आनंदवन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री
एका कार्यक्रमाला चंद्रपूरला गेले असताना, आनंदवनात जाण्याचा योग आला. माझ्या बहिणीने पूर्वी तिथे भेट दिली असल्याने तिच्याकडून बरेच ऐकले होते आणि स्वतः तिथे जाण्याची तीव्र इच्छा होती. अशा समाजसेवांच्या तीर्थस्थळांना भेटी देण्याचा योग जुळून यावा लागतो. चंद्रपूरच्या आयोजकांनी आनंदवनाच्या भेटीची आखणी आधीच करून ठेवली होती. 

आनंदवन म्हणजे नेमके काय आहे, कसे दिसते, कसे जगते, या उत्सुकतेने मी वरोराला पोचले. माझी पहिली भेट झाली ती डॉ. विकास आमटे यांच्याशी! त्यांचे ओघवते बोलणे आनंदवनाविषयी असले तरी आनंदवनाबरोबरच त्यांच्याशीही माझी नकळत ओळख होत होती. हुशार, प्रेमळ, आनंदवन या त्यांच्या कुटुंबातील सर्वांविषयीचा जिव्हाळा, खूप नवीन प्रकल्पांच्या योजना आणि त्यासाठी लागणारी धडपड करण्याची शक्ती; तसेच साधेपणा जाणविल्याखेरीज राहिला नाही. तिथून लगेचच बाबांच्या भेटीला आनंदवनातील त्या आपल्याच वाटणाऱ्या घरात गेले. त्यांच्या घरात शिरताना एक अनामिक दडपण आले होते खरे, पाऊल आत ठेवले आणि त्यांना पाहिले. पाठीच्या त्रासाने ते पडून होते. त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांची रेलचेल होतीच. त्यातही ओळखपाळख नसताना माझ्याकडे पाहून ते खूप गोड हसले. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसले, त्यांनी माझा हात हातात घेतला. इतका मऊ, उबदार हात... केवढी माया होती त्या स्पर्शात.

त्यांनी माझी विचारपूस केली, नाव विचारले आणि जाताना म्हणाले, ‘नावातले आणि वागण्यातले माधुर्य जप.’ मी थोडावेळ त्यांच्यापाशी बसून राहिले. त्यांच्या नुसत्या सहवासाने मन शांत झाले. त्यांचा निरोप घेऊन बाहेर आले, तो समोर साधनाताई होत्या. त्यांना भेटायला गेले. नमस्कार केला आणि त्यांच्या पायाशी बसून पंधरा मिनिटे त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला आणि माझ्या कानामागे घातलेल्या गगनजाईच्या फुलाकडे पाहून हसून म्हणाल्या, ‘घेऊन जा थोडी आणि परत-परत ये’ त्यांचे शब्द आणि स्पर्श मनात साठवत मी त्यांची रजा घेतली. 

पुढच्या वर्षी वेळ काढून आईला घेऊन चार दिवस आनंदवनात गेले. या वेळी चक्क विकासकाका, भारतीमावशी यांच्या घरी राहण्याची संधी मिळाली. आमचे नवखेपण काही काळातच विरून गेले. निमित्त होते ‘बाबांचा’ वाढदिवस! तयार होऊन बाबांकडे गेलो. पुन्हा तिथे तसाच अनुभव. बाबांना केक खायची परवानगी नव्हती. तरीही केक कापल्यावर हातात घेऊन त्यांनी बोटे चाटत केक खाल्ला. माणूस कर्तृत्वाने खूप मोठा असला की, आपण तो कसा वागत, वावरत असेल याचे आराखडे मनात आखून ठेवतो; पण तो एक माणूस आहे, त्यातही निरागसता, आनंद अवखळता याचा अंश असतो. तो हवा तरच समाधानी होऊन अजूनअजून उच्च प्रतीचे काम करू शकतो, ही प्रचिती आली. त्यांना असे ‘धमाल’ करताना पाहून खूप गंमत वाटला. 

मग खऱ्या अर्थाने आनंदवनाची सैर झाली. या वेळेला कौस्तुभ पल्लवी, शीतल, गौतम सर्वांची भेट झाली. आनंदवन हे मोठे कुटुंब आहे. त्या परिवाराची आता मी ही सदस्य झाले होते. ऋणानुबंध वर्षानुवर्षे घट्ट होत होते. विकासकामांनी मला मुलगी मानले. मी नेहमी म्हणते, ‘मानलेली मुलगीच असू शकते. कारण या आमटे परिवाराचे खतच वेगळे आहे. आज तिसरी पिढीसुद्धा या कामात समरसून आधुनिक विचारधारा पुढे नेत आहेत. ते आतून आपसूक यावे लागते. तरच ते सातत्याने घडू शकते.’ 

खरे तर इथे आनंदवनात जाऊन आपण त्यांना काही मदत करण्यापेक्षा आपणच बरेच काही घेऊन येतो. ज्यांच्याकडे काही गोष्टी अभावाने असतात, तेव्हा त्यांच्याकडे काही गोष्टी प्रभावाने देखील असतात. दिव्यांगांकडे अशी काही आंतरिक शक्ती असते ती आपल्यासारख्यांना लाजवते. जीवनाकडे पाहण्याचा, आहे त्यातून आनंद निर्माण करण्याचा, प्रत्येक क्षण साजरा करण्याचा, मेहनतीने ठोस काही घडवण्याचा, मायेचा, सकारात्मक दृष्टिकोन आपल्या आयुष्यात सर्व असतानाही अंधाराच्या, भीतीच्या, दडपणाच्या, निराशेच्या छायेतील ‘आपल्याला’ आयुष्य जगण्याची, सजवण्याची उभारी देतो. हे माझे माहेर-आनंदवन आणि माझे कुटुंब जगण्यातला आनंद घेणारे, देणारे, वाढवणारे, प्रोत्साहन देणारे, मायेचे घर!
हा अनुभव घ्यायला नक्की या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity view madhura velankar maitrin supplement sakal pune today