करिअरची सुरवात मॉडेलिंगपासून...

Vani-Kapoor
Vani-Kapoor

सेलिब्रिटी टॉक - वाणी कपूर, अभिनेत्री 
मी माझ्या करिअरची सुरवातच मॉडेलिंगपासून केली. मॉडेलिंग क्षेत्रात असताना मी माझा पहिला चित्रपट केला आणि तो चित्रपट होता ‘शुद्ध देसी रोमान्स.’ यशराज फिल्म्सचा हा चित्रपट होता. या चित्रपटामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. मला लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड आहे.

‘चालबाज’, ‘गाईड’ तसेच राज कपूर यांचे चित्रपट माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले आहेत. मी हिंदी चित्रपटांबरोबर तेलुगू चित्रपटातही काम केले. यशराज फिल्म्सनिर्मित ‘अहो कल्याणम’ या तेलुगू चित्रपटासाठी मी ऑडिशन दिली. त्यांना माझं काम खूपच आवडलं आणि त्यांनी माझी या तेलुगू चित्रपटासाठी निवड केली.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. आयुष्यात प्रत्येकालाच स्ट्रगल करावाच लागतो. मलाही करावा लागला. अभिनयक्षेत्रात आल्यानंतर मलाही बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. माझा पहिलाच चित्रपट नावाजलेल्या यशराज फिल्म्सचा होता. याचा मला सर्वांत मोठा आनंद आहे. करिअरच्या सुरवातीलाच मला योग्य ती दिशा मिळाली. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.

बॉलिवूडमधील बरेच कलाकार आज स्टारडम अनुभवत आहेत. एखादा चित्रपटाची कथा फारशी प्रभावी नसली तरी त्या चित्रपटातील कलाकारामुळे तो चित्रपट चालतो. एखाद्या कलाकाराच्या नावावर चित्रपट चालणे, हेच कलाकाराचे खरे स्टारडम असते. चित्रपटाची कथाही चित्रपटाचा खरा स्टारडम आहे. एका चित्रपटासाठी संपूर्ण टीम तितकीच महत्त्वाची असते आणि त्या चित्रपटाशी जोडला जाणारी प्रत्येक व्यक्ती त्या चित्रपटासाठी तितकीच जबाबदार असते, असे माझे एकूणच चित्रपटांबाबतचे मत आहे. मी आजवर जे चित्रपट केले त्या चित्रपटांमधील प्रत्येक कलाकाराने मला  
सांभाळून घेतले. मला उत्तम सहकलाकार मिळत गेले. मी इंडस्ट्रीमध्ये नवीन असतानादेखील मला प्रत्येकाने आपलंस केलं.

अभिनेता हृतिक रोशनबरोबरचा माझा ‘वॉर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हृतिकने मला फार साथ दिली. ‘वॉर’च्या सेटवर मजा-मस्तीचे वातावरण असायचे. त्यामुळे मला कोणताही सीन करत असताना फारसे दडपण आले नाही. आपल्या आजूबाजूला सकारात्मक माणसं असली की आपण कामही अगदी योग्य पद्धतीने करू शकतो.

‘वॉर’मध्ये मी हृतिकबरोबरच डान्स केला आहे. हृतिकचे नृत्यकौशल्य साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्याबरोबर एकत्रित नृत्य करणं माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता. या चित्रपटाची कथा ऐकताच मी या कथेच्या प्रेमात पडले. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत नसले तरी चित्रपटामधील माझी भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण आहे आणि माझ्यासाठी चित्रपटांमधील माझी भूमिका लहान असली तरी माझ्यासाठी ती नेहमी महत्त्वाची ठरते.

या चित्रपटात हृतिकसोबत काम करताना खूप काही गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थने ही मला खूप पाठिंबा दिला. सिद्धार्थ आनंद या दिग्दर्शकाची एक गोष्ट मला नेहमी आवडते. चित्रीकरण करताना सेटवरील वातावरण सिद्धार्थने नेहमी हसत-खेळत ठेवले. त्यामुळे अधिक उत्साहाने काम करण्यासाठी नवी ऊर्जा मला मिळत गेली. सिद्धार्थचा चित्रपटातील प्रत्येक भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खूप वेगळा आहे आणि हे प्रत्येक वेळी त्याच्याशी बोलताना जाणवते.

सध्या वेबसीरिजचा सगळीकडे बोलबाला आहे. मीही बऱ्याच वेबसीरिज पाहते; मात्र माझे पहिले प्रेम कायम चित्रपट असेल. सध्यातरी वेबसीरिजमध्ये काम करण्याचे ठरवले नाही आहे. मी ‘वॉर’शिवाय ‘शमशेरा’ या हिंदी चित्रपटात अभिनेता करण मल्होत्रासोबत काम करत आहे.

शब्दांकन - स्नेहा गावकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com