नातीगोती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक
एका लहानशा गावात स्वत:च्या घरात एकटीच राहणारी ती. वृद्धत्वाच्या अन्‌ वैधव्याच्या खुणा अंगी लेवून वावरणारी. तसं तिचं नाव आनंदी देवी, पण हे भारदस्त नाव आता फार कुणाला माहीत नाही. ‘बगीचेवाली माई’ म्हणूनच ती आता ओळखली जाते. कारण एके काळी तिच्या घराशेजारी फळांच्या बागा होत्या. आता ती बाग सुकून उजाड झालीय. तिला जवळचं, सख्खं म्हणावं असं कुणीही नाही. नवरा तरुणपणी समाजकार्याची आवड असलेला, स्वातंत्र्य चळवळीला लपून-छपून मदत करणारा. स्वभावानं शीघ्रकोपी, पण तिच्यावर प्रेम करणारा. आता ते सगळं इतिहासजमा झालंय. माणसांचा वावर नसल्यानं घराला अवकळा आलीय. पतीच्या अकाली निधनानंतरचा पन्नास वर्षांचा काळ आता तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांच्या रूपानं जिवंत आहे. परिस्थिती बेताची असली, तरी आल्या-गेल्यांना खाऊ घालणं, अडल्या-पडल्यांना मदत करत राहणं हा तिचा स्वभावधर्मही अजून जागा आहे.

अशातच एके दिवशी अरुण नावाचा तिचा दूरचा नातलग तिचा तपास काढत येतो. तिला ओळख लागत नाही, पण नात्यांचा गुंतवळा सोडवत ती त्याला ओळखते. अरुण तिला शहरात न्यायला आलेला असतो. तो शहरात पत्नी व छोट्या मुलीसोबत राहत असतो. ‘‘आमच्याकडं आलात तर आम्हालाही आधार मिळंल. आमच्या आईसारख्या राहा,’’ असं तो म्हणतो. आनंदीला ऐकून बरं वाटतं. कुणीतरी आपली कदर करणारं आहे, आज ना उद्या मृत्यू आला तर अग्नी देणारा कुणीतरी आहे, या भावनेनं ती सुखावते. अरुणसोबत शहरात राहायला जाते. त्याची पत्नी लता सुरवातीला चांगलं स्वागत करते.

पती-पत्नी दोघंही नोकरी करणारी. घरात लहान बाळाला सांभाळायला कुणी हवंच ना! आनंदीवर ती जबाबदारी येऊन पडते. काही दिवसांतच तिला उलगडा होतो. नात्यागोत्यातली म्हणून नव्हे, तर बाळाला सांभाळण्यासाठी म्हणून त्यांनी तिला आणलेलं असतं. ही जाणीव होताच ती खिन्न होते.

