरून कदाचित निघून जाऊ पण हे प्रेमाचे प्रतीक हजारो वर्ष पृथ्वीवर सुंदर निसर्ग तयार करत राहील. अनेक प्राणिमात्रांना ऑक्‍सिजन देऊन जगवत राहील, ही एक सुंदर वटसावित्री आहे ना? आपण झाड लावल्यावर निसर्गाला प्रार्थना करू शकता. की माझ्या सगळ्या आप्तेष्टांना, नवऱ्याला वडासारखं निरोगी, भरपूर आयुष्य दे. माझा विश्‍वास आहे, निसर्ग या पूजेचा नक्की सन्मान करेल. कारण निसर्गापेक्षा कोणताच धर्म मोठा नाही किंवा कोणता देवही नाही. देवच निसर्ग आणि निसर्गच देव आहे. चला तर पुढील वर्षीपासून ही वेगळीच वटसावित्री साजरी करून निसर्ग वाचवूया.

loading image