यशस्वी जीवनाचे मूल्यमापन..!

यशस्वी जीवनाचे मूल्यमापन..!

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे
मागच्या लेखात मी आदिवासींसोबतच्या शूटिंगच्या गमती-जमती सांगत होते. त्या न संपणाऱ्या आहेत. त्यांना आपण शिकवूया, त्यांना आधुनिक जगाविषयी सांगूया, असा आमचा प्रत्येकाचा हेतू होता. बिचारे अजूनही विकसित झालेले नाहीत, नवीन पदार्थ, अन्न त्यांना माहीत नाही. त्यांच्याकडे थंडीपासून बचावासाठी नीट कपडेही नाहीत. झोपण्यासाठी मऊ बिछाना नाही. आपण त्यांना या गोष्टींची कल्पना देऊयात. मोठे होण्याचे शिक्षण देऊन आधुनिक होण्याचे स्वप्न दाखवू या. म्हणजे त्यांना जीवनाचे एक ध्येय मिळेल.

आम्हाला पडलेले हे मोठे कोडे आहे की, आपण त्यांना काही शिकवतोय की त्यांच्याचकडून शिकून घेतोय. कशासाठी करतोय सगळे? काय मिळवतोय? सरतेशेवटी मन:शांती मिळावी, जीवनात आनंद, आराम मिळावा म्हणूनच करतोय ना? मग ही माणसे काय करतायेत? तेच तर करतायेत. त्यांच्यासारखे निरागस हसू आमच्यासारख्या सो कॉल्ड आधुनिक माणसाच्या एकाच्याही चेहऱ्यावर नव्हते. अंगावर पूर्ण कपडे नसले तरी ऊन, वारा, थंडी सोसलेली त्यांच्या कातडीची चमक आमच्या एकाच्याही अंगावर नव्हती. त्यांच्या मुलांशी मूर्खासारखे खेळत, हसत ते तासन्‌ तास झाडाखाली बसलेले असत.

आम्ही कामातून वेळ मिळाल्यावर कुठल्या तरी कोपऱ्यात नेटवर्क मिळाले तर मुलांना एखादा फोन करत होतो आणि प्रत्येक जण एकच बोलत होता, ‘नीट वाग, त्रास देऊ नकोस, अभ्यास कर, पुरे झाले खेळणे, अजिबात हा..हा...ही...ही...करत बसायचे नाही....’ अरे काय चाललंय? लहान मुलांनी बालपण उपभोगायचेच नाही का? काय करतोय आपण, काय देतोय आणि काय मिळवतोय? क्वॉलिटी टाइम मुलांसोबत घालवायचा वगैरे कुठेतरी वाचून, ऐकून आपण मुद्दाम ते करायचा प्रयत्न करतो. मात्र ही माणसं मुलांसोबत माकडासारखे खेळतात, झाडावर मुलांना चढून फळे काढू देतात. प्रत्येकाचे मूल त्याच्या आईला बिलगलंय. आनंदाने विसावलंय, संपूर्ण बालपण जगतायेत. आपल्यालाही माहीत आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात बालपण एकदाच येते आणि तोच आयुष्याचा पाया असतो. तिथेच खरा व्यक्ती घडत असतो. आपल्या आधुनिक घरांघरांमध्ये आई आणि वडील दोघेही करिअर करत असतात. एकतर आजी आजोबा नवीन पिढीला नको असतात, कधी घरे लहान असतात, कधी दोघांचे खाणेपिणे, फिरणे व उठण्या-बसणाच्या वेळा आणि सवयी वेगळ्या असतात. त्यामुळे एकत्र राहण्याचे टाळलेले असते. आणि कधी-कधी जुनी पिढी आपला साधेपणा सोडायलाच तयार नसते. त्यांनाही स्वत:ची प्रायव्हर्सी हवी असते. कारणे काहीही असोत आता उच्चभ्रू लोकांमध्ये भरपूर पैसे देऊन मुलांना सांभाळायला आया ठेवलेली असते. ती तिच्या कुवतीप्रमाणे सगळे व्यवस्थित करते. परंतु त्यात वात्सल्य नसते. बाळ आणि वात्सल्य याने जीवन फुलते.

आई-बाळ-वात्सल्य हे तिघेही एकमेकांपासून दूर जाऊ लागले आहेत. उच्चभ्रू लोकांमध्ये आयाच्या आधी झ्यापा ठेवतात. या हिमाचल प्रदेशच्या बायका असतात. त्या बाळंतपण करण्यासाठी खास ठेवल्या जातात. दवाखान्यातून बाळ आल्याबरोबर ते सरळ त्याच्या सजविलेल्या सुंदर खोलीमध्ये पाठविण्यात येत. शक्‍यतोवर मुलगी असेल तर पिंक आणि मुलगा असेल तर आकाशी त्यात दुनियाभरच्या बाळाशी निगडित सुंदर वस्तू ठेवलेल्या असतात. बाळाचा पाळणा परदेशातून खास मागविलेला असतो. कारण बाळही महत्‌ प्रयासाने ८/१० वर्षाने एका करिअर करण्याच्या वयाच्या बऱ्याच उशिरा झालेले असते. मग ही झ्यापा बाळाचे डायपर बदलण्यापासून, मालिश, औषधे, पाळणा हलवून झोपवण्यापासून तर खांद्यावर थोपटून झोपविण्यापर्यंत सगळेच करते. फक्त बाळाला आईच्या कुशीत झोपायला मिळत नाही. कारण आई आणि बाबा दुसऱ्या खोलीत असतात. बाळाच्या आईने तिचा मूड असताना बाळाला मागितले तर झ्यापा तिला थोडा वेळ आणून देते, अन्यथा बाळंतीण संपूर्णपणे तिच्या खोलीत आराम करते. मोबाईल फोन वगैरेमध्येही तिला खूप कामे असतात. झ्यापाला आपली भाषाही येत नसते. असे मूल जरा मोठे झाले की आई कामावर जायला सज्ज होते आणि बाळाला आयाकडे सुपूर्द केले जाते. काय चाललेय? कशी ही मुले मोठी होऊन एकमेकांच्या वात्सल्याची श्रुखंला तयार होणार? आपण प्रगतशील होऊन काय मिळवतोय? असा प्रश्‍न मला या अशिक्षित, अप्रगतशील लोकांना बघून पडला. त्यांना काही शिकविण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडून काही शिकुयात. बालपण आईच्या वात्सल्यात जाणे आणि म्हातारपण मुलांच्या सानिध्यात प्रेमाने जाणे म्हणजेच मानवी जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे समजावे. अप्रगतशील आदिवासी अधिक यशस्वी आहेत, असे मला वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com