एकदा गल्लीतल्या एका अनाथ, बेवारस मुलाला घरात आणून जेवायला घातल्याबद्दल अरुण व लता तिला टाकून बोलतात. आनंदीला ते असह्य होतं. तिरीमिरीत ती घर सोडून बाहेर पडते. त्या अनाथ बालकाच्या पडक्‍या घरात राहायला जाते. हा पडका वाडा म्हणजे त्या वस्तीतला एक गुंड श्‍याम याच्या टोळक्‍याचा अड्डा असतो. एके काळी सभ्य नि सन्मार्गी असलेला श्‍याम परिस्थितीमुळं गुंडगिरीच्या मार्गाला लागलेला असतो. ऊर्मी नावाच्या एका मुलीवर त्याचं प्रेम असतं. तिलाही तो आवडत असतो. श्‍यामचा एक मवाली मित्र छेनू त्याच्यासमोरच तिची छेड काढतो. ऊर्मी अवमानित होऊन निघून जाते. त्याची साथ कायमची सोडते. संतापलेला श्‍याम छेनूला बेदम मारहाण करतो. गुंडगिरीबद्दल पंधरा दिवस तुरुंगात काढावे लागल्यानं श्‍यामच्या आयुष्याचा मार्गच बदलून जातो. त्या वस्तीत आता श्‍याम आणि छेनू यांच्या स्वतंत्र टोळ्या बनलेल्या असतात. त्यांच्यात सतत संघर्ष धुमसत असतो. आनंदी या तरुण मुलांचं जीवन जवळून न्याहाळते. त्यांची दु:खं जाणून घेते. तिच्यासाठी हे शहरी जीवन वेगळंच असतं. इथं कुणाला कुणाची कदर नसते. जो तो आपल्या विश्‍वात, नव्हे स्वार्थ जपण्यात दंग असतो. ‘आपण कुठं येऊन पडलो,’ अशी तिची भावना होते. ती दोन्ही टोळ्यांतल्या तरुणांना सचोटीच्या मार्गानं जाण्याचा हितोपदेश करते. पण सामाजिक व्यवस्थेवर चिडलेली ही पिढी कुणाचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. काही घटना अशा घडतात की दोन्ही टोळ्यांतलं वैर वाढत जातं. एका निकराच्या संघर्षात छेनूच्या हातातल्या पिस्तुलातून गोळी सुटून आनंदी देवी मृत्युमुखी पडते. एकेकाळच्या संपन्न घरातल्या स्त्रीच्या वाट्याला म्हातारपणी असा परक्‍या ठिकाणी बेवारस मृत्यू येतो...

इंदर मित्रा यांच्या मूळ कथेवर बंगाली दिग्दर्शक तपन सिन्हा यांनी १९६८मध्ये बनवलेला ‘आपनजन’ हा चित्रपट चांगलाच गाजला. त्याचाच १९७१ मध्ये आलेला हिंदी अवतार म्हणजे गुलजार दिग्दर्शित ‘मेरे अपने’! दिग्दर्शनाच्या या पहिल्या-वहिल्या प्रयत्नातच गुलजार यांनी आपल्या ‘वेगळ्या’ वाटेची झलक दाखविली. विशेषत: वृद्ध आनंदी देवीच्या भूमिकेसाठी त्यांनी केलेली मीनाकुमारीची निवड तर विलक्षण सार्थ ठरली.

मीनाकुमारीनं तिच्या अकाली मृत्यूच्या काही काळ आधी केलेल्या चित्रपटांपैकी ‘मेरे अपने’ तिच्या या वेगळ्या भूमिकेसाठी कायम लक्षात राहिला. केवळ पांढरे केस आणि विधवेची धवल वस्त्रं हा बाह्यांगापुरता बदल न दर्शवता आनंदी देवीचं जगणं तिनं अभिनयातून अक्षरश: जिवंत केलं. खेडं आणि शहर, गरीब आणि श्रीमंत या भेदातून घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टींनी संभ्रमित होणारी, माणसं एवढी स्वार्थी होऊच कशी शकतात, हे कोडं न उलगडलेली आनंदी देवी मीनानं विलक्षण ताकदीनं उभी केली. माणसा-माणसातली वाढत जाणारी दरी हा या चित्रपटाचा मुख्य विषय असताना सर्वसामान्य प्रेक्षकांना तो टोळीयुद्धावरचा थरारक चित्रपट वाटला, हे दुर्दैव! प्रारंभीच्या एका दृश्‍यात आनंदी देवीच्या चपला एकावर एक पडलेल्या पाहून ‘लवकरच परगावी जाण्याचा योग दिसतोय,’ असं तिची मोलकरीण उद्‌गारते.

यावर आनंदीचं उत्तर असतं, ‘आता कुठचा प्रवास? आता केवळ एकच प्रवास, हे घर कायमचं सोडून जाण्याचा!’ चित्रपटाच्या शेवटी आनंदी देवीचं पार्थिव शववाहिनीत ठेवताना तिच्या चपला जमिनीवर उलट्या पडतात तेव्हा आरंभीच्या त्या दृश्‍याचा संदर्भ लागतो आणि मन सुन्न होतं...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Sunil Deshpande maitrin supplement sakal pune